फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी

https://t.me/LoksattaOnline

पॅरिस : बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पराभव स्वीकारणारा पहिलाच मानांकनप्राप्त खेळाडू ठरला. महिलांमध्ये अग्रमानांकित रोमानियाची सिमोना हॅलेप आणि १०वी मानांकित बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी विजयी सलामी दिली.

रविवारी स्पर्धेला सुरुवात झाल्यावर ११व्या मानांकित गॉफिनला १९ वर्षीय इटलीच्या जॅनिक सिनेरकडून ५-७, ०-६, ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला. याआधी सिनेरने गॉफिनवर फेब्रुवारीमध्ये रॉटरडॅम येथील स्पर्धेतही विजय मिळवला होता. २१वा मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नेरने फ्रान्सच्या एलियट बेन्शेट्रिटला ६-४, ६-१, ६-३ असे पराभूत केले.

महिलांमध्ये अझारेंकाने मॉन्टेनेग्रोच्या डॅन्का कॉव्हिनिचला ६-१, ६-२ असे सहज नमवत दुसरी फेरी गाठली. पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवावा लागल्याने अझारेंका वैतागली होती, मात्र त्याचा परिणाम तिने खेळावर फारसा होऊ दिला नाही. सिमोना हॅलेपने अपेक्षेप्रमाणे दमदार सुरुवात केली. तिने स्पेनच्या सारा टॉर्मोला ६-४, ६-० असे नमवले. नुकतीच लाल मातीवरील इटालियन स्पर्धा जिंकल्याने हॅलेपने ती दमदार कामगिरी करत असल्याचे दाखवून दिले आहे. १६वी मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सने विजयी सलामी देताना स्पेनच्या मार्गारेटा गॅस्पेऱ्यानला ६-२, ६-३ असे पराभूत केले.

जोकोव्हिच, थिम यांच्या आज लढती

सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यासारख्या मानांकित खेळाडूंच्या सोमवारी सलामीच्या लढती आहेत. जोकोव्हिचसमोर सर्बियाच्याच डुसान लायोविकचे सलामीला आव्हान आहे. लायोविकने हॅम्बुर्ग टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. थिमला क्रोएशियाच्या मॅरिस चिलीचशी लढत द्यावी लागेल. महिलांमध्ये सेरेना विल्यम्स, कॅरोलिसा प्लिस्कोवा, सोफिया केनिन यांच्या लढती होतील.

वेळ : दुपारी २:३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २; स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ आणि एचडी

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline