रणनीतीचा विजय

रणनीतीचा विजय

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

मतदारांमध्ये नाराजी दिसते आहे, हे लक्षात आल्यानंतर तातडीने केलेल्या हालचाली, आक्रमक प्रचार आणि रणनीती यांमुळे भाजपने उत्तराखंडची सत्ता राखली. काँग्रेसने मात्र संधी गमावली.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षासाठीही अनपेक्षित ठरले आहेत. हे राज्य अस्तित्वात आल्यानंतर, तेथे कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सत्ता मिळालेली नाही. भाजप मात्र पुन्हा सत्ता मिळविण्यात यशस्वी ठरला. या निवडणुकीस केवळ सहा महिन्यांचा कालावधी उरला असताना, भाजपने पाठोपाठ मुख्यमंत्री बदलले. यामुळे मतदारांमध्ये भाजपविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मुख्यमंत्री बदलल्याने भाजपमध्ये गटबाजी सुरू झाली. हटविण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपापले गट तयार केले. हे कमी म्हणून की काय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. अनेक नेते अन्य पक्षांशी घरोबा करू लागले. यातून भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसणार, असे चित्र निर्माण झाले होते. ही निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी सोपी नसेल, अशी चिन्हे दिसत होती. या स्थितीत भाजपने सत्ता राखून व सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला; मात्र विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी पराभूत झाले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारास पराभूत करणे, ही परंपराही उत्तराखंडात दिसून येते. भाजपचे बी. एस. खंडुरी व काँग्रेसचे हरिश रावत यांनी या परंपरेचा अनुभव घेतला आहे.

डावपेच व रणनीती

आपल्याविरोधात नाराजी आहे व ही निवडणूक आव्हानात्मक आहे, याची भाजपला वेळीच जाणीव झाली. यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर केंद्रीय नेतृत्वाकडून विचार करण्यात आला व त्याची अंमलबजावणीही झाली. निवडणुकीस चार महिन्यांचा कालावधी उरला असताना, भाजपने दोन मुख्यमंत्री बदलले. राज्य सरकारविरोधात असणाऱ्या जनभावनेचा आदर करीत, त्यांनी ती नाराजी दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दोन मुख्यमंत्री बदलल्यानंतर त्यांनी तरुण असणाऱ्या धामी यांना संधी दिली. धामी यांनीही अतिशय कमी कालावधीत लोकांमध्ये मिसळून प्रभावी काम केले व पक्षाची; तसेच स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण केली. भाजपने आक्रमक प्रचारावर भर देत, प्रत्येक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक मतदारसंघासाठी आवश्यक असणारी रणनीती आखली व अमलात आणली. येथे गंगोत्री मतदारसंघाचे उदाहरण देता येईल. आम आदमी पक्षाने तेथे कर्नल कोठियाल यांना उमेदवारी दिली होती. कोठियाल हे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते; त्यामुळे भाजपने त्या मतदारसंघात दिवंगत सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांचे बंधू निवृत्त कर्नल विजय रावत यांना प्रचारात उतरविले. हे डावपेच भाजपच्या पथ्यावर पडले.

भावनेचे राजकारण

भावनेचे राजकारणही भाजपच्या मदतीस धावून आले. राष्ट्रवाद, पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव, रेशनसह अन्य लोकोपयोगी योजना आणि काही प्रमाणात पायाभूत सुविधांच्या कामांना लाभलेली गती या भाजपसाठी जमेच्या बाजू ठरल्या. पंजाबच्या खालोखाल उत्तराखंडमधून मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती होते; त्यामुळे तेथील नागरिकांना देशभक्ती, राष्ट्रवाद हे मुद्दे आपलेसे वाटतात. '५६ इंची छाती असणारा पंतप्रधान' ही मोदी यांची प्रतिमाही भाजपसाठी येथे जमेची बाजू ठरते. येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी भाजपला भरभरून मते दिली, असे दिसून आले. बेरोजगारी, महागाई, दुर्गम भागांतील शैक्षणिक असुविधा, वैद्यकीय सेवेचा अभाव हे प्रमुख प्रश्न असूनही मतदारांनी राष्ट्रवाद, रेशन व लाभार्थी योजनांद्वारे बँक खात्यात थेट जमा होणारी रक्कम या भावनिक मुद्द्यांना पसंती दिली.

काँग्रेसला गटबाजी भोवली

काँग्रेसला ही निवडणूक जिंकण्याची मोठी संधी होती; मात्र त्यांनी ती गमावली. राज्यातील मोठ्या नेत्यांमधील बेबनाव, परस्परांचे पाय खेचण्याची स्पर्धा व भाजपला हरविण्यापेक्षा पक्षांतर्गत विरोधकांना पराभूत करण्याचे डावपेच काँग्रेसला महागात पडले. मतदानास काही दिवस उरले असताना ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केंद्रीय नेतृत्वासह राज्यातील नेत्यांवर सोशल मीडियावरून एवढे तोंडसुख घेतले, की काँग्रेसची जनमानसातील प्रतिमा खराब झाली. विरोधी पक्षनेते प्रीतमसिंह व रावत यांच्यातील जाहीर वाद थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिकिट वाटपापासून प्रचारापर्यंत हा वाद सुरूच होता. यामुळे काँग्रेसला एवढा फटका बसला, की प्रदेशाध्यक्ष गणेश गोंदियाल यांनादेखील पराभव पत्करावा लागला. गटबाजी व्यतिरिक्त कमजोर पक्ष संघटनाही काँग्रेससाठी मारक ठरली. सर्वसाधारणपणे प्रस्थापितविरोधी लाट अनेकदा आढळते. त्याचा फायदा घेण्यातही काँग्रेसला अपयश आले. विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे भाजपला कोंडीत पकडणे त्यांना शक्य झाले नाही. भाजपने मात्र काँग्रेसविरोधात सतत आक्रमक पवित्रा घेतला. मुस्लीम विद्यापीठाच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला कोंडीत पकडले. या हिंदूबहुल राज्यात हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. एकूणच, सत्तांतर घडविण्याची सुवर्णसंधी काँग्रेसने गमावली व भाजपने सलग दुसऱ्यांदा या पहाडी राज्याची सत्ता सर केली.

(अनुवाद : अनिरुद्ध भातखंडे)



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page