बब्या, बाउन्सर बघ...

बब्या, बाउन्सर बघ...

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

खरं सांगतो. आम्हाला अगदी आत्ताआत्तापर्यंत कुणी बाउन्सर म्हटलं म्हणजे वेस्ट इंडिजचे आग ओकणारे गोलंदाजच आठवायचे. त्या गोलंदाजांच्या जागी कोणकोण दिसायचे आम्हाला. परीक्षेच्या निकालपत्रात आमच्या गणिताच्या गुणांखाली लाल रेघ उमटल्यानंतर बाउन्सरच्या भूमिकेत शिरणारे घरचे. घरचा अभ्यास करायचा राहून गेल्यानंतर बाउन्सरच्या भूमिकेत शिरणारे आमचे शाळेतले. पुढेपुढे एखादी सीएल किंवा मग साप्ताहिक सुट्टीला लागून पीएल मागायला गेलो की ती देणारे वा नाकारणारे बाउन्सरसारखे भासू लागले. अप्रायजलचा इंटरव्ह्यू घेणारे बाउन्सर भासू लागले. वेळीअवेळी वर्गणी मागायला येणारे, ईएमआयची मुदत संपल्याच्या दिवशी रात्री १२ वाजून एक मिनिटांनी फोन करणारे, कसलीकसली बिलं धाडणारे... सगळे सगळे बाउन्सरच. पण अगदी आत्ताआत्ता त्या शब्दाचा वेगळा अर्थ कळला. मोठमोठ्या नटनट्यांभोवती, नेत्यांभोवती, मोठमोठ्या हॉटेलांबाहेर काळ्याकरड्या कपड्यांत दणकट मंडळी उभी असतात ती म्हणजे बाउन्सर हे ज्ञान आम्हांस झाले. अर्थात आम्ही कुठे जायला त्या नटनट्यांच्या जवळ? आमच्या सोसायटीत एकपात्री स्पर्धेत नेहमी पहिला क्रमांक पटकावणारा सोसायटीचा सेक्रेटरी हाच आमच्या दृष्टीने मोठा नट. सोसायटीच्या गुणदर्शन कार्यक्रमात 'तुला शिकवीन चांगला धडा...' हे स्वगत गेली आठ वर्षे सादर करणारी सोसायटीच्या अध्यक्षाची मुलगी हीच आमच्या दृष्टीने मोठी नटी. आणि हे असले बाउन्सर असलेल्या हॉटेलांत आम्ही कुठले जायला? तर्रीदार मिसळ व ताक मिळणारं नाक्यावरचं 'क्षुधा शांति गृह' हे आमच्यासाठी उत्तम हॉटेल. पण बाउन्सर फक्त नटनट्यांभोवती, हॉटेलांबाहेरच उभे नसतात, ते शाळांतही असतात, ही नवी माहिती आम्हास मिळाली ती आमच्या घरातील चि. बब्या यांच्यामुळे. नि त्या बाउन्सरनी त्यांच्या दंडातील बेटकुळ्यांची ताकदही काही पालकांना दाखवली, अशी बातमी कालच वाचली. त्यावर खरं तर उगाच टीका वगैरे होते आहे. वास्तविक पाहता त्या बाउन्सरनी शारीरिक ताकदीचं महत्त्व किती अनन्यसाधारण असतं हेच दाखवून दिलं आहे. त्यासाठी मुलांनी, पालकांनी त्यांचं ऋणीच रहायला हवं. या बाउन्सरची ताकद बघून तरी मुलं नक्की व्यायामाकडे वळतील. त्यायोगे त्यांची शारीरिक क्षमता वाढीस लागेल. कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठीची शारीरिक व मानसिक कणखरता त्यांच्यात तयार होईल. खरं म्हणजे शाळांनी आता त्यांच्या वेळापत्रकात शारीरिक शिक्षणाचा तास ठेवण्यापेक्षा या बाउन्सरचाच तास ठेवावा. तो खूपच उपयुक्त ठरेल. प्रॅक्टिकल ज्ञान त्यातून मुलांना मिळेल. छोट्या मुलांना बाराखडी शिकवताना, 'ब बगळ्याचा' असं शिकवण्यापेक्षा 'ब बाउन्सरचा' असं शिकवावं. लहानपणापासूनच हे असे ताकदीचे संस्कार मुलांवर व्हायला हवेत. उद्याची पिढी सक्षम व ताकदवान व्हावी, असं वाटत असेल तर त्यास तरणोपाय नाही. चि. बब्याच्या वर्गाच्या पुढील मीटिंगमध्ये आम्ही तरी तसा प्रस्ताव मांडणार आहोत. तुम्हीही तसा प्रस्ताव मांडावा ही विनंती. कारण प्रश्न आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. ते सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर तुम्हीही विचार करा... नव्हे कराच.

- चकोर

---



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page