@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar

भारत-चीन युद्ध होणार ?

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.

गेल्या काही दिवसातील घडामोडी भारत-चीन यांच्या अभ्यासकांना काहीशा बुचकळ्यात किंबहुना चिंतेत टाकणार्‍या आहेत. सध्या दोन्ही देशातील संबंध संघर्षपूर्ण आणि तणावपूर्णच आहेत; पण आता या तणावाची परिणती एका मोठ्या संघर्षात होते की काय अशा शयता गडद होत चालल्या आहेत. 

याचे पहिले कारण म्हणजे आयएनएस जटायू. लक्षद्वीप बेटांवर भारताने विकसित केलेला हा नौदल तळ. या नाव्हल बेसच्या माध्यमातून भारताने चीन प्रभावित मालदीव आणि हिंदी महासागरात पाय पसरणाऱ्या चीनला एक प्रकारे सज्जड इशारा दिला आहे.  

दुसरे कारण म्हणजे सेला या बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते नुकतेच झालेले लोकार्पण. समुद्रसपाटीपासून जवळपास १३७०० फूट उंचीवर आसाम ते अरुणाचल प्रदेशातील तेजपूर ते पश्चिम कामेंग या रस्त्यावर बांधण्यात आलेला हा बोगदा चीनच्या सीमेवरील आव्हानाचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या रणनीतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. सुमारे ८२५ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला हा जगातील सर्वात लांब असा दोन लेन बोगदा आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे विकसित करण्यात आलेल्या या बोगद्यामुळे सर्व हंगामांमध्ये आसामला थेट अरुणाचल प्रदेशातील तवांगशी जोडता येणार आहे. 

तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे अलीकडेच समोर आलेल्या वृत्तानुसार भारताने भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमेवरुन म्हणजेेच एलओसीवरुन १० हजार सैनिक भारत चीन सीमेवर म्हणजे एलएसीवर तैनात केले आहेत. भारत सरकारने किंवा लष्कराने याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती जाहीर केलेली नसली तरी चीनच्या सरकारी प्रवत्याने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. इतकेच नव्हे तर भारताने अशा प्रकारे सीमेवरची कुमक वाढवल्यास दोन्ही देशातील संबंध पूर्वस्थितीत येणार नाहीत, असे वतव्यही चीनकडून करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सीमेवरच्या सैनिकांना भारताने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशाची जी सीमारेषा तिबेटशी जोडली गेलेली आहे त्या ५३१ किलोमीटरच्या पट्टयावर तैनात करण्यात आले आहे. सद्यस्थितीत भारत-चीन सीमेवर सुमारे ६० हजार सैन्य तैनात आहे. आता त्यात अचानक १० हजारांची भर टाकण्यात आल्यामुळे दोन्ही देशांमधील युद्धाचा भडका उडण्याच्या शयतांची चर्चा जोरात सुरू झाली आहे. 

मुळामध्ये सुरुवातीपासूनचे भारताचे इतर राष्ट्रासंदर्भातील धोरण हे आक्रमक न राहता संयमी, जबाबदारपूर्ण राहिले आहे. दुसर्‍या देशांची भूमी बळकावण्याचा प्रयत्न भारताने आजवरच्या इतिहासात कधीच केलेला नाही. भारत नेहमी बचावात्मक किंवा स्वसंरक्षणात्मक भूमिकेत राहिला आहे. असे असताना भारताने अचानकपणाने ही सैन्यतैनाती का केली आहे? सामान्यतः अशा प्रकारची सैन्यतैनात करण्यासाठी किंवा इतया मोठ्या संख्येने सैन्याचे स्थलांतर करण्यासाठी ठोस किंवा पकी गुप्तवार्ता मिळालेली असण्याची शयता असते. तशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट भारतीय लष्कराला मिळाले आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

एप्रिल २०२० मध्ये पूर्व लदाखमध्ये झालेल्या गलवान संघर्षापासून भारत-चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनलेले आहेत. चीन हा सातत्याने सीमेवर सैन्याची कुमक वाढवणे, साधनसंपत्तीचा विकास करणे आणि भारताला अडचणीत आण्याची एकही संधी न सोडणे यांसारख्या कृती करत आहे. चीनची एकूणच भारतासंदर्भातील भूमिका अत्यंत आक्रमक आहे. दोन्ही देशांमध्ये गलवान संघर्षानंतरची स्थिती सुधारण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चेच्या २१ फेर्‍या झाल्या. तरीही सीमेवरचा तणाव कमी झालेला नाहीये. ही बाब लक्षात घेता भारताने सीमांच्या संरक्षणासाठीची उपाययोजना म्हणून ही अतिरित सैन्यतैनाती केली आहे का? 

भारताचे आतापर्यंतचे चीनच्या सीमेवरील धोरण पाहिले तर ज्या ज्यावेळी चीनने भारताविरुद्ध आक्रमकता दाखवली, घुसखोरीचे प्रयत्न केले किंवा संघर्षाचा पवित्रा घेतला तेव्हाच भारताने त्याला प्रत्युत्तरादाखल आक्रमक भूमिका घेतली आहे. अकारण चीनवर दबाव आणावा म्हणून भारताने आक्रमकता कधीही दाखवलेली नाही. त्यामुळे एक शयता अशी आहे की, चीनने आपली सैन्याची कुमक वाढवलेली असावी आणि त्यामुळे भारताने हा निर्णय घेतला असावा. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारत-चीन यांच्यातील संघर्ष हा आतापर्यंत अरुणाचल प्रदेश आणि पूर्व लदाखमध्ये होता. पण आता तिबेटला लागून असलेल्या ५३१ किलोमीटरच्या सीमेवर ज्या अर्थी सैन्य तैनात करण्यात आले आहे त्याअर्थी ही सीमाही असुरक्षित बनली आहे.  

अलीकडच्या काळामध्ये चीन भारताच्या शेजारील देशांना भारताविरुद्ध भडकावण्याचे, चिथावणी देण्याचे काम करत आहे. या देशांना प्रचंड प्रमाणात पैसा देऊन तेथील भारताच्या विकास प्रकल्पांना तसेच एकंदरीतच भारताच्या लष्करी किंवा व्यापारी उपस्थितीला खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे मालदीव. भारताच्या उपकाराखाली असलेल्या मालदीवला प्रशिक्षण देण्यासाठी भारताने आपले २६ सैनिक तेथे ठेवलेले होते. पण तेथील चीनधार्जिण्या मोईज्जू सरकारने या सैनिकांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने मालदीवसोबत अलीकडेच एक गुप्त लष्करी करार केला असून त्याअंतर्गत तेथील एक बेट लीजवर घेतले आहे. या बेटावर चीन एक मोठा नाविक तळ विकसित करणार आहे. भारताच्या सुरक्षेला यामुळे अत्यंत धोका निर्माण होणार आहे. मालदीवच्या माध्यमातून चीन ज्याप्रमाणे भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्याला प्रत्युत्तर म्हणूनही कदाचित भारताने तिबेटनजीकच्या सीमेवर सैन्यतैनाती करुन चीनला प्रतिशह देण्याची चाल खेळलेली असू शकते. 

वास्तविक, मालदीवपासून ५०० किलोमीटर अंतरावर असणार्‍या मिनिकॉय बेटांवर आयएनएस जटायूची उभारणी करुन चीनच्या मालदीवकार्डला मोठा शह दिला आहे. या नाविक तळामुळे भारतीय नौदलाच्या पश्चिम सागरी किनार्‍यावरील ताकदीत भर पडणार असून एअरफील्डवर लष्करी हेलिकॉप्टर, लढाऊ विमानेही तैनात करण्यात येतील. त्यामुळे आयएनएस जटायूचे सामरीक महत्त्व मोठे असल्याने तो कार्यान्वित झाल्यानंतर चीनमध्ये खळबळ माजली आहे. किंबहुना, या नाविक तळामुळे चीनला भारताची पावले कोणत्या दिशेने पडताहेत याची पूर्ण कल्पना आलेली आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः २०१७ नंतर भारताने चीनलगतच्या सीमेवर बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनच्या मार्फत साधनसंपत्तीचा जो नेत्रदीपक विकास केला आहे त्यामुळेही चीनला पोटशूळ उठले आहे. अत्यंत नियोजनबद्धरित्या आणि निर्धारीत कालावधीत सीमेवरचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प भारत पूर्णत्वाला नेत आहे. पंतप्रधानांंनी अलीकडेच उद्घाटन केलेला सेला बोगदा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बलिपारा-चरिद्वार-तवांग हा रस्ता बर्फवृष्टी, अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे वर्षभर बराच काळ बंद राहिल्याने सेला खिंडीजवळ असलेल्या बोगद्याची खूप गरज होती. या प्रकल्पात दोन बोगद्यांचा समावेश आहे. पहिला ९८० मीटर लांबीचा बोगदा हा एकच ट्यूब बोगदा आहे आणि दुसरा १५५५ मीटर लांबीचा बोगदा ट्विन ट्यूब बोगदा आहे. या बोगद्यामुळे तवांगमार्गे चीनच्या सीमेपर्यंतचे अंतर १० किलोमीटरने कमी होईल. याशिवाय आसाममधील तेजपूर आणि अरुणाचलमधील तवांग येथे असलेल्या चार सैन्य दलाच्या मुख्यालयातील अंतरही सुमारे एक तासाने कमी होणार आहे. या बोगद्यामुळे बोमडिला आणि तवांगमधील १७१ किलोमीटरचे अंतर अगदी सुलभ होईल आणि प्रत्येक मोसमात कमी वेळेत पोहोचता येईल. तसेच, हा बोगदा भारत-चीन सीमेवरील पुढील भागात सैन्य, शस्त्रे आणि यंत्रसामग्री जलद तैनात करून एलएसीवर भारतीय सैन्याची क्षमता वाढवेल.

याखेरीज चीनपासून धोका असणार्‍या राष्ट्रांशी संबंध घनिष्ट करुन भारत एक मजबूत फळीही उभी करत आहे. विशेषतः दक्षिण चीन समुद्रा लगतच्या फिलिपाईन्ससारख्या राष्ट्रांना ब्राह्मोससारखे मिसाईल भारत तैनात करत आहे. या क्षेपणास्राचा सामना करण्याची क्षमता चीनमध्येही नाहीये. भविष्यात चीनशी सामना करण्याची वेळ आल्यास आपले मित्र देशही तितकेच सामरीक दृष्ट्या सक्षम असावेत हा यामागचा हेतू आहे. फाईव्ह आय नावाची एक गुप्तहेर संघटना आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अमेरिका या देशांचा समावेश असणार्‍या या संघटनेने भारत आणि चीन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्या दृष्टीने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत जोरदार तयारी करत आहे. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत, हे भारत चीनला दाखवून देत आहे. 

अलीकडेच चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये लक्षणीय वाढ केली असून चीनचा लष्करावरील खर्च २५० अब्ज डॉलर्स इतका असणार आहे. भारताच्या तुलनेने विचार करता हा खर्च तिप्पट आहे. चीनने अचानक केलेल्या या वाढीमुळेही काहीसे चिंतेचे वातावरण आहे. यासंदर्भात एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे अलीकडील काळातील मोठ्या युद्धात विशेषतः रशिया-युक्रेन युद्धामध्ये अमेरिका युक्रेनला मदत करण्याबाबत आता फारसा उत्साही दिसत नाहीये. युक्रेनला मदत करण्याचे जे पॅकेज होते ते अमेरिकन काँग्रेसने अडवून धरलेले आहेत. हमास-इस्राईल संघर्षाबाबतही अमेरिकेने फारसा सक्रिय पुढाकार दाखवलेला नाहीये. एक प्रकारे अमेरिका काहीशा अलिप्ततावादाची भूमिका घेताना दिसत आहे. येणार्‍या काळात तेथे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही होत आहेत. या बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाऊ शकतो. कारण नजिकच्या भविष्यात भारत-चीन संघर्ष युद्धामध्ये परावर्तीत झाला तर अमेरिका तितया सक्षमपणाने म्हणजेच तात्काळ सैन्य पाठवणे, शस्रास्रे पाठवणे या स्वरुपाची मदत भारताला मदत करण्याच्या तयारीत नाहीये. युक्रेन आणि तैवानबाबत अमेरिकेने घेतलेला सावध पवित्रा हे दाखवून देत आहे. या पार्श्वभूमीवर भारत आम्ही अमेरिकेच्या मदतीशिवाय स्वसंरक्षणासाठी खंबीर आहोत, हे दाखवून देण्याचाही प्रयत्न करत आहे. अलीकडेच एस. जयशंकर यांनीही भारत-चीन संबंधांमधील परिस्थिती सामान्य नाहीये असे म्हटले आहे. यापूर्वी भारत चीनचे उघडपणाने नाव घेत नव्हता. पण अलीकडेच जपानच्या दौर्‍यावर गेले असता त्यांनी उघडपणाने चीनचा उल्लेख केला. 

या सर्व चर्चेचे सार असे की भारत आता जशास तसे उत्तर देण्याच्या भूमिकेत आहे. भारत-चीन यांच्यात कधी युद्ध होईल हे सांगणे कठीण आहे; पण ज्या दिशेने या दोन्ही देशांची पावले पडताहेत ते पाहता नजिकच्या काळात युद्धाची ठिणगी पडेल अशी भीती व्यत होत आहे.


⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी फॉलो करा. 


Twitter -

https://twitter.com/skdeolankar?s=09


Instagram -

 https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2

Report Page