World Heart Day 2020 : हृदय सांभाळा, कोविडला पळवा

World Heart Day 2020 : हृदय सांभाळा, कोविडला पळवा

https://t.me/LoksattaOnline

- डॉ. विद्याधर एस. लाड

‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे जगभरात 3.14 कोटी लोक बाधित झाले आहेत आणि 9.67 लाख जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील बाधित नागरिकांची संख्या 56 लाखांवर गेली असून 91 हजारापेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. रुग्णांची संख्या जशी वाढत चालली आहे, तशी विविध अभ्यासांमधून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. यामधूनच कोरोना व्हायरस आणि हृदयरोग यांचा जवळचा संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. आपण ‘जागतिक हृदयदिन’ साजरा करीत असताना, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असलेल्या रुग्णांवर ‘कोविड-19’चे काय परिणाम आहेत, ते पाहू या.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि गतिहीन जीवनशैली यांच्यामुळे या आजाराची जोखीम वाढते. या आजाराचे लवकर निदान होण्याकरीता नियमित कालावधीत आरोग्य तपासणी करून हृदयविकाराची वाढ रोखणे व वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या ‘कोविड-19’च्या प्रादुर्भावाच्या काळात हे पैलू पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.

वृद्ध रूग्ण आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा व हृदयविकार हे आजार असलेल्यांना कोरोनाची लागण झाल्यास, त्यांची प्रकृती गंभीर होण्याचा धोका जास्त असतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार व त्यांची गुंतागुंत असणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असते. याचे कारण, आपल्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडवून आणण्याची कोरोना व्हायरसमध्ये क्षमता असते.

‘कोविड-19’चा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या यंत्रणेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. यामुळे हृदयाचे थेट नुकसान होऊ शकते आणि फुफ्फुसात तीव्र संसर्ग झाल्याने त्यामुळेही हृदयावर मोठा ताण येतो. हृदयाला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांमधे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रवृत्ती वाढते आणि यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो. हृदयाच्या ठोक्यांची लय अनियमित झाल्यामुळे ‘कोविड-19’च्या आजाराची गुंतागुंत वाढून ‘कोविड’मुळेच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

लोकांमध्ये ‘कोविड-19’ची भीती इतकी बसली आहे, की ते या कठीण प्रसंगी वैद्यकीय मदत वेळेवर घेण्यातही टाळाटाळ करू लागले आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांचे गंभीर रुग्ण गुंतागुंत झाल्यावरदेखील उपचार घेण्यात विलंब लावत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांमध्ये ‘कोविड’चे व इतर रुग्ण यांना स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था आहे व त्यांच्यावर वेगवेगळे डॉक्टर उपचार करीत आहेत, स्वच्छतेचे व शारिरीक अंतर पाळण्याचे नियम तेथे काटेकोरपणे पाळले जात आहेत, हे समजावून दिले, तर या रुग्णांची भिती घालवता येऊ शकेल.

“हृदयविकाराचा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा”, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे. म्हणूनच आपल्या हृदयाचे ऐकू या आणि ते निरोगी ठेवण्यासाठी काय लागते, हे समजून घेऊ या. गरज पडल्यास वेळेवर उपचार करून आपल्या हृदयाचे आणि कोरोना व्हायरसपासून असुरक्षित असणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व मार्ग अवलंबू या. उपचार करून घेण्यात पौंड खर्च करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर औंस खर्च करणे कधीही चांगले! चला, सर्वांनी मास्क घालणे, हात निर्जंतूक करणे, शारिरीक अंतर राखणे हे नियम पाळू या आणि कोरोना व्हायरसला दूर ठेवू या.

(लेखक मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये एम सीएच, डीएनबी, एफआरसीएस कन्सल्टंट-अॅडल्ट कार्डियाक सर्जरी व हार्ट ट्रान्सप्लान्टेशन कार्यरत आहेत )

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page