‘स्पेस एक्स’ची कुपी अवकाशवीरांसह माघारी

‘स्पेस एक्स’ची कुपी अवकाशवीरांसह माघारी

https://t.me/LoksattaOnline

वृत्तसंस्था, केप कॅनव्हरॉल/ अमेरिका

अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.

मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे. ही कुपी उतरवण्यासाठी मेक्सिको आखाताची निवड करण्यात आली आहे, कारण फ्लोरिडातील किनाऱ्यावर एक उष्णकटीबंधीय वादळ आहे. अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते. त्यांचा परतीचा प्रवास शनिवारी रात्रीच सुरू झाला असून त्यांच्या मुलाबाळांनी, बाबा आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत, असे म्हटले आहे. बेनकेन यांच्या मुलानेच त्यांना धीर दिला व तुम्ही पृथ्वीवर येऊन उद्या शांत झोपाल असे सांगितले. परत आल्यानंतर तुला गोड पापा देईन, असे बेनकेन यांनी त्याचा मुलगा थिओ याला आधीच सांगून ठेवले आहे.

दोन आठवडे विलगीकरण

ज्या ठिकाणी ही अवकाशकुपी अवतरण करणार आहे तेथे स्पेस एक्सने ४० कर्मचारी असलेले एक जहाज पाठवले आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका आहेत. परत आलेल्या अवकाशवीरांची लगेच तपासणी करून त्यांना करोनापासून दूर ठेवले जाईल. दोन आठवडे ते विलगीकरणात राहतील. दोन तासांत जहाज अवकाशकुपीपर्यंत पोहोचून त्यांना घेऊन येईल.  यापूर्वी २४ जुलै १९७५ रोजी नासाचे अवकाशवीर पॅसिफिकच्या महासागरात उतरले होते.

ताशी २८ हजार कि.मी. वेगाने परतीचा प्रवास

ड्रॅगन अवकाशकुपीला आता एंडेव्हर नाव देण्यात आले असून तिचा वेग पृथ्वीकडे येताना ताशी २८ हजार कि.मी असेल. तो वातावरणात येईपर्यंत ताशी ५६० कि.मी पर्यंत खाली आणावा लागेल. त्यानंतर ही कुपी सागरात पडताना तिचा वेग ताशी २४ कि.मी राहील. परत येताना अवकाशकुपीचे तापमान १९०० अंश सेल्सियस राहील.

Report Page