कुतूहल : नैसर्गिक वायू आणि तेल

कुतूहल : नैसर्गिक वायू आणि तेल

https://t.me/LoksattaOnline
नैसर्गिक तेलाबरोबरच नैसर्गिक वायू निर्माण होतो. त्याला ‘असोसिएटेड नॅचरल गॅस’ असे म्हणतात

कोळशाप्रमाणेच नैसर्गिक वायू आणि तेल- जसे की पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी आदी इंधनेही वापरली जातात. समुद्री जीवांचे अवशेष समुद्रतळाशी जातात; त्यावर वाळू, दगड, माती जमा होत जाते आणि ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. यामुळे ‘केरोजीन’ नावाचा मेणासारखा पदार्थ बनतो. त्यावर उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन नैसर्गिक तेल बनते. नैसर्गिक तेलाबरोबरच नैसर्गिक वायू निर्माण होतो. त्याला ‘असोसिएटेड नॅचरल गॅस’ असे म्हणतात. ते अछिद्र खडकांखाली साठून राहतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी जमिनीतून खडकांच्या आत बारीक नळी घालून या इंधनांना वर काढावे लागते.

अशा प्रकारे हे इंधन वर आल्यावर ते प्रक्रिया केंद्रावर पाठवले जाते. नैसर्गिक वायूला उच्च दाबावर साठवून ठेवल्यास त्यापासून सीएनजी म्हणजेच ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ची निर्मिती होते. सीएनजी कोळशाहून ५० टक्के कमी कार्बन उत्सर्जन करतो. क्रूड तेल वेगवेगळ्या तापमानाला उकळवून त्यापासून केरोसिन, पेट्रोल, डिझेल इत्यादी वेगवेगळ्या प्रकारांची इंधने मिळवली जातात. आपल्यासाठी ही इंधने अतिशय उपयुक्त ठरली आहेत. प्लास्टिक, नायलॉन, क्रेयॉन्स हेच नव्हे, तर लिपस्टिकसारखी सौंदर्यप्रसाधने ही या इंधनांचा वापर करून बनवली गेली आहेत.

या ऊर्जेच्या वापराचे निसर्गावर होणारे दुष्परिणाम सहज दिसत नसले, तरी भयानक आहेत. उत्खनन करताना जेव्हा नळी खडकांच्या आत सोडली जाते, तेव्हा त्या परिसरातील भूभागावर ताण येतो. त्यामुळे जमीन खचणे, पूर परिस्थिती निर्माण होणे, भूकंपाची शक्यता वाढणे अशा अनेक घटना घडू शकतात. उत्खनन करताना तेलगळती होण्याचीही शक्यता असते. समुद्रात तेलगळतीमुळे समुद्री जीवांना प्रजनन क्रिया करणे, आपली घरे बांधणे यांसारख्या कामात अडथळा येतो. प्रसंगी समुद्री जीव मृत्यू पावतात. ‘फ्रॅकिंग’ या पद्धतीमध्ये निरनिराळी रसायने वापरून जमिनीला छिद्र पाडले जाते आणि नैसर्गिक तेल आणि वायू खेचून वर ओढले जातात. ही रसायने पाण्याचे प्रदूषण करतात.

या साऱ्याचा विचार करता असे दिसून येते की, ही साधनसंपत्ती जरी नैसर्गिक असली तरी त्याचा अतिवापर टाळणेच योग्य. कारण या संपत्तीचे साठेही संपुष्टात येत आहेत. याचा दुष्परिणामही आपण जाणतोच. त्यामुळे आता पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोतांवर विश्वास ठेवणे हीच काळाची गरज आहे.

- भाग्यश्री ग्रामपुरोहित

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

office@mavipamumbai.org

Report Page