भीष्माचार्य शरपंजरी

भीष्माचार्य शरपंजरी

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या वावटळीत अनेक दिग्गजांचा पाचोळा झाला. मुख्यमंत्री आणि यांच्याप्रमाणेच पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले मातब्बर नेते यांचा पराभव धक्कादायक ठरला. तब्बल दहा वेळा विधानसभेची निवडणूक जिंकणारे बादल यांना 'आप'चे गुरमितसिंग खुडिया यांनी घरी बसविले. पंजाबच्या राजकारणातील भीष्माचार्य मानले जाणारे बादल यांनी पाऊणशे वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अनेक चढउतार अनुभवले. १९४७ मध्ये सरपंच, १९५७ मध्ये आमदार झालेले बादल १९७० मध्ये मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. अनेक विजय-पराजयानंतर २०१७मध्ये पायउतार झाले, तेव्हा सर्वांत ज्येष्ठ मुख्यमंत्री होते! मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते काही काळ केंद्रीय कृषिमंत्री होते. अकाली दलाचे अध्यक्ष आणि शिरोमणी गुरूद्वारा समितीचे नेते या नात्यानेही पंजाबच्या राजकीय-सामाजिक जीवनात ते प्रभावशाली राहिले. मात्र, त्यांच्या काळात पक्षाचा कौटुंबिक मालमत्तेप्रमाणे वापर झाला आणि त्यांच्या नातेवाइकांवर भ्रष्टाचारासह अमली पदार्थांच्या व्यापारात सहभागाचेही आरोप झाले. २०१५मध्ये त्यांचा 'पद्मविभूषण'ने गौरव करण्यात आला; मात्र मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ त्यांनी हा पुरस्कार परत केला. याच कारणाने अकाली दलाने भाजपची प्रदीर्घ काळाची युती तोडून बहुजन समाज पक्षाशी युती केली; परंतु ती अकाली दलास तारू शकली नाही. बादल कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे त्यांच्या विरोधात कारवाई करीत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला होता. आता या निवडणुकीत बादल यांच्यासह त्यांचे चिरंजीव माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग आणि भाचे मनप्रित यांचाही पराभव झाल्याने पंजाब विधानसभेत बादल कुटुंबातील एकही सदस्य नसल्याची स्थिती तीस वर्षांनी उद्भवली आहे. बादल आज ९४ वर्षांचे असून, भविष्यात त्यांचे राजकीय जीवनात पुनरागमन होणार का, याबाबत शंका असल्या, तरी पंजाबच्या राजकारणातील 'बादल अध्याय' नक्कीच संस्मरणीय राहील.



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page