पंजा आणि बोटे

पंजा आणि बोटे

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

म्हणाला अंगठ्याला,

अखेर लोकांनी तुझाच

उपयोग केला.

त्यांना इंग्रजीत थम्सअप केलं

आणि मला देशी भाषेत,

दाखवला.

अंगठा रागावून म्हणाला,

तुझ्या बोटांचा आता,

एकमेकांशी ताळमेळ नाही.

हा बोलतो काही,

तर तो बोलतो काही,

कुणाला काळ वेळ नाही.

त्यांचे आणि तुझेही आता,

पहिले दिवस राहिले नाहीत.

कुणी नशीबाने खातो,

कुणी कर्तृत्वाने खातो.

तुझ्या कर्मकांडाचा दोष,

मला कशाला देतो?

मग पंजाने करंगळीकडे

रागाने पाहत,

तिला जाब विचारला.

आम्ही असे काय केले, की

लोकांची आमच्यावरली

माया सरली.

तुला पुढे करून त्यांनी,

आमच्याशी कट्टी घेतली.

करंगळी म्हणाली,

माझा याच्याशी काय संबंध?

मी तर तुमच्या

भल्यासाठीच सांगत होते;

पण तुमचेच नेते एकमेकांना,

करंगळी दाखवत होते.

करंगळीचा अर्थ,

'घाईची लागली' असा होतो.

तो वेळीच लक्षात नाही आला,

तर जागीच अनर्थ होतो.

आता मोडून,

काहीच फायदा नाही.

पराभूतांना बक्षीस देण्याचा,

देशात कायदा नाही.

तुझ्याच हाती कुलूप आहे

आणि तुझ्याच हाती,

चावी आहे.

मी तर आपली एकटीच,

कोपऱ्यात उभी आहे.

आता पंजाने रोखून,

तर्जनीकडे पाहिले.

म्हणाला,

तुझ्यामुळे मी खूप साहिले.

जो तो आता माझ्याकडे,

तुला धरून रोखतो.

संधी मिळेल तेव्हा तेव्हा,

शब्दांनी ठोकतो.

'बोट दाखवणे' म्हटले,

की आधी तूच आठवतेस,

आता काय तू मला,

१४ वर्षांच्या वनवासात

पाठवतेस?

तर्जनी हसून म्हणाली,

अरे, तुझा पेशंट तर

आताच 'राम' म्हणतो आहे

आणि तू मात्र २०२८चा

विचार करतो आहे.

बोट दाखवण्याचा हेतू,

खोट काढणे नसतो;

पण झोपलेल्या माणसाला,

पडवळदेखील,

साप म्हणून डसतो.

मी बोट दाखवलं म्हणून

तुझा रोष आहे;

पण त्याचा अर्थ कळला नाही,

हा तुझा दोष आहे.

अनामिका पुढे आली आणि म्हणाली,

मी तर जोडीदाराचं बोट.

जवळ घेईल त्याला लळा लावते,

जिंकेल त्याला टिळा लावते.

मला नसत्या वादात,

ओढू नकोस

आणि स्वतःच्या चुकांसाठी,

माझी उणीदुणी

काढू नकोस.

'हात दिला' आणि 'हात दाखवला'

यातला फरक मोठा असतो

आणि भूतकाळाचा आधार,

नेहमीच खोटा असतो.

उरलेल्या 'मध्यमे'ने,

पंजाकडे पाहत पुकारा केला,

त्याला सावध इशारा दिला.

बाबा रे माझ्या नादाला

लागू नकोस,

मी जर पुढे आले,

तर अनेक अर्थ निघतील

आणि अश्लील अश्लील म्हणून,

तुलाच लोक झोडतील.

बोटांचे ऐकून पंजाने

आपली मूठ वळली,

निर्धाराने की त्राग्याने,

ही गोष्ट मात्र,

नाही कळली..!

- तंबी दुराई



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page