माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

https://t.me/LoksattaOnline

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जसवंत सिंह यांचे आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. २५ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. अशी माहिती दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “ जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.”

“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

“राजकारण आणि समाजातील विविध मुद्यांवरील अद्वितीय दृष्टिकोनासाठी जसवंत सिंह यांची आठवण काढली जाईल. त्यांनी भाजपाला बळकट करण्यासाठी देखील मोठे योगदान दिले. मी सदैव आमच्यात झालेला संवाद स्मरणात ठेवेल. त्यांचा परिवार व समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे” असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page