Subhash chandra Bose

Subhash chandra Bose

Sachin Gulig

✳ हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद



१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.


ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.


आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.


१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.



✳ काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा



१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.


१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.


सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.


पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.


१९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.


अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.



✳ फॉरवर्ड ब्लॉक 


मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.


दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरका


रने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.



✳ नजरकैदेतून पलायन



नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.


काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.



✳ हिटलरची भेट



बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.


अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.


काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.


शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.



✳ पूर्व आशियातील वास्तव्य


पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.


नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.


ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.


आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.


पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.


द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेता


जींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.


आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.


जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.



✳बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी



दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.


ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.


ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.


अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.


स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.


१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.


ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.


सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या. २०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.



✳ भारतरत्‍न पुरस्कारसंपादन करा१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे


सोर्स :- Wikipedia

संकलन :- Sachin Gulig

Report Page