@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar

⚡पंगा भारताशी, जिनपिंग तोंडघशी!

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.

- पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत आणि चीन यांचे सैन्य केवळ 300 मीटर अंतरावर समोरासमोर उभे ठाकले आहे. 1962 नंतर असे पहिल्यांदाच घडते आहे. या भागात तापमान उणे 30 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेले आहे. पुढील दहा महिने चीनकडून केल्या जाणार्‍या कोणत्याही कुरघोडीवर मात करायला भारतीय लष्कर सर्वच दृष्टीकोनातून तयार आहे. अत्यंत उंच पर्वतीय क्षेत्र असूनही पुढील दहा महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा लष्कराला पोहोचवण्यात आला आहे. त्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आलेली आहे. अमेरिका आणि इस्राईलकडून लष्करासाठी उबदार कपडे, तापमान स्थिर ठेवणारे तंबू घेऊन ते ताबारेषेवर उभारण्यात आलेले आहेत. भारतीय लष्कराच्या तोफा, राफेल विमाने सज्ज आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात भारत- चीन यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता अधिक आहे. यासाठी भारताची सर्व दृष्टीकोनातून तयारी पूर्ण झालेली आहे.

- एलएसीवर तणावपूर्ण वातावरण असताना नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानने रणगाडे तैनात केले आहेत. पाकिस्तानकडून यापूर्वी कधीही झाले नाही इतके शस्त्रसंधीचे उल्लंघन होते आहे. एलओसीवर पाकिस्तानने सैन्याची कुमक वाढवली आहे. भारत आणि चीन संघर्षाची ठिणगी पडल्यास पाकिस्तानकडून सेकंड फ्रंट खुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते असे आजचे वातावरण आहे.केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी 14 सप्टेंबर रोजी संसदेत हे स्पष्ट केले आहे की सीमेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. चीन भारताला जाणीवपूर्वक चिथवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने एक इंचही जमीन गमावली नाहीये हे लिखित स्वरुपात सरकारने स्पष्ट केले आहे.

- वास्तविक, चीनबरोबर लष्करी पातळीवरील चर्चेच्या पाच फेर्‍या झाल्या आहेत. आता सहाव्या फेरीची चर्चा करण्यास चीन तयार नाही. अलीकडेच भारत आणि चीन या दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री मॉस्कोमध्ये परस्परांना भेटले. त्यामध्ये चीनने पूर्व लडाखमधून पूर्णपणे माघार घेण्याचे मान्य केले असले तरीही प्रत्यक्ष सीमेवर मात्र तशा कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत. याचाच अर्थ त्या करारातून काहीही साध्य झालेले नाही.

- एकीकडे चीनचे परराष्ट्र मंत्रालय आम्हाला शांतता हवी आहे, भारताबरोबर कोणताही संघर्ष करायचा नाहीये आणि चर्चेने मार्ग काढायचा आहे, असे सांगत असताना दुसरीकडे एलएसीवर युद्धाची जय्यत तयारी केली गेली आहे. या विसंगतीची कारणे काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. चीनच्या या दुटप्पी धोऱणाची दोन प्रमुख उद्दीष्टे दिसून येतात. पहिले उद्दीष्ट म्हणजे पूर्व लडाखमध्ये झालेल्या गलवान संघर्षाला 84 दिवस उलटून गेले आहेत. या 84 दिवसांमध्ये चीनचे किंवा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे घुसखोरी करून भारतावर दबाव आणण्याचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी, चीन पूर्णपणे तोंडघशी पडला आहे. मुळातच जिनपिंग यांनी ही खेळी जाणूनबुजून खेळली. कारण कोरोनाच्या हाहाःकारामुळे चीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. चीन जरी आकडेवारी चीनने लपवत असला तरी तेथे 8 कोटी लोक या काळात बेरोजगार झाले आहेत. जवळपास 35 टक्के चीनी उद्योग बंद पडले आहेत. चीनच्या जीडीपीवर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला आहे. यामुळे चीनमध्ये शी जिनपिंग यांच्याविरोधातील असंतोष वाढत चालला आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि चीनचे इतर देशांबरोबर सीमावाद संघर्ष सुरू आहेत, त्या देशांना संदेश देण्यासाठी भारताला कमजोर समजत चीनने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि, ही चीनची खूप मोठी घोडचूक ठरली आहे.

- गेल्या 84 दिवसांमध्ये ज्या ज्या वेळी चीनने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भारताकडून कणखर दणका देण्यात आला आहे. 1962च्या युद्धामध्ये चीनने काबीज केलेल्या काही पोस्टही आता भारताने परत मिळवल्या आहेत. विशेषतः चुछूल हे 1962च्या युद्धाचे केंद्र होते. या क्षेत्रातील ब्लॅक टॉप पोस्ट चीनच्या कब्जात होती. पण आता तेथे भारताचा तिरंगा फडकला आहे. या पोस्टवरील कब्जाने भारतीय सैनिक आता वरच्या स्थानावर आले आहेत. परिणामी चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.

- भारताच्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे शी जिनपिंग यांना आपली चूक लक्षात आली आहे. मात्र त्यांना आता स्वतःची प्रतिमा जपायची आहे. भारतापुढे माघार घेतली तर केवळ चीनमध्येच नव्हे तर दक्षिण आशियात व जगभरात जिनपिंग यांची प्रचंड मोठी नाचक्की होणार आहे. त्यांना कम्युनिस्ट पक्षालाही उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे आता त्यांची अवस्था ‘कॅच 22’ अशी झाली आहे. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा कोंडीत जिनपिंग अडकले आहेत.

- पूर्व लडाखमध्ये हिवाळा सुरू झाला आहे. येणार्‍या काळात हिवाळ्याची तीव्रता प्रचंड वाढत जाणार आहे. या काळात तेथील तापमान उणे 50 अंशापर्यंत खाली जाते. आत्तापर्यतच्या इतिहासाकडे लक्ष दिल्यास कडाक्याच्या हिवाळ्यात चीनचे सैन्य पूर्व लडाखमध्ये टिकाव धरू शकत नाहीत आणि ते 200-300 किलोमीटर मागे जाते. कारण तीव्र हिवाळा त्यांना सहन होत नाही. पण यंदा माघार घेतली तर नाचक्की होणार आहे. चीन अशा कोंडीत सापडल्यामुळे भारताचे स्थान पक्के झाले आहे.

- या परिस्थितीतून बचाव करण्यासाठी भारतावर दबाव कायम ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. थोडक्यात, पूर्व लदाखमधील संघर्ष सतत सुरू ठेवणे हे शी जिनपिंग यांच्या राजकीय अस्तित्वासाठी गरजेचे बनले आहे. पण हे अवघड जागेचे दुखणे जिनपिंग यांना भारी पडणार असे दिसू लागले आहे. चीनच्या युद्धनीतीला ‘अ‍ॅग्रेसिव्ह डिफेन्स’ म्हणतात. यानुसार, शत्रुवर प्रचंड दबाव आणून त्याला मागे ढकला. शत्रुवर इतका दबाव टाका की अखेरीस संयम सुटून शत्रू आपल्यावर हल्ला करेल. याच रणनीतीनुसार सध्या जिनपिंग पावले टाकत आहेत.

- 1962चे युद्धही असेच ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झाले होते. या युद्धात विजयी झाल्यामुळे आताही हिवाळ्यात भारतीय सैनिक टिकू शकणार नाहीत असा चीनचा अंदाज आहे. पण चीनची ही सर्व धोऱणे अपयशी होताना दिसताहेत. चीन आजही 1962 च्या विजयाच्या नशेत आहे. तथापि, चीनने हे लक्षात ठेवले पाहिजे की, 62 च्या युद्धानंतर 1967 मध्ये भारतीय लष्कराने चीनला मोठा दणका दिला होता. तसेच त्या काळात चीनशी लढण्यासाठी भारतीय सैन्याकडे ज्या बंदुका होत्या त्या पहिल्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या होत्या. त्याकाळात सीमेवर रस्तेही नव्हते. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. अशा कठीण परिस्थिती भारतीय सैन्य लढलेच कसे असा प्रश्न आज अनेक सामरिक तज्ज्ञांसमोर आहे. दुसरीकडे, 1962 च्या युद्धात चीनमधील सैन्य म्हणजे माओ त्से तुंग यांची रिव्ह्योल्युशनरी फोर्स होती. 1949 मध्ये चीनला कम्युनिस्ट बनवण्यामध्ये आणि माओंच्या लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले तेे लाल योद्धे होते. त्यामुळे ते प्रचंड ताकदीने लढले. पण आज परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. चीनचे सध्याचे लष्कर हे ऐषोआरामात जगणारे आहे. त्यांना युद्धाचा अनुभव नाही. 1997 मध्ये या सैन्याला व्हिएतनाम युद्धात मोठा फटका बसला आहे. त्यानंतर चीनी सैन्याला कोणत्याही युद्धाचा अनुभव नाही. यातुलनेत भारताची परिस्थिती 1962 च्या तुलनेत खूपच सुधारलेली आहे. पूर्व लदाखमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण झाले आहेत. दहा महिनेच नव्हे तर दोन वर्षे युद्ध चालले तरी त्यासाठी आवश्यक अन्नधान्य, उबदार कपडे, शस्त्रास्त्रे, साहित्य आज भारताकडे आहे. एलएसीवर जिथे वीज नाही तिथे वीजनिर्मिती करता येणारी साधनेही आज उपलब्ध आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आज भारताकडे स्पेशल फॉरवर्डिंग फोर्स आहे. 1962 च्या युद्धात ही फोर्स आपल्याकडे नव्हती. त्यानंतर आपण तिबेटीयन नागरिकांना भरती करून ही तुकडी बनवली आहे. ही तुकडी पर्वतीय युद्धपद्धतीमध्ये अत्यंत तरबेज आहे. उंच पर्वतरागांवर चढाई करण्यात माहीर असलेली ही तुकडी अत्यंत आक्रमक आणि सक्षम आहे. या फॉरवर्डिंग फोर्सने चीनला गेल्या 84 दिवसांत अनेक दणके दिले आहेत. यामुळे चीनदेखील अचंबित आणि भयभीत झालेला पाहायला मिळाला. थोडक्यात, भारत आता वर्चस्व गाजवण्याच्या स्थितीत आहे.

- भारताच्या या बलाढ्य स्थानामुळे चीनला आता या प्रकरणातून हात सोडवून घ्यायचा आहे. पण तसे करताना चीनला स्वतःची नामुष्की झाली आहे असे दाखवायचे नाहीये. गलवान खोर्‍यात भारतीय लष्कराने चीनचे 40 पेक्षा अधिक सैनिक मारले आणि त्यापाठोपाठ 28-29 ऑगस्ट रोजी चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हेरून तो परतवून लावत आपण महत्त्वाच्या जागांवर कब्जा केला. या सर्व घडामोडींचे आंतरराष्ट्रीय परिणाम दिसून आले आहेत. भारताच्या या आक्रमकपणामुळे ज्या छोट्या देशांना चीन धमकावत आला त्या देशांचा आत्मविश्वास वाढू लागला आहे. तैवानसारख्या देशाने चीनच्या डोळ्यात डोळे घालून चीनला उत्तरे देण्यास सुरूवात केली. तैवानचा आत्मविश्वास भारतामुळे वाढला आहे. आज चीनच्या लढाऊ विमानांचा पाठलाग तैवान करतो. मध्यंतरी चीनचे एक लढाऊ विमान पडले होते, त्याचे कारण कळलेले नाही. पण ते तैवानने पाडले असे म्हटले जाते. तैवानबरोबरच दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांची हिंमतही वाढली आहे. कारण भारताने दिलेल्या दणक्यामुळे चीन माघार घेतो आहे, हे या देशांना कळून चुकले आहे.

- भारताने सामरीक दणक्याबरोबरच आर्थिक पातळीवरही दणका द्यायला सुरूवात केली आहे. भारताने टीकटॉकसह शेकडो चीनी अ‍ॅप्सवर निर्बंध टाकले आहेत. भारतानंतर जगाने त्या दिशेने पावले टाकली. अमेरिकेनेही भारतानंतर टीकटॉकवर बंदी घातली. एवढेच नव्हे तर चीनच्या विस्ताववादाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्यानंतर अनेक देश त्या आशयाने बोलू लागले आहेत. या सर्व जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे शी जिनपिंग हादरून गेले आहेत. आज चीनमधून आंतरराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडू लागल्याने चीन संकटात सापडला आहे. परिणामी, शी जिनपिंग हे युरोपियन महासंघातील 27 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना व्यक्तिशः फोनकरून चीनची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताहेत. आम्ही विस्तारवादी नाही, आमच्याविषयी गैरसमज करून घेऊ नका, आमच्या देशातील गुंतवणुकी काढून घेऊ नका, अशी आर्जवे करण्याची वेळ जिनपिंग यांच्यावर आली आहे. याचा अर्थ आता फासे पूर्ण पलटले आहेत.

- अलीकडेच संयुक्त राष्ट्र संघाच्या युएन कमिशन ऑन दी स्टेटस ऑफ वूमेन या अत्यंत महत्त्वाच्या आयोगाच्या सदस्यत्वासाठी भारत आणि चीन दोघांमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत भारताने चीनचा दारूण पराभव केला. आजवर चीनला अशा पराभवाला कधीही तोंड द्यावे लागले नव्हते. कारण चीनकडे संयुक्त राष्ट्र संघाच्या 15 समित्यांचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे या कमिशनचे सदस्यत्व मिळावे म्हणून चीनने मोठी मोर्चेबांधणी केली होती. पण ती व्यर्थ ठरली. याचा अर्थ असा की चीनची विश्वासार्हता ढासळते आहे. पूर्व लडाखमध्ये चीन करत असलेल्या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. म्हणूनच चीन आता आम्ही शांततेने मार्ग काढणार आहोत आणि आम्हाला संघर्ष नको आहे, असे जागतिक समुदायाला भासवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण चीनची प्रतिमा ढासळते आहे. पण जमिनी संघर्षात चीनने माघार घेतली तर इतर लहान देशांबरोबर असणार्‍या चीनच्या संघर्षावर परिणाम होणार आहेत. या देशांची हिंमत वाढून ते चीनसमोर नमते घेणार नाहीत. थोडक्यात, ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावू नये’ अशी चीनची अवस्था झाली आहे. ही भीती असल्यानेच भारताबरोबर चीन आक्रमकपणाचे नाटक करत आहे. कदाचित भारताबरोबर चीन एखादा छोटा संघर्षही करेलही. पण भारताची तयारी चीनपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. यावेळी भारताचे हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे. कारगील युद्धात हवाई दल उशिरा सहभागी झाले होते. त्यामुळे आपली जिवितहानी अधिक झाली होती. पण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असल्याने आता तिन्ही दलात समन्वय साधून झटपट निर्णय घेतले जाताहेत. त्यामुळे भारताची बाजू प्रचंड भक्कम आहे.

- भारत -चीन संघर्ष सुरू झाला तर अमेरिका नक्कीच त्यात उडी घेईल. किंबहुना, अमेरिका याची वाटच पहात आहे. दक्षिण चीन समुद्रात तैवानच्या बाजूने अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. चीनसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. थोडक्यात, चीनने लहान तोंडी मोठा घास घेतला आहे; पण आता हाड घशात अडकल्याने चीन काकुळतीला आला आहे, अशी आजची परिस्थिती आहे.


⚡️परराष्ट्र धोरणातील व आंतरराष्टीय संबंधातील सर्व चालू घडामोडींविषयी मराठी व इंग्रजीतून माहितीसाठी

डॉ. देवळाणकर यांना ट्विटर वर फॉलो करा.

(@skdeolankar): https://twitter.com/skdeolankar?s=09

Report Page