विद्या

विद्या

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
योगश्री शरदशास्त्री जोशी

विद्या म्हणजे . विद्येचे महत्त्व 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।' या वचनाद्वारे सिद्ध होते. भारतीय ज्ञानसाधनेतील श्रुती आणि स्मृतींमध्ये दहा धर्मलक्षणे आहेत. यामध्ये विद्या हे प्रमुख लक्षण आहे. म्हणतात, 'जो विद्येचे महत्त्व जाणतो, तो भाग्यवंत आहे.' कवी भर्तृहरिने, 'विद्या मानवाचे श्रेष्ठ रूप, धन, श्रेष्ठ दैवत आहे,' असे म्हटले आहे. 'विद्यारूपी धनाची कधीच चोरी होत नाही. विद्येचे ओझे नसते, उलट विद्यादान केल्याने ती वर्धिष्णू होते,' असे सुभाषित आहे. योगवासिष्ठामधील संदर्भ पाहू - 'विद्याप्राप्तीसाठी वारंवार अभ्यास आवश्यक आहे; त्यामुळे अज्ञदेखील तज्ज्ञ होतो. धनुर्धराच्या अभ्यासामुळेच अचेतन बाण सूक्ष्म लक्ष्याचा वेध करू शकतो; तसेच विद्येने मानवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तो सूर्यासारखा तेजस्वी बनून निर्भयता प्राप्त करतो.' भारतातील महापुरुषांनी-शास्त्रज्ञांनी विद्यारूपी तप:शक्तीने विश्वात श्रेष्ठत्व प्राप्त केले. उदा. योगी अरविंद, योगिराज श्रीगुळवणीमहाराज. त्यांनी स्थापन केलेल्या ज्ञान-योगपीठांमुळे अनेक जिज्ञासू ज्ञानसंपादनेसाठी उत्सुक आहेत. भारताचे 'चौदा विद्या चौसष्ट कला' हे वैभव मोठे विद्याधन आहे. कला शब्दाचा अर्थ आनंद आहे, 'कम् (=आनंद), लाति (=ददाति) इति कला'. विद्या-कला व्यावहारिक उपयुक्ततेचे साधनही आहेत. विद्यमान भारतीय शास्त्रज्ञ-संशोधकांनी भारतीय कला-विद्यांना आधुनिक तंत्रज्ञाने जागतिक स्तरावर आणणे, ही काळाची गरज आहे. या योगे विद्यावैभवाचे दालन नव्या पिढीला उपलब्ध होईल. सध्याच्या स्पर्धात्मक युगात, विविध क्षेत्रांत अनेक जण प्राविण्य मिळवून, उच्च विद्याविभूषित होतील. शास्त्रविद्या गुरूंकडून प्राप्त करणे आवश्यक आहे. एक घडलेला प्रसंग असा - गांधार देशातील एका विद्यार्थ्याला विद्यासंपादनाची जिज्ञासा होती. तो आचार्यांना प्रार्थना करतो. त्याच्या हस्तरेषा पाहून आचार्य म्हणतात, 'तुझ्या हातावर विद्यारेषा नाही; त्यामुळे विद्याप्राप्ती नाही.' तो खिन्न होतो. एका टोकदार यंत्राने आपल्याच हातावर रेष ओढतो व तो आचार्यांना सांगतो, 'ही पाहा माझ्या हातावरची रेषा. आता मला विद्येचा अधिकार आहे ना?' त्या विद्यार्थ्याने दृढनिश्चयावर विद्याप्राप्ती केली. हेच विश्वविख्यात व्याकरणशात्रज्ञ पाणिनी होत. संत विनोबा भावेंचा सर्वांसाठी बोधसंदेश असा, 'विद्याभ्यासासाठी कालाची मर्यादा नसते, विद्याभ्यासात सातत्य हवे आणि त्यावर श्रद्धा हवी.'



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page