सौदी अरेबियाचा पाकिस्तानला झटका, एक अब्ज डॉलरचं कर्ज फेडायला लावलं

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला झटका, एक अब्ज डॉलरचं कर्ज फेडायला लावलं

https://t.me/LoksattaOnline

जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर पाकिस्तानला ओआयसी संघटनेची साथ मिळू शकली नाही. त्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबियाला जबाबदार धरलं आहे. ओआयसीकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सौदी अरेबियावर जाहीरपणे बरीच आगपाखड केली. त्याची किंमत आता पाकिस्तानला चुकवावी लागत आहे.

सौदी अरेबियाने पाकिस्तानला १ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करायला भाग पाडलं. २०१८ मध्ये सौदीने पाकिस्तानला ३.२ अब्ज डॉलरच कर्ज दिलं होतं. त्याचा हा भाग आहे. पाकिस्तानची जाहीरपणे सौदीवर टीका त्यानंतर सौदीने कर्ज फेडायला सांगणे हे सौदी आणि पाकिस्तानमध्ये आता पूर्वीसारखे घनिष्ठ संबंध राहिले नसल्याचे संकेत आहेत.

“आम्ही ओआयसीचा मान ठेवतो. ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीद्वारे आम्हाला अपेक्षा आहेत. जर ही बैठक आपण बोलावू शकत नसाल तर काश्मीर मुद्द्यावर आमच्यासोबत असलेल्या इस्लामिक राष्ट्रांची बैठक बोलावण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगण्यास मी बांधिल आहे,” असं कुरेशी म्हणाले होते. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी एआरव्हायला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मागच्याच आठवडयात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला एकवर्ष पूर्ण झालं. पाकिस्तानने यूएनपासून सर्वत्र हा मुद्दा उचलण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण चीन, टर्की या दोन देशांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना फारशी कोणाची साथ मिळाली नाही. ओआयसीकडून त्यांना भरपूर अपेक्षा होत्या. पण तसे काही घडले नाही.

भारताच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पाकिस्तान मागच्या अनेक महिन्यांपासून इस्लामाबादमध्ये ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मार्गात असल्यामुळे त्यांना ही बैठक बोलवता आलेली नाही. सौदीने फक्त ओआयसीच्या कॉन्टॅक्ट ग्रुपच्या बैठकीला परवानगी दिली. संयुक्त अरब अमिरातीकडून पाकिस्तानला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. यूएई सुद्धा या मुद्यावर सौदी अरेबियाला साथ देत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट सौदीलाच लक्ष्य केले.

Report Page