राज्यावर जलसंकट

राज्यावर जलसंकट

https://t.me/LoksattaOnline

प्रथमेश गोडबोले

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जूनच्या सुरुवातीला राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली असून सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकू ण फक्त ३९.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.

सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागातील धरणांमध्ये ५५ टक्के एवढा असून पुणे विभागातील धरणांमध्ये नीचांकी ३५.६२ टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यावरील जलसंकट गहिरे झाले आहे.

राज्यात लहानमोठी ३२६७ धरणे आहेत. त्यामध्ये १४१ मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि २८६८ लघु प्रकल्प आहेत. या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी ३ ऑगस्ट रोजी राज्यातील धरणांमध्ये ४४.९४ टक्के एवढा पाणीसाठा होता. मोसमी पावसाचा निम्मा हंगाम संपुष्टात आल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दिलेली ओढ कायम राहिल्यास यंदा राज्यातील सर्वच विभागांत पाण्याचे गंभीर संकट उभे राहणार आहे.

अमरावती आणि औरंगाबाद या विभागांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दोन्ही विभागातील धरणांमध्ये अनुक्रमे १५.९४ टक्के आणि ४.३४ टक्के एवढा पाणीसाठा होता. यंदा त्यामध्ये वाढ होऊन औरंगाबाद विभागात ३९.१४ टक्के , तर अमरावती विभागात ३६.०८ टक्के एवढा पाणीसाठा आहे. इतर विभागांच्या तुलनेत कोकण विभागानंतर नागपूर विभागाची स्थिती चांगली असून दोन्ही विभागात अनुक्रमे ५५.५७ टक्के आणि ५०.६६ टक्के एवढा पाणीसाठा सध्या आहे. नाशिक आणि पुणे विभागात गंभीर स्थिती असून या ठिकाणी अनुक्रमे ३६.३८ टक्के आणि ३५.६२ टक्के एवढा पाणीसाठा आहे, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.

दहा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा

राज्यातील काही भागांत चांगला पाऊस झाला असला, तरी दहा प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळमधील बेंबळा आणि पूस, औरंगाबाद विभागातील मांजरा आणि उस्मानाबादमधील सिना कोळेगाव, नागपूर विभागातील गोंदियामधील कालीसरार, नगरमधील मुसळवाडी पुच्छ तलाव, नाशिक विभागातील भाम, औझरखेड आणि पुणेगाव, तर पुणे विभागातील पिंपळगाव जोगे या प्रकल्पांचा समावेश आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

धरणांमधील पाणीसाठा टक्क्यांमध्ये

विभाग         वर्ष २०२० वर्ष २०१९

अमरावती      ३६.०८      १५.९४

औरंगाबाद      ३९.१४       ४.३४

कोकण       ५५.५७      ८५.८७

नागपूर        ५०.६६    २६.९५

नाशिक        ३६.३८    ४१.१३

पुणे           ३५.६२     ७०.११

सरासरी        ३९.८२     ४४.९४

Report Page