बेरोजगारीचे संकट : सॉफ्टवेअर इंजिनियर्स, शिक्षकांना सर्वात मोठा फटका; चार महिन्यात २ कोटी १० लाख झाले बेरोजगार

बेरोजगारीचे संकट : सॉफ्टवेअर इंजिनियर्स, शिक्षकांना सर्वात मोठा फटका; चार महिन्यात २ कोटी १० लाख झाले बेरोजगार

https://t.me/LoksattaOnline

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून देशातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या खासगी डेटा अॅनलिसिस कंपनीच्या कंन्झुमर पिरॅमिड्स हाऊसहोल्ड सर्व्हेमध्ये (CMIE's CPHS) मे ते ऑगस्ट या चार महिन्यांमध्ये भारतातील पांढरपेशी क्षेत्रातील (व्हाइट कॉलर प्रोफेशनल्स) ६६ लाख कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती समोर आली आहे.

सॉफ्टवेअर इंजिनियर्स, शिक्षक, अकाऊंटंट आणि अॅनालिस्ट्स म्हणून काम करणाऱ्या व्हाइट कॉलर प्रोफेशनल्सला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. पगारी कर्मचाऱ्यांमध्ये या चार क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नोकरकपात झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा आकडा केवळ पगारी कर्मचाऱ्यांचा असून यामध्ये स्वत:चा व्यवसाय असणाऱ्यांचा समावेश नाहीय असंही सीएमआयईने स्पष्ट केलं आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार एप्रिल ते ऑगस्ट कालावधीमध्ये देशात दोन कोटी १० लाख जणांनी रोजगार गमावला आहे.

मागील वर्षी २०१९ साली मे ते ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात याच क्षेत्रात १ कोटी ८८ लाख नोकऱ्या होत्या. या वर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान हा आकडा १ कोटी ८१ लाख इतका होता. यामध्ये लॉकडाउनच्या कालावधीत अभूतपूर्व घसरण झाली. मागील वर्षी सर्वाधिक नोकरदार वर्ग असणाऱ्या या चार क्षेत्रांना लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका बसलाय. नुकत्याच केलेल्या या सर्वेक्षणामध्ये सध्या व्हाइट कॉलर प्रोफेशनल्स म्हणून ओखळल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये भारतात १ कोटी २२ लाख जण नोकऱ्या करत आहेत. हा आकडा मे ते ऑगस्टदरम्यानचा आहे. म्हणजेच एप्रिलच्या तुलनेत पुढील चार महिन्यांमध्ये ६६ लाख कर्मचाऱ्यांची कपात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

२०१६ नंतर व्हाइट कॉलर प्रोफेशनल्सच्या संख्येत झालेली ही देशातील सर्वात मोठी घट आहे. जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीमध्येही देशात सध्यापेक्षा अधिक लोकांना नोकऱ्या होत्या. या कालावधीमध्ये देशातील १ कोटी २५ लाख तरुण या क्षेत्रामध्ये काम करत होते. मागील चार वर्षांमध्ये नोकरदार वर्गाची वाढलेली संख्या करोना कालावधीमध्ये झपाट्याने कमी झाली आहे असंही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं आहे. "पगारी नोकरदारवर्गाच्या संख्येत एका वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली ही सर्वात मोठी कपात आहे," असंही या अहवालात नमूद केलं आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक गोंष्टींसंदर्भातील त्रास सहन करावा लागल्याचेही अहवालात म्हटलं आहे. व्हाइट कॉलर प्रोफेशनल्सखालोखाल कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारवर्गाला अधिक फटका बसल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. "करखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही मोठा फटका बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सांगायचे झाल्यास या वर्षी ५० लाख जणांनी नोकरी गमावली आहे. म्हणजेच वर्षभराच्या कालावधीमध्ये एकूण कर्मचारी संख्येच्या २६ टक्के नोकऱ्या गेल्या आहेत," असं सीएमआयईचा अहवाल सांगतो. लघु उद्योगांसंदर्भातील नोकऱ्यांना सर्वात फटका बसला आहे. याचबरोबर मध्यम व अल्प उद्योगांनाही करोना लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसल्याचे अहवालात म्हटलं आहे.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page