रशियन लशीची सुरक्षितता सांगणे कठीण

रशियन लशीची सुरक्षितता सांगणे कठीण

https://t.me/LoksattaOnline

रशियाने कोविड १९ वर तयार केलेल्या लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबत माहितीअभावी आताच काही सांगता येणार नाही, असे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रशियाने कोविड १९ वर लस तयार केली असून त्याची अधिकृत नोंदणीही केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला ही लस देण्यात आली. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संचालक राकेश के .मिश्रा यांनी सांगितले की, जर लोक नशीबवान असतील तर रशियन लस चांगले काम करील. त्यांनी त्या लशीच्या योग्य चाचण्या घेतलेल्या नसल्याने त्या लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता सांगता येत नाही. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या न घेताच त्यांनी लस जारी केली. तिसऱ्या टप्प्यात लशीची परिणामकारकता कळत असते. जेव्हा ती जास्त लोकांना दिली जाते व दोन महिने वाट पाहिली जाते तेव्हा त्या लोकांमध्ये पुन्हा विषाणू संसर्ग होतो की नाही हे स्पष्ट होते पण रशियाने तसे काही केल्याचे दिसत नाही. त्यांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केलेल्या नाहीत. जर केल्या असतील तर त्यांनी त्याची माहिती सादर करावी, ही माहिती गोपनीय ठेवता येत नाही.

मिश्रा म्हणाले की, कुठल्याही लशीचे काळजीपूर्वक मूल्यमापन करावे लागते. जर रशियाची लस सुरक्षित नसेल तर कुठल्याही देशाने तिला परवानगी देऊ नये. टप्पा १,२,३ मधील चाचण्या होणे अपेक्षित आहे. त्यात रशियाने काही टप्पे गाळले आहेत. रशियाने दोन महिन्यांपूर्वी वेगाने लस तयार करण्याचा कायदा केला होता. लशीसाठी कायदा करणे कितपत योग्य आहे.

भारतातील लशींबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झालेले नाहीत. ते ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात येतील. हे निष्कर्ष उत्साहवर्धक असतील याची खात्री आहे पण तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष त्यापेक्षा महत्त्वाचे असतात.

रशियाच्या स्पुटनिक -व्ही या लशीचा पहिला डोस गमालेया नॅशनल रीसर्च सेंटर फॉर एपिडेमॉलॉजी अँड मायक्रोबायॉलॉजी या संस्थेने पुतिन यांच्या मुलीला दिला होता. आता तिची प्रकृती चांगली आहे. पुतिन यांनी असा दावा केला की, या लशीने करोनाविरोधात पूर्ण प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत झाली आहे.

Report Page