ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिटय़ूटला परवानगी

ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिटय़ूटला परवानगी

https://t.me/LoksattaOnline

भारताच्या औषध महानियंत्रकांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

ऑक्सफर्ड लशीवर ब्राझील आणि इतर काही देशांत चाचण्या झाल्या असून प्राथमिक पातळीवर ती करोनाविरोधी प्रतिपिंड तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. या लशीमुळे प्रतिकारशक्ती प्रणालीतील टी पेशींचीही निर्मिती होते.

सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, टप्पा २ व ३ मधील महत्त्वाच्या चाचण्या करण्याची परवानगी सिरमला देण्यात आल्याचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी जाहीर केले आहे. विषय तज्ञ समितीने या बाबत शिफारशी केल्या होत्या. चाचणीनंतर या लशीबाबतच्या सुरक्षिततेची माहिती सुरक्षा देखरेख मंडळाला टप्पा तीन सुरूकरण्यापूर्वी सादर करावी लागणार आहे.

एका व्यक्तीला दोन डोस चार आठवडय़ांच्या अंतराने देण्यात येणार असून पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २९ व्या दिवशी द्यावा लागेल. त्यानंतर सुरक्षा व प्रतिबंधात्मक माहिती हाती येईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाने टप्पा १ व २ मधील जे निष्कर्ष जाहीर केले आहेत त्यांची माहिती शुक्रवारी केंद्रीय औषध नियंत्रण संघटनेसमोर मांडण्यात आली. त्यानंतर टप्पा २ व टप्पा ३ च्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली.

सिरम इन्स्टिटय़ूटने आधी केलेल्या अर्जावर मागवण्यात आलेली अधिकमाहिती सादर केल्यानंतर आताचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित प्रस्तावानुसार १८ वर्षांवरील १६०० लोकांवर चाचण्या करण्यात येणार असून सतरा निवडक ठिकाणी त्या केल्या जातील. यात दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पुण्याचे बी. जे. मेडिकल कॉलेज, पाटण्यातील रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफमेडिकल सायन्सेस, चंडीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफमेडिकल एज्युकेशन अँड रीसर्च, जोधपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, गोरखपूरचे नेहरू हॉस्पिटल, विशाखापट्टनमचे आंध्र मेडिकल कॉलेज, म्हैसुरूची जेएसएस अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च यांचा समावेश आहे. सिरमची अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीसमवेत लसनिर्मितीत भागीदारी आहे.

Report Page