Join @Skdeolankar

Join @Skdeolankar

https://t.me/skdeolankar

चीनमधील साम्यवादी राजवटीची सत्तरी  

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर


चीनमधील साम्यवादी राजवटीने 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 ऑक्टोबर 2019 रोजी शी जिनपिंग यांनी आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन जगाला घडवून आणले. 1949 ते 2019 असा चीनच्या प्रगतीचा आलेख हा कमालीचा थक्क करणारा आहे. 70 वर्षांमध्ये एखादे राष्ट्र इतकी प्रचंड आर्थिक प्रगती करते हे उदाहरण अत्यंत उल्लेखनीय आहे. आज चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. तथापि, चीनला हे यश सहज मिळालेले नाहीये. यासाठी चीनला प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. याप्रसंगी चीनचा हा संघर्षाचा इतिहास समजून घेणे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्रांतीचे योगदान समजून घेणे सयुक्तिक ठरणार आहे. 

--------------

प्रस्तावना:-

1 ऑक्टोबर 2019 रोजी चीनमधील साम्यवादी राजवटीने 70 वर्षे पूर्ण केली. 1 ऑक्टोबर 1949 रोजी चीनमध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्त्वाखाली साम्यवादी राजवट प्रस्थापित झाली. माओने शिआन कै शिंग च्या राष्ट्रवादी फौजांबरोबर संघर्ष करत लॉन्ग मार्चच्या माध्यमातून चीनमध्ये साम्यवादी राजवट प्रस्थापित केली. 1949 ते 2019 असा चीनच्या प्रगतीचा आलेख हा कमालीचा थक्क करणारा आहे. 70 वर्षांमध्ये एखादे राष्ट्र इतकी प्रचंड आर्थिक प्रगती करते, जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकते हे उदाहरण अत्यंत उल्लेखनीय आहे. आज चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. तथापि, चीनला हे यश सहज मिळालेले नाहीये. यासाठी चीनला प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. चीनच्या पुनर्बांधणीमध्ये अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे योगदान साम्यवादी चीनचे संस्थापक माओ त्से तुंग यांचेही आहे. त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीने चीनच्या आजच्या सामर्थ्याचा पाया रचला. माओची सांस्कृतिक क्रांती ही खर्‍या अर्थाने चीनला एक नवे रुप देणारी होती. माओने घातलेल्या पायावर कळस चढवला तो डेंग शियाओपेंग यांनी. त्यांनी 1980च्या दशकामध्ये आधुनिक चीनच्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला. साम्यवादी राजवट असतानाही आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वकारला. या माध्यमातून चीनची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच काळात चीनने आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना आखायला सुरुवात केली. डेंग शियाओपेंग यांनी चीनच्या आर्थिक विकासाचा पाया घातल्यानंतर 21 व्या शतकात त्याची फळे चीनला मिळाली. आज चीन उत्पादनाच्या क्षेत्रात सर्वांत अग्रेसर आहे. जीडीपीतील या क्षेत्राचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. चीन साम्यवादी झाला तेव्हा आता राष्ट्राध्यक्ष असणारे शी जिनपिंग जन्मलेलेही नव्हते. पण त्यांना चीनच्या या संघर्षाच्या इतिहासाची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा माओ त्से तुंग यांच्या प्रमाणे साम्यवादी पक्षाची पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनमध्ये व्यक्तीकेंद्रीत सत्ताकारण सुरू झाले आहे. 2015 मध्ये साम्यवादी पक्षाच्या महत्त्वपूर्ण परिषदेत शी जिनपिंग यांना 2029 पर्यंत राष्ठ्राध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या दहा वर्षांत आर्थिक महासत्ता बनण्याचा संकल्प चीनने सोडला आहे. त्याअंतर्गतच वन बेल्ट वन रोड, मॅरिटाईम सिल्क रुट यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आल्या आहेत. चीनचा प्रवास जागतिक महासत्तेच्या दिशेने होत आहे. 1 ऑक्टोबर 2019 रोजी शी जिनपिंग यांनी आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन जगाला घडवून आणले. त्यासाठी बीजिंगच्या चौकामध्ये मोठी लष्करी परेड आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात शी झिनपिंग यांनी भविष्यात चीन कशा प्रद्धतीने विकास करणार आहे याचा आलेख मांडला. एकूणच काय, तर चीन लवकरच क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. याप्रसंगी चीनचा हा संघर्षाचा इतिहास समजून घेणे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्रांतीचे योगदान समजून घेणे सयुक्तिक ठरणार आहे.


माओ कालखंड आणि सांस्कृतिक क्रांती:-


16 मे 1966 रोजी या क्रांतीची सुरुवात चीनमध्ये झाली होती. या सांस्कृतिक क्रांतीला चीनमधील तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांच्या कारकिर्दीमधील शेवटची क्रांती (लास्ट बॅटल ऑफ माओ) असेही म्हटले जाते. 1976 मध्ये माओ त्से तुंग यांचा मृत्यू झाला, तोपर्यंत ही सांस्कृतिक क्रांती सुरू राहिली. माओंनी 1969 मध्ये ही क्रांती संपली असे अधिकृतरित्या घोषित केलेले असले तरी ती क्रांती जवळपास चीनचे एक दशक या क्रांतीमध्ये व्यतीत झाले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या क्रांतीचा प्रभाव 50 वर्षांनंतरही आज चीनवर दिसून येतो आहे. 


ही क्रांती का सुरू झाली?:-


ही सांस्कृतिक क्रांती म्हणजे माओ त्से तुंग यांनी सुरू केलेली शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. ही प्रक्रिया प्रामुख्याने भांडवलवादी प्रभावापासून चीनला शुद्ध करण्याच्या हेतूने केली होती. किंबहुना, चीनमध्ये साम्यवादाचा कमी होत गेलेल्या प्रभाव पुन्हा एकदा मजबूत करणे हा यामागे हेतू होता. चीनच्या राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असणार्या काही भांडवलवादी प्रवृत्तींनी त्या काळात तोंड वर काढायला सुरुवात केली होती. या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ही सांस्कृतिक क्रांती सुरू झाली होती. या भांडवलवादी प्रवृत्तींचा पूर्णपणे बिमोड करणे, भांडवलवादाच्या प्रभावातून चीनला मुक्त करणे आणि संपूर्ण चीनमध्ये साम्यवादाचा पगडा मजबूत करणे हा या सांस्कृतिक क्रांतीमागचा उद्देश होता. या क्रांतीने दहा वर्षे संपूर्ण चीनला ढवळून काढले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना, नंतर कामगारांना आणि नंतर सैन्याला आळीपाळीने वापरण्यात आले. ज्या-ज्या ठिकाणी भांडवलवादी तत्त्वे आढळली तेथे तेथे त्यांचा अतिशय हिंसक पद्धतीने बिमोड करण्यात आला. लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. हजारो लोकांना मारण्यात आले. एकंदरीतच, अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतीने ही शुद्धीकरणाची चळवळ चीनमध्ये राबवली गेली. साम्यवादाची पकड मजबूत करण्याबरोबरच चीनवरील परकीय किंवा भांडवलवादाचा प्रभाव चीनमध्ये येऊ नये यासाठी नियोजनबद्धत आखणी करून केलेले हे कृत्य होते. 


 चीन काय शिकला?:-


आज पन्नास वर्षांनंतर या सांस्कृतिक क्रांतीमधून चीन काय शिकला आहे, या क्रांतीच्या वेळी असणारा चीन आजही तसाच आहे का, या क्रांतीमधून माओने जी मूल्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता ती मूल्ये आजही टिकून आहेत का आणि आजचा चीन हा सांस्कृतिक क्रांतीचेच अपत्य आहे का, तीच तत्त्वे किंवा मूल्ये आज चीन जोपासतो आहे का या प्रश्नांची उत्तरे शोधणे औचित्याचे ठरेल. यासंदर्भात इतिहासकारांची मते पाहिली तर त्यामध्ये बरीच मतभिन्नता आढळते. काही इतिहासकार या सांस्कृतिक क्रांतीचे दशक म्हणजे चीनच्या आर्थिक विकासाच्या, राजकीय-सामाजिक वाटचालीतील अतिशय वाईट काळ मानतात. आजदेखील चीनमध्ये अधिकृतरित्या सांस्कृतिक क्रांतीवर चर्चा किंवा वादविवाद केले जात नाहीत. तसे करण्याची परवानगी तेथील जनतेला नाही. अशा प्रकारची चर्चा सुरू केल्यास चीनमधील माओच्या परंपरेला खिळ बसेल आणि चीनमधील साम्यवादी पक्षाची एकपक्षीय राजवट कमकुवत होईल अशी मानसिकता तेथे आहे. त्यामुळेच लोकांना उघडपणे या विषयावर बोलण्याची अनुमती नाही. प्रसारमाध्यमांनाही नाही. आज चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या पन्नाशीची चर्चाही तेथे पाश्चिमात्य माध्यमांमधून होते आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या क्रांतीचा प्रभाव तपासून पाहणे आवश्यक आहे.  

या सांस्कृतिक क्रांतीचा पहिला परिणाम म्हणजे या क्रांतीने डेंग शियाओपेंग यांच्या नेतृत्त्वाच्या उदयाला पोषक अशा प्रकारची पार्श्वभूमी तयार केली. 


डेंग कालखंड :आर्थिक उदारीकरणाचे वारे :-


1976 मध्ये माओंचा मृत्यू झाल्यानंतर डेंग यांच्या हाती सत्तेची सूत्रे आली. वास्तविक, डेंग हे या सांस्कृतिक क्रांतीला बळी पडलेले नेते होते. या क्रांतीच्या काळात त्यांच्यावर मोठा अन्याय झाला होता. परंतु याच डेंग यांनी या सांस्कृतिक क्रांतीच्या नकारात्मक प्रभावातून चीनला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच काळात साम्यवादाकडून भांडवलवादाच्या दिशेने चीनचा प्रवास सुरू झाला. बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे चीन वळला. डेंग यांच्या काळातच चीनमध्ये आर्थिक उदारीकरणाचे, काही प्रमाणात खासगीकरणाचे वारे वाहू लागले. याच डेंग यांनी चीनच्या विकासाचा 20 वर्षांचा आराखडा आखला आणि या आरखड्यामध्ये शियाओपेंग यांनी पाश्चिमात्य अर्थतज्ज्ञांनी मांडलेल्या विकासाच्या नव्या तत्त्वांनुरुप चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भांडवलवादी तत्त्वांवर चीनचा कशा पद्धतीने विकास करता येईल हे डेंग यांनी दाखवून दिले.


त्यातूनच संपूर्ण चीनची अर्थव्यवस्था कृषीप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे परावर्तित झाली. आज चीनचे पश्चिमी जगताबरोबर आणि अमेरिकेबरोबर असणारे व्यापारीसंबंध हे खूप व्यापक बनलेले आहेत. अमेरिकेबरोबर चीनचा असणारा व्यापार सुमारे 500 अब्ज डॉलर्स इतका आहे. पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. चीननेही या देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. चीनमधील अनेक नागरिक आज परदेशांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे माओच्या काळातील चीन आज उरलेला नाही. आज चीन हा भांडवलवादाकडे झुकलेला दिसत आहे. आज चीनी नागरिक हा व्यक्तिगत अधिकारांविषयी सजग बनलेला दिसत आहे, जो माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या काळामध्ये नव्हता. आज चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो प्रचंड बदल घडलेला दिसत आहे, त्याला ही सांस्कृतिक क्रांती कारणीभूत ठरली आहे. कारण या क्रांतीच्या काळात चीनमध्ये औद्येागिक उत्पादन कमालीचे घटले होते. चीनचा व्यापार घटला होता. गरीबी प्रचंड वाढली होती. त्यामुळे चीनने जी भांडवलवादी आर्थिक विकासाची तत्त्वे स्वीकारली त्याची पार्श्वभूमी या क्रांतीने तयार केली होती. आर्थिक दृष्ट्या चीन पूर्णपणे बदललेला असला तरी राजकीय दृष्ट्या विचार करता माओंच्या सांस्कृतिक काळातील चीन आजही तसाच दिसून येतो.


शी झिनपिंग कालखंड :साम्यवादाची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न: -


माओंनी सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीची राजकीय व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच स्वरुपाची राजकीय व्यवस्था चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्याकडून आणण्याचा प्रयत्न होत आहे. माओंनी ज्याप्रमाणे साम्यवादाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे शी झिनपिंग हे आपला व्यक्तिगत प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा आणि साम्यवादाची पक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही चीनमध्ये विरोधी पक्षांना स्थान नाही. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था मुक्त नाहीत. आजही चीनमध्ये लोकांना आपली मते मुक्तपणाने मांडण्याचा अधिकार नाही. आजही चीनमध्ये अल्पसंख्यांकांची आंदोलने हिंसक पद्धतीने दडपली जातात. शिनशियाँग, तिबेट यांसारख्या भागातील अल्पसंख्यांकांचे उठाव हिंसक मार्गाने दाबून टाकले जातात. आज चीनमध्ये साम्यवादी पक्षाशिवाय इतर कोणत्याही पक्षाला स्थान नाही. 


आजच्या चीनच्या प्रमुख समस्या :-


आज चीनमध्ये प्रामुख्याने दोन अतिशय महत्त्वाच्या समस्या आहेत. पहिली समस्या भ्रष्टाचाराची आहे. दुसरी समस्या म्हणजे, सरकारविरुद्ध टीका करण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीविरुद्ध शी झिनपिंग यांनी अघोषित अंतर्गत युद्ध सुरू केले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हजारो लोकांंना तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत कारभारावर टीका करणारे परदेशात स्थायिक झालेल्या चिनी नागरिकांना संपवण्याचा प्रयत्न शी जिनपिंग यांच्याकडून होत आहे. आजही चीनमध्ये गुगल, फेसबुक यांसारख्या नवसमाजमाध्यमांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांनाही शासनावर टीका करण्याची परवानगी नाही. चीनमधील साम्यवादी पक्षाने 90 वर्षे पूर्ण केली आहे. 2021 मध्ये हा पक्ष शंभरी पूर्ण करत आहे. इतक्या वर्षांत हा पक्ष बळकट बनत चाललेला आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे. 

मुळात चीनमध्ये झालेली सांस्कृतिक क्रांती ही परराष्ट्रांच्या प्रभावातून या देशाला मुक्त करण्यासाठी होती. आजघडीला शी झिनपिंग हे अमेरिकेच्या माध्यमातून होणार्या भांडवलशाही आणि भांडवलवादी तत्त्वांचे बीजारोपणाविषयी चिंताग्रस्त आहेत. आजही परकीय प्रभावापासून चीनला, तिथल्या नागरिकांना, साम्यवादी पक्षाला अलिप्त ठेवण्यासाठी तेथील राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. याचाच अर्थ माओंचा उद्देश आज इतक्या वर्षांनंतरही साध्य होताना दिसतो आहे. सांस्कृतिक क्रांतीच्या प्रक्रियेत चीनमध्ये सैन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो. त्या दृष्टीने माओंच्या रेड आर्मीला खूप महत्त्व प्राप्त झाले होते. आजही चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले जात आहे. या सैन्याच्या आधुनिकीकरणाचे प्रयत्न अत्यंत झपाट्याने सुरू झालेले दिसून येतात. म्हणजेच माओच्या काळापासून सुरू असलेला सैन्याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न आजही कायम असल्याचे दिसून येते. 

मध्ययुगीन काळापासून चालत आलेली झिरो-सम गेम ही विचारसरणी चीनमध्ये आजही प्रभावी आहे. सांस्कृतिक क्रांतीच्या दरम्यान याच विचासरणीच्या आधारावर माओने विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. या विचासरणीनुसार प्रत्येक गोष्टीकडे हार आणि जीत याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. ही मानसिकता कायम असल्यामुळेच चीन आजही आपले विस्तारवादी धोरण आक्रमक पद्धतीनेच अवलंबत होता. दक्षिण पूर्व आशिया, उत्तर पूर्व आशियामधील चीनचा विस्तारवाद हेच दर्शवतो की चीन आजही हारणे किंवा जिंकणे याच दृष्टिकोनातून जगाकडे पाहात आहे. आर्थिक उदारीकरणामुळे चीनच्या सामाजिक व्यवस्थेवर त्याचा नक्कीच परिणाम झाला आहे. परंतु राजकीय दृष्ट्या विचार करता माओच्या काळातला चीन आजही कायम आहे.


चीनमधील परस्परविरोधी प्रवाह :-


आज चीनमध्ये एकाच वेळी दोन प्रवाह दिसून येताहेत. एकीकडे शी झिनपिंग साम्यवादाचा, स्वतःचा आणि लष्कराचा प्रभाव वाढण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत तर दुसरीकडे आर्थिक विकासामुळे इतर जगाबरोबर वाढलेल्या संवादामुळे तिथे व्यक्तिस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे एकीकडे साम्यवादाची बंदिस्त पकड आणि दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्य यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न चीनमधील राजकीय नेतृत्त्वाला करावा लागत आहे. भविष्यात या सांस्कृतिक क्रांतीचा प्रभाव कसा असेल हे पाहताना चीनमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय होतो की साम्यवादाच्या पगड्याचा हे पाहावे लागेल. पुढील एक दशकाच्या काळात चीनचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी कशा प्रकारे एकीकरण होते हे पहावे लागेल. 

गेल्या 70 वर्षांपासून चीनने आपल्या विकासाच्या टप्प्यावर अनेक संघर्षांचा सामना केला आहे. भविष्यात चीनचे महासत्ता बनणे किंवा अमेरिकेची जागा घेणे हे काही गोष्टींवर निर्भर आहे. 

1) यातील पहिली गोष्ट म्हणजे आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये चीनच्या वाढत्या विस्तारवादाविषयी कमालीची साशंकता आणि असुरक्षितता आहे. शी जिनपिंग ती कशी दूर करतात हे पाहावे लागेल. 

2) आज अनेक देशांसोबत चीनचे सीमावाद सुरू आहेत. अनेक बेटांवरुन चीनने वाद उकरुन काढलेले आहेत. यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची भाषा चीन करत असतो. पण या गोष्टी सामोपचाराने कशा सोडवता येतील आणि त्यातून विश्वास संपादन कसा करता येईल हे चीनने पाहणे गरजेचे आहे. 

3) चीनच्या अंतर्गत दुखण्यांमध्ये हाँगकाँगचा प्रश्न सध्या कमालीचा चिघळला आहे. हा प्रश्न चीन कशा प्रकारे हाताळते, त्याचप्रमाणे शिनशियाँग प्रांतात अल्पसंख्यांक उघुर मुस्लिमांचा प्रश्न चीन कशा प्रकारे सोडवते यावर बरेच काही अवलंबून आहे. 

4) याखेरीज चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी कमालीची साशंकता आहे. या प्रकल्पामुळे काही राष्ट्रांच्या सार्वभौमत्त्वाचा संकोच होतो आहे, असे आक्षेप घेतले जात आहेत. त्यांचे निरसन चीनला करावे लागणार आहे. 

एकंदरीतच, सर्वांना विश्वासात घेऊन सामूहिक हित जपण्यासाठी चीन काही करतो का हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. चीनच्या पारंपरिक विचारसरणीमध्ये ‘झिरोसम गेम’ ही संकल्पना आहे. म्हणजेच आपण जिंकण्यासाठी दुसर्‍या कुणीतरी हरणं गरजेचं आहे. ही मानसिकता, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्न चिघळत ठेवून युद्धाच्या माध्यमातूनच सोडवायचा ही मानसिकता चीनला पूर्णपणाने बदलावी लागणार आहे. चीन अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा, परिषदांचा सदस्य आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून चीनने चर्चेच्या आणि विश्वासाच्या माध्यमातून प्रश्न हाताळले तर भविष्यात चीनला महासत्ता बनणे अवघड ठरणार नाही.