मानधन वाटपाचा नागपूर पॅटर्न राज्यभर लागू

मानधन वाटपाचा नागपूर पॅटर्न राज्यभर लागू

https://t.me/LoksattaOnline

राज्यातील मनरेगाच्या २५,२५८ ग्रामरोजगार सेवकांना दिलासा

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामस्तरावर कामांच्या सुसूत्रतेसाठी तसेच मजुरीसंदर्भात अभिलेखे व नोंदवह्य़ा ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकांना यापुढे थेट ग्रामपंचायतीमार्फत मानधन वितरण करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सुमारे २५ हजार २५८ ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळणार आहे. थेट मानधन वितरणाचा हा नवा पॅटर्न जिल्ह्य़ातील कामठी तालुक्यात प्रथम यशस्वी झाला. त्यानंतर राज्यभार लागू करण्यात आला.

मानधन वाटपातील विलंब टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात आला. तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींमधील रोजगार सेवकांच्या कामाचे १ एप्रिल ते ३० जूनपर्यंतच्या कामाचे ३ लाख ६७ हजार ९७४ रुपयांचे अनुदान थेट संबंधित ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आले व तेथून त्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर राज्यात हा प्रयोग राबवण्याचा निर्णय मनरेगाचे आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी घेतला.

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी ग्रामरोजगार सेवकांची महत्त्वाची भूमिका असून, रोहयोवरील मजुरांना त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तसेच मिळणारी मजुरी यांचे हजेरी बुक तयार करून मजुरांच्या खात्यात थेट मजुरी जमा करण्याची जबाबदारी आहे.

राज्यात २५ हजार २५८ ग्रामरोजगार सेवकांमध्ये नागपूर विभागात ३ हजार ४०९, अमरावती विभागात ४ हजार, औरंगाबाद विभागात ६ हजार ३४४, नाशिक विभागात ४ हजार ८६१, कोकण विभागात २ हजार ६४५ तर पुणे विभागात ३ हजार ९९६ ग्रामरोजगार सेवक आहेत. त्यांना या नव्या मानधन वितरण प्रणालीमुळे वेळेवर मानधन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

झाले काय? : पूर्वी मानधन खंडविकास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत होते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना वितरित झाल्यानंतर मानधन मिळत होते. या प्रक्रियेला होणारा विलंब कमी करून आयुक्तालयाने थेट मानधनाचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपातळीवर रोहयोची कामे प्रभावी व परिणामकारक राबवण्याकरिता ग्रामपंचायतीमार्फत ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline