सखी, राज्ञी आणि रक्षणकर्ती

सखी, राज्ञी आणि रक्षणकर्ती

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
डॉ. भारती सुदामे

तारणकर्ती, रक्षणकर्ती आणि विजयश्री खेचून आणणारी अशी स्त्री ही कोणत्याही पुरुषाची शक्ती असते. या दोघी दस्यूंच्या पत्नी होत्या. राज्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांच्या राज्याला होणारा आर्यांचा उपद्रव कायमचा थांबवू शकल्या.

' क्षुध्यद्भ्यो वय आसुतिं दाः।' 'हे इंद्रा, विपन्नावस्थेला प्राप्त झालेल्या आम्हाला, अन्न पाण्यावाचून भुकेलेल्यांना, अन्नपाणी दे रे!' जिकडेतिकडे याच प्रार्थनेचा आर्त स्वर निनादत होता. आर्यावर्तातील अनेक राजे, प्रजाजनांसह देवेंद्राची करुणा भाकत होते. सर्वदूर दुर्भिक्ष पसरले होते. एरवी स्वतःच्या पराक्रमाचा टेंभा मिरविणारे आर्य हतबल झाले होते. काय करावे, ते त्यांना सुचत नव्हते. आर्य आणि दस्यू यांच्यातील कधी सुरू झालं आणि कधी संपले, याचा कधी ताळमेळ बसलाच नाही; कारण ते काही नोंद ठेवता येईल असे एखाद-दुसरे युद्ध नव्हते. या लोकांमध्ये केव्हाही युद्ध आरंभ होई आणि समाप्त होत नाही, तो पुन्हा सुरुवात झालेलीच असे. काही ना काही कुरापात काढून त्यांच्यात सततच युद्धे होत असत. किती काळ लोटला, तरी त्यांची युद्धाची खुमखुमी काही कमी होत नव्हती.

आर्यांच्या बाजूने युद्ध करायला अनेकदा देवराज इंद्र येत असे. त्याचे अमाप बळ, युद्धकौशल्य, सैन्यातील अनुशासन, '' नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत वेगवान, चपळ आणि शूर समूहाचे साह्य नेहमीच इंद्राला लाभत असे. या सगळ्यांच्या प्रभावामुळे तो ज्या कोणाला साह्य करायला जाई, त्याचा विजय निश्चित असे. बहुतेक वेळा तो आर्यांच्याच बाजूने असे; कारण आर्य लोक यज्ञ करून त्याला प्रसन्न करून घेत असत. आर्यांचे प्रमुख शत्रू असुर, दास किंवा दस्यू, राक्षस, दानव, पणी वगैरे अनेक समुदाय होते. त्यांच्याकडे सुरक्षितता आणि सामर्थ्य दोन्ही असूनही, अनुशासन व युद्धकौशल्याचा अभाव असल्यामुळे पराभव होत असे.

याही वेळेस असेच घडले. 'कुयव' नावाचा एक दासराजा होता. त्याला 'अंजसी' आणि 'कुलिशी' नावाच्या दोन राण्या होत्या. दोघीही अत्यंत शूर, धाडसी, चतुर आणि नवनवीन योजना आखण्यात प्रवीण. आजवर आर्यांनी त्यांच्या समूहांवर, त्यांच्या पाणवठ्यावर आणि शस्त्रास्त्र साठ्यावर आक्रमणे करून केवळ या गोष्टीच नव्हे, तर त्यांचे गोधनही पळवून नेले होते. आता त्यांना अडवणे आणि धडा शिकवणे या गोष्टी आवश्यक होऊन बसल्या आहेत, हे या दोघींच्याही लक्षात आले. त्यांनी बाकीच्या दस्यूराजांशी एकी केली, योजना आखली आणि आर्यांचा उपद्रव व इंद्राचा पराक्रम दोन्हीही निष्प्रभ करण्याचा जणू चंगच बांधला.

योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी प्रथम आर्यांचे धनाचे लपवून ठेवलेले साठे शोधून काढले, ते लुटून घेतले. त्यांच्या जवळजवळ सगळ्या धनाचे अपहरण केले म्हणा ना! त्यांचे अन्नाचे साठे शोधून तेही लुटले आणि सरते शेवटी, आपल्या अडवून ठेवलेल्या पाण्याच्या साठ्यांवर कडक पहारे बसवले; जेणेकरून परकीयांना त्याचा वापर करता येऊ नये. या राण्यांनी युद्धशास्त्रातला असा हा अमोघ डाव आर्यांवर टाकताच ते जेरीस आले, अन्नपाण्यावाचून तडफडू लागले. आता त्यांचा त्राता होता एकमेव इंद्र! इंद्राला प्रसन्न करायचे, तर यज्ञ करायला हवा. त्यासाठी धन हवे, संपत्ती हवी. ती तर दस्युराण्यांनी हिरावून घेतली होती. त्यातूनही जे काही शिल्लक आहे, त्यातून यज्ञ करायचा ठरवला, तर दस्यू त्यात विघ्न आणणार. आर्य नेत्यांना काही सुचण्यापूर्वीच या राण्यांनी डाव रचला. इंद्र युद्धक्षेत्री पोहोचणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी, इंद्राला युद्धासाठी प्रोत्साहित करणाऱ्या त्याच्या प्रिय सोमरसाचे साठे पळवून आणले, दूध देणाऱ्या गायी आणि दुधाचे साठेही पळवले. एवढ्या विपुल प्रमाणात प्राप्त झालेल्या दुधाचे काय करणार, तर त्या दोघींनी चक्क आपल्या पतीला, राजा कुवयाला त्या दुधाने स्नान घातले.

या सगळ्या घटनांनी इंद्र चिडला. त्याने कुवयाने निर्माण केलेले, पहारा बसवलेले पाण्याचे साठे, बांध फोडून मुक्त केले, तसे सगळीकडे पाणीच पाणी झाले, पूरसदृश स्थिती निर्माण झाली. राजा कुवय त्या पुरात सापडला, बुडू लागला. त्याच्या त्या शूर, धाडसी राण्यांनी त्या पुरात उडी घेतली आणि अत्यंत कौशल्याने पोहत जाऊन त्याचा जीव वाचवला. अत्यंत मेहनत घेऊन फुटलेले बांधारे सांधले. आर्यांना आणि इंद्रालाही डिवचण्यासाठी राजाला पुन्हा दुधाने स्नान घातले. एवढे करून त्या थांबल्या नाहीत, तर त्या वीरपत्नींनी, अत्यंत चातुर्याने सोमरसाचा उपयोग करून प्रत्यक्ष इंद्रालाच वश करून घेतले. तेव्हा त्यांच्याशी संधी करण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय आर्यांजवळ उरला नाही. ते निमूटपणे शरण गेले आणि 'कुयवलोक इंद्राला आमच्याकडे परत घेऊन येवोत,' अशी प्रार्थना करू लागले.

तारणकर्ती, रक्षणकर्ती आणि विजयश्री खेचून आणणारी अशी स्त्री ही कोणत्याही पुरुषाची शक्ती असते. या दोघी दस्यूंच्या पत्नी होत्या. राज्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांच्या राज्याला होणारा आर्यांचा उपद्रव कायमचा थांबवू शकल्या. अशीच कथा 'नमुचि' नावाच्या दस्यूराजाच्या राणीने उभारलेल्या स्त्रीसेनेची आहे. या राजाच्या स्त्रीसैन्याने प्रत्यक्ष समोरासमोर झालेल्या युद्धात प्रत्यक्ष इंद्राला पराभूत केले. अंजसी आणि कुलिशी असोत, नमुची राजाची राणी असो किंवा आपल्या बाहुहीन पुत्राला, वृत्राला पाठीशी बांधून लढणारी त्याची माता, दानू असो, या सगळ्या दस्यूंच्या राज्यातल्या स्त्रिया होत्या. दस्यू हे कायम पराजीतच गणले गेले आणि पराजितांच्या इतिहासावर कोणी कवने रचत नाहीत; त्यामुळे कितीही शूर, धाडसी, चतुर वा राजकारणकुशल असोत या स्त्रिया, इतिहासाने त्यांची क्वचितच दखल घेतली आहे. गुणी व्यक्ती, मग त्या जेत्यांकडच्या असोत वा पराजितांच्या बाजूच्या, त्यांच्यातील जे उत्तम आहे, त्याची दखल घेतली जायलाच हवी.



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page