पाठीवर थाप देणाऱ्या विजया राजाध्यक्ष

पाठीवर थाप देणाऱ्या विजया राजाध्यक्ष

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
हेमंत गोविंद जोगळेकर

समर्थ कथालेखिका असणाऱ्या गुणग्राहक होत्या. माझ्या कवितेला, कविताविषयक लेखनाला त्या दाद देत. माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला त्यांचीच प्रस्तावना आहे.

समर्थ कथालेखिका म्हणून विजया राजाध्यक्ष हे नाव मनावर ठसलेले होते. त्यांची भेट मात्र १९७६मध्ये दूरदर्शनवर झालेल्या नवोदित कविसंमेलनात झाली. त्यात मी एक नवोदित कवी होतो आणि विजयाबाई कवींची निवड करणाऱ्या सहा परीक्षकांपैकी एक. नंतर 'कविता दशकाची'च्या प्रकाशन समारंभातही त्या ओझरत्या भेटल्या. त्यांची मला खरी ओळख पटली, ती 'कविता दशकाची'च्या प्रस्तावनेत त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणातून. 'कविता दशकाची'च्या पाच संपादकांनी केलेल्या चर्चेत, 'या दशकाच्या कवींच्या प्रेमकवितेत उत्कटता आढळत नाही,' असा सूर निघाला होता. त्यावर विजयाबाई म्हणाल्या, 'हेमंत जोगळेकरांची मात्र याला अपवाद ठरेल. एका कोवळ्या भावनेचे फार नितळ दर्शन ती घडवते. त्या कोवळ्या भावनेतले संदिग्धपण शब्दांतून व्यक्त करतानाही जोगळेकरांनी ते हळुवारपणे जपले आहे, हे मला विशेष वाटते.' त्यांचे हे विधान माझ्या कवितेचा आत्मा ओळखणारे होते. म्हणूनच, माझ्या 'होड्या' या पहिल्या कवितासंग्रहाला त्यांचीच प्रस्तावना मिळावी, असे वाटले.

आपल्या अनेक कामांच्या व्यापातून त्या प्रस्तावना लेखनासाठी वेळ काढू शकतील का, अशी कुशंका माझ्या मनात होती. थोड्या संकोचानेच मी त्यांना पत्र लिहिले, संग्रहाची संहिता घेऊन त्यांच्या घरी गेलो. विजयाबाईंनी संहिता ठेवून घेतली आणि प्रस्तावना किंवा किमानपक्षी परीक्षण लिहिण्याचे मान्य केले. संग्रह नवलेखक अनुदानाखाली निघत असल्याने, तो ३१ मार्च १९८२पूर्वी प्रकाशित करणे आवश्यक होते. मी पाठपुरावा करीत राहिलो आणि १४ मार्च १९८२ रोजी मला त्यांची सविस्तर प्रस्तावना मिळाली - तब्बल १५ पानांची. ती वाचून मी विलक्षण भारावून गेलो. प्रस्तावना मोठी झाली असली, तरी विजयाबाईंची त्यातील मन:पूर्वकता जाणवून प्रकाशकांनी ती जशीच्या तशी छापली. माझ्या 'होड्यां'ना विजयाबाईंच्या प्रस्तावनेचे जणू सुकाणूच लाभले!

या प्रस्तावनेत विजयाबाई म्हणतात, 'जोगळेकरांच्या कवितेत जणू बालकवींच्या निरागस, कोवळ्या मनाचा पुनर्जन्म आहे; पण हा कोवळेपणा दुबळेपणापासून फार दूर आहे. या कवितेत मर्ढेकरांची संवेदनक्षमता आहे आणि भाषेवर पु. शि. रेग्यांच्या शैलीची झाक आहे. या कविता एखाद्या पारदर्शी जलप्रवाहासारख्या आहेत. त्यातला प्रत्येक तपशील आपले तपशीलपण ओलांडतो. कधी भावच्छटांत, तर कधी प्रतिमांत रूपांतरित होतो. यातील स्वप्नाळू सूर सांकेतिक किंवा कृत्रिम वाटत नाही; कारण त्याला कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ आहे. स्त्री हे जोगळेकरांच्या अनेक कवितांचे केंद्र आहे. नातेसंबंधांत सूक्ष्मपणे जाणवलेला दुरावा असो, की स्त्रीची कुचंबणा असो, जोगळेकर ती समंजसपणे व्यक्त करतात. सामाजिक जाणिवेपेक्षा वैयक्तिक भावनेला त्यांच्या कवितेत प्राधान्य आहे. ती कवितेत चांगल्या प्रकारे संक्रमित होते. गुंतागुंतीचा अनुभवही ते त्यातील गुंता शक्य तेवढा कमी करून मांडतात. हा सरळपणा त्यांच्या सगळ्याच कवितांत आहे. 'होड्या' कवितेतील नादिष्टपणापासून ते 'काहीच आठवत नाही'सारख्या कवितेतील भ्रमिष्टपणापर्यंत जोगळेकरांच्या प्रेमकवितांचा पल्ला आहे. त्यांच्या निर्मितीप्रक्रियेसंबंधीच्या कविता चित्रकाराच्या भाषेत बोलतात. जोगळेकरांनी स्वत:तील निरागसपणाला जपले आहे. हा निरागसपणा अनुभव घेण्याच्या शैलीत आहे; त्याप्रमाणे होड्यांसारख्या प्रतिमेत किंवा 'कुर्र', 'ठ्ठो'सारख्या शब्दांत आहे. जोगळेकरांच्या एकंदर कवितेची भाषाच त्यांच्या बालभावाचे प्रतिबिंब दाखवणारी आहे.'

विजयाबाईंची ही प्रस्तावना नक्कीच मला सुखावणारी होती. अर्थात, ती सर्वथा खरी होती असे नव्हे. विजयाबाईंनी माझी कविता ही परंपरेला सामावून घेऊन एखादे कविमन कसे घडते याचे लक्षणीय उदाहरण आहे, असे म्हटले होते. मी या कविता लिहिल्या, तेव्हा पूर्वसुरींच्या फारच थोड्या कविता वाचल्या होत्या. 'होड्या' संग्रहाच्या प्रती मी मान्यवरांना पाठवल्या होत्या. त्यापैकी पु. ल. देशपांडे, शिरीष पै, गजमल माळी यांनी विजयाबाईंच्या प्रस्तावनेचीही तारीफ केली होती. ही प्रस्तावना पसंत न पडणारेही होते. 'होड्या' संग्रहाचे प्रकाशन करताना केलेल्या भाषणातच बा. भ. बोरकरांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. 'कोणताही नवा कवी आला, की त्याच्याशी कुणा पूर्वसुरीचे साम्य दिसते हे शोधण्यापेक्षा, कुणाशीच ज्याचे साम्य नाही असे आगळेपण आणि वेगळेपण कवितेत आहे अथवा नाही, या दृष्टीने पाहिले पाहिजे,' असे त्यांचे म्हणणे होते. कवयित्री आणि समीक्षिका अंजली ठकार यांनी 'माणूस'मध्ये 'होड्या'चे परीक्षण करताना, या कवितांना 'चिरस्पर्शी कविता' म्हटले होते. 'रेगे-मर्ढेकर युगाची सुरी कितीही सोन्याची असली, तरी ती नव्या दमाच्या कवींवरून फिरवायलाच हवी का? अगदी गौरवास्तवही?' असा प्रश्न त्यांनी केला होता. ठणठणपाळांनी तर गंमतच केली. 'ललित'मधल्या 'घटका गेली पळे गेली' या सदरात त्यांनी लिहिले, 'नवे कवी हेमंत जोगळेकर आपला 'होड्या' हा कवितासंग्रह घेऊन आमच्याकडे आले आणि आपल्या कवितांऐवजी या संग्रहातील विजयाबाईंच्या प्रस्तावनेबद्दलच भक्तिभावाने भरभरून बोलले. आता विजयाबाई अशा आणखी चार कवींच्या संग्रहांच्या प्रस्तावना लिहितील आणि मं. वि. राजाध्यक्षांप्रमाणे 'पाच कवी' असा लेखसंग्रह सिद्ध करतील!' नंतर विजयाबाईंची भेट झाली तेव्हा त्यांनी मला, 'तुम्ही दळवींना कधी भेटलात,' असा प्रश्न केला. मी ठणठणपाळने लिहिलेले काही झाले नसल्याचे सांगितले; तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, 'मला वाटलंच, हा सगळा दळवींचाच खोडसाळपणा!'

'होड्या' संग्रहाच्या प्रकाशनानंतर माझ्या आणि विजयाबाईंच्या मोजक्याच गाठीभेटी झाल्या. 'होड्यां'ना केशवसुत पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे अभिनंदनपत्र मात्र आले होते. माझा नवीन कवितासंग्रह निघाला, की मी तो देण्यासाठी त्यांच्या घरी जात असे. त्याही तेव्हा माझी आस्थेने चौकशी करीत; पण त्यांनी माझ्या संग्रहांविषयी काही लिहिले नाही. विजयाबाईंची थोडीशी निवांत भेट १९८५मध्ये झालेल्या नांदेडच्या संमेलनात झाली. तिथे त्या आणि राजाध्यक्ष चहा घेत असताना, मी त्यांना अभिवादन करायला गेलो. त्यांनी मी कविसंमेलनात कोणती कविता म्हणणार आहे, ते विचारले. मी कविसंमेलनात निमंत्रित नसल्याचे सांगितले. विजयाबाईंनी बाजूने जात असलेल्या ना. धों. महानोरांना हाक मारली. ते कविसंमेलनाचे अध्यक्ष होते. गुणग्राहक विजयाबाईंनीच महानोरांच्या 'रानातल्या कविता' संग्रहावर सर्वप्रथम भरभरून लिहिले होते. विजयाबाईंनी माझी महानोरांशी ओळख करून दिली आणि मला कविसंमेलनात सहभागी करून घ्यायला सांगितले. महानोरांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि मला साहित्य संमेलनात पहिल्यांदा कविता सादर करण्याची संधी मिळाली. 'आजच्या मराठी कवितेत कविता कुठे आहे?' या परिसंवादात बोलताना विजयाबाईंनी माझा 'आश्वासक भावकवी' म्हणून उल्लेख केला.

'अंतर्नाद' मासिकाने २००३-०४मध्ये 'मनकविता' या सदरात समकालीन कवींना आपल्या कवितांविषयी - मनातल्या कवितांविषयी मनापासून काय वाटते, ते लिहायला सांगितले होते. त्यातला शेवटचा लेख माझा होता. त्यानंतर लगेचच दिवाळी अंकात विजयाबाईंचा या सदराविषयी लेख आला. त्यांनी माझ्या लेखाच्या अनुषंगाने, 'जोगळेकरांच्या कवितेची सुरुवात कुठल्याही पूर्वसुरीच्या प्रभावाशिवाय झाली. त्यामुळेच कदाचित तिला तिचे स्वत:चे वेगळेपण प्राप्त झाले,' अशी नोंद केली. नंतर 'अंतर्नाद'च्या भानू काळ्यांशी फोनवर बोलताना, 'जोगळेकरांचा लेख पूर्णार्थाने या सदराला न्याय देणारा होता,' असे उद्गार काढले. माझ्या कविताविषयक लेखनाला विजयाबाईंनी अशी दाद दिल्यामुळेच की काय, नंतर भानू काळ्यांनी माझ्या 'अगा कवितांनो', 'अगा कवींनो', 'पुन्हा कविता' या सदरांना 'अंतर्नाद'मध्ये स्थान दिले असावे.

'होड्या'च्या प्रस्तावनेच्या शेवटी, विजयाबाईंनी माझ्या 'जहाजे जेव्हा पाण्यात माझी वाट पाहत उभी होती' या कवितेच्या ओळीच्या संदर्भात लिहिले होते, 'जोगळेकरांना असे भूतकाळात बोलण्याची गरज नाही. ज्याला पुष्कळ होड्या येतात, त्या कवीसाठी ती उभीच आहेत. त्यांची आठवण कवीला आपल्या मर्यादांतून उसळी मारून नव्या वाटांवर फिरायला नेईल. जो स्वत:ची लकेर घुमवत त्या दाट जंगलात आत्मविश्वासाने शिरला आहे, त्याला कधी ना कधी स्वत:ची फांदी सापडल्याशिवाय थोडीच राहील?'

मला ती फांदी आता खरोखरीच सापडली आहे की नाही, हे विजयाबाईंनी सांगावे, असे फार फार वाटते!



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page