@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar


‘क्लीन चीट’चं गौडबंगाल

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.


चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरल्याचे अनेक पुरावे समोर येऊनही आणि चीनने जगापासून या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे बराच काळ लपवूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी समितीनेे चीनला क्लीन चिट दिली आहे. अमेरिकेने अंग काढून घेतल्यानंतर निर्माण झालेली पोकळी साधत चीनने प्रचंड पैसा ओतत आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये आपला वरचष्मा निर्माण केला आहे. जागतिक आरोग्य संघटना तर चीनधार्जिणी असल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे या चौकशीनाट्याचा निकाल अपेक्षितच म्हणावा लागेल. आज सुरक्षा परिषदेतही चीनचे वर्चस्व असल्याने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्यानेही काहीच साध्य होणार नाही.

---------

अपेक्षेप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी समितीने कोरोना विषाणू संसर्गाच्या उगमाबाबत चीनला क्लीनचिट दिली आहे. वस्तुतः, चीनला या समितीचे जाणे हाच मुळी एक दिखावा होता. त्यामुळे ही समिती काय अहवाल देणार हे अवघ्या जगाला माहीत होते. गेल्या वर्ष-सव्वा वर्षापासून संपूर्ण जगापुढे, आरोग्यविज्ञानापुढे महाआव्हान बनून राहिलेल्या आणि जगाचे अर्थकारण, समाजकारण आदींवर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणार्‍या या महामारीस कारणीभूत असलेल्या कोरोना विषाणूबाबत चीनकडे स्पष्टपणाने संशयाची सुई जात आहे. या विषाणूचा उगम हा चीनमधील वुहान शहरात झाला आणि त्याचा प्रसारही चीनकडून झाला, असे आरोप, दावे पुराव्यानिशी केले गेले आहेत. या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एका चौकशी समितीचे गठन केले होते. अर्थात, याबाबत 60 देशांकडून मागणी करण्यात आल्यानंतर ही समिती नेमण्यात आली होती.

कोरोना संसर्गाच्या गेल्या वर्ष-दीड वर्षातील चीनची एकंदर वर्तणूक पाहता ती अत्यंत संशयास्पद आणि गूढ अशी राहिली आहे. कोरोनाचा उगम कसा झाला याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे जगात धुमाकूळ घालणारा हा विषाणू म्हणजे चीनचे बायोलॉजिकल वेपन अर्थात जैविक अस्र आहे असा दावा केला गेला आहे. दुसरीकडे, चीनमध्ये ज्या पद्धतीने खवल्या मांजर, वटवाघूळ यांसारखे अनेक प्रकारचे प्राणी खाल्ले जातात, त्यातून हा विषाणू प्राण्यांतून माणसांत आल्याचे सांगितले गेले आहे. याबाबत भलेही मतमतांतरे असली तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, चीनने सुरुवातीपासून या विषाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती जगापासून लपवून ठेवली ! वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रसार होऊ लागला होता तेव्हा चीनमधील काही डॉक्टरांनी, शास्रज्ञांनी याबाबत त्वरित जागृत होऊन पावले उचलण्याची गरज असल्याचे तेथील सरकारला सांगितले होते. हा विषाणू वेगाने पसरत असून तो अत्यंत धोकादायक असल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. पण चीनमधील शी जिनपिंग सरकारने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. परिणामी, या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत गेला. जगामध्ये ज्याप्रमाणे माध्यमांना स्वातंत्र्य आहे, सोशल मीडिया आहे तसा प्रकार चीनमध्ये नाहीये. तेथे माध्यमांवरही चीनी सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे चीनमधून बाहेर येणारी माहिती ही सरकारी प्रसार माध्यमांतूनच येते. या माहितीचे स्कॅनिंग केले जाते. त्यामुळे चीनला अनुकूल असणारी माहितीच जगासमोर येत असते. अशी स्थिती असल्याने चीनमध्ये कोरोना नामक विषाणूचा उगम झाला असून तो पसरत असल्याचे जगाला समजू शकले नाही. दरवर्षी एक कोटींहून अधिक नागरीक चीनमधून जगभरात पर्यटनासाठी जात असतात. कोरोना संसर्गप्रसाराच्या सुरुवातीच्या काळात या पर्यटकांनी आपला प्रवास सुरुच ठेवला.त्याचप्रमाणे चीनमधील उद्योजकांनी, व्यापार्‍यांनी आपले व्यवहार-उद्योग सर्व काही सुरुच ठेवले. दरम्यानच्या काळात हा विषाणू खतरनाक असल्याचे लक्षात आल्यानंतर चीनने जगभरातून मास्क आणि अन्य गोष्टींची खरेदी करुन आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्टॉक करुन ठेवला. हे सर्व करत असताना जगाला याबाबत पूर्णतः अंधारात ठेवले.

वस्तुतः 2003 मध्ये जेव्हा सार्स विषाणूने धुमाकूळ घातल्यानंतर 2005 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे बनवली होती. त्यानुसार ज्या-ज्या देशात विषाणूजन्य साथीचे आजार दिसून आल्यास एक महिन्याच्या आत जागतिक आरोग्य संघटनेला त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. असे असूनही चीनने कोरोनासंदर्भातील कोणतीही माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली नाही. किंबहुना, चीन सातत्याने याबाबत नकारात्मक भूमिकेत राहिला. त्यामुळे या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत राहिला. खास करुन दक्षिण कोरिया, इराण, इटली या देशांशी चीनचे घनिष्ठ व्यापारी संबंध असल्याने या देशात या विषाणूचा प्रसार आधी झाला. कारण तिथे सर्वाधिक चीनी नागरीक जातात.

असे असूनही चीनविरोधात बोलण्यास कोणी तयार नव्हते. याचे कारण गेल्या 20 वर्षांमध्ये चीन हा जागतिक उत्पादन प्रक्रियेचे केंद्र बनल्यामुळे कच्च्या मालासाठी, मुलभूत गरजांसाठी बहुतांश देश हे चीनवर विसंबून आहेत. औषधनिर्मितीचाच विचार करता युरोपियन देश, अमेरिका यांबरोबरीने गरीब देशही मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहेत. गेल्या दोन दशकात जागतिक पुरवठा साखळीचा चीन हा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे चीनमधून या विषाणूचा प्रसार होऊनही त्याविरोधात बोलण्यास कोणी पुढे येताना दिसले नाही. अखेर यामध्ये पहिल्यांदा अमेरिकेनेच आवाज उठवला. त्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी चीनवर आरोप करण्यास सुरुवात केली. परंतु चीनची मग्रुरी इतकी की आपल्यावर आरोप करणार्‍या देशांविरोधात चीनने अरेरावी सुरु केली. ऑस्ट्रेलियावर आर्थिक निर्बंध टाकले. इंग्लंडला विविध धमक्या दिल्या. अमेरिकेलाही त्यांचा औषध पुरवठा बंद करण्यात येईल, अशा स्वरुपाच्या अनेक धमक्या चीनकडून दिल्या गेल्या. परंतु तरीही जगभरातील सुमारे 60 देश एकत्र आले आणि त्यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत, उगमाबाबत, प्रसाराबाबत चीनची चौकशी करावी, अशी मागणी केली. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली खरी; पण तो केवळ फार्स होता.

अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बिल क्लिंटन यांच्या काळात सदस्य राहिलेल्या एका अधिकार्‍यांनी एका मुलाखतीत या चौकशीबाबत अत्यंत महत्त्वाचे दावे आणि खुलासे केले आहेत. त्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत चीनची चौकशी करण्याचे केवळ नाटक केले. या चौकशी समितीमध्ये कोण सदस्य आहेत, हे चीननेच निर्धारित केले होते. त्यामुळे ते चीनविरोधात अहवाल देणार नाहीत, हे उघड होते. त्यांचा दुसरा आरोप अधिक महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, जेव्हा ही चौकशी समिती वुहानमध्ये गेली त्यावेळी अनेक बाबींमध्ये माहिती घेणे अवघड होते. म्हणून चीननेच एक प्राथमिक अहवाल तयार केला आणि तो समिती सदस्यांना दिला. सदस्यांनीही तो मान्य केला. परिणामी, या अहवालातील निष्कर्ष हे चीननेच काढलेले आहेत. त्यामुळे हा अहवाल चीनला दोषी धरणे शक्यच नव्हते. थोडक्यात, या समितीचे नाटक करुन चीनने आणि जागतिक आरोग्य संघटनेने जगाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, असेच म्हणावे लागेल.

आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशा प्रकारची स्थिती नेहमीच पाहायला मिळते. ज्या देशांचे आर्थिक सामर्थ्य, लष्करी सामर्थ्य अधिक असते त्या देशांचाच वरचष्मा दिसून येतो. बरेचदा या शक्तीबळाच्या आधारे हे देश मनमानी करताना दिसतात. उदाहरणच घ्यायचे तर, अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात आपल्या सामर्थ्याच्या जोरावर अनेक प्रकरणे रेटून नेली. कारण अमेरिकेला आव्हान देणे अवघड होते. आज तोच प्रकार चीनच्या बाबतीत पाहायला मिळत आहे.

अलीकडील काळात चीनचा हा प्रभाव वाढण्याचे एक कारण म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने अनेक बहुराष्ट्रीय संघटनांमधून अंग काढून घेतले. त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती. याचा फायदा घेत चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा कमालीचा वाढवला. आज संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा 15 समित्यांचे अध्यक्षपद चीनकडे आहे. त्यामुळेच आज चीनमध्ये शिनशियांगमध्ये उइघुर मुस्लिमांवर अत्याचार केले जात असले तरी संयुक्त राष्ट्रसंघाची मानवाधिकार सभा त्याविरोधात बोलत नाही. 2003 मध्ये जेव्हा सार्स ची साथ आली होती त्यावेळी अमेरिका मोठ्या प्रमाणावर निधी देत होता, तेव्हा जागतिक आरोग्य संघटना अमेरिकेच्या निर्देशांनुसार काम करत होती. तेव्हा डब्लूएचओने चीन विरोधात कडक भूमिका घेतली होती. परंतू आज विश्व आरोग्य संघटनेलाही चीनकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांची निवडच मुळी चीनच्या पाठिंब्याने झाली होती. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख चीनधार्जिणे असा केला होता. इतकेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या या चीनधार्जिण्या भूमिकेमुळेच अमेरिकेने यातून आपले सदस्यत्त्वही काढून घेतले होते. बायडेन सदस्य झाल्यानंतर अमेरिकेने पुन्हा हे सदस्यत्व घेतले आहे. जागतिक संघटनांना अमाप निधीपुरवठा करुन चीनने त्यांना आपल्या हातचे बाहुले बनवले आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. हॉलीवूडमध्येही चीनने प्रचंड पैसा लावला आहे. त्यामुळे चीनविरोधात बोलायलाच कुणी तयार नव्हते.

विश्व आरोग्य संघटनेकडून चीनच्या चौकशी समितीची नेमणूक झाल्यानंतर प्रत्यक्ष तपासाची प्रक्रिया सुरु होण्यात बराच अवधी गेला. या काळात चीनने आपले सर्व पुरावे नष्ट करुन टाकले. चीनविरोधात लिखाण करणारे तेथील अनेक नर्सेस, डॉक्टर्स, पत्रकार बेपत्ता झाले. कोणताच पुरावा मागे न राहिल्याने वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधून कोरोना विषाणूचा प्रसार झाला अहो, हे सिद्ध करणे अवघड होऊन बसले आहे. परिणामी, आज जगाला अभूतपूर्व तडाखा देऊन चीन नामानिराळाच राहिला आहे.

येणार्‍या काळात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, भारत आदी देशांनी अत्यंत गांभीर्याने एकत्र येऊन चीनवर कारवाईबाबतची मागणी लावून धरणे गरजेचे आहे. मागील काळात चीनच्या चौकशीचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेमध्ये आला तेव्हा चीनने व्हेटो पॉवरचा वापर केला होता. त्यामुळे सुरक्षा परिषदही हतबल झाली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आज जागतिक समुदायाने चीनविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जरी धाव घेतली तरी आणि त्यांनी सुनावलेली शिक्षा करण्याचा अधिकार ु सुरक्षा परिषदेलाच आहे. तिथे चीनला नकाराधिकारासह कायम सदस्यत्त्व असल्याने या शिक्षेचाही काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आज याबाबत एक विचित्र कोंडी तयार झालेली आहे.

इतिहासात डोकावल्यास, अमेरिकेने 50-60 वर्षे जगावर अधिसत्ता गाजवली. किंबहुना ती अनिर्बंध हुकुमशाहीच होती. अमेरिकेने अनेक देशांत हस्तक्षेप केले, राजवटी उलथवून टाकल्या, अफगाणिस्तान-इराकमध्ये सैन्य घुसवले, अनेक निष्पाप नागरिकांना मारले; पण कुणीही त्याविरोधात आवाज उठवू शकले नाही. आज तोच प्रकार चीनबाबत घडतो आहे. येणार्‍या काळात याबाबत जागतिक समुदाय कशा प्रकारे पावले टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, कोरोना, भारत - चीन तणाव या विषयी मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी.


* Instagram - https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2


* Twitter -

https://twitter.com/skdeolankar?s=09

Report Page