दक्षिण कोरियावरही हवी नजर

दक्षिण कोरियावरही हवी नजर

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
सनत कोल्हटकर

दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये खूप चुरस अनुभवायला मिळाली. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारताचेही तेथील घडामोडींकडे बारीक लक्ष असणे क्रमप्राप्त आहे

पुढील दोन महिन्यांमध्ये युरोपातील दोन देशांमध्ये म्हणजे हंगेरी आणि फ्रान्समध्ये तेथील अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका होणार आहेत. नुकतीच पूर्व आशियातील एक देश दक्षिण कोरियामध्ये तेथील नवीन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका पार पडल्या. , उत्तर कोरिया हे भौगोलिकदृष्ट्या चीन आणि रशिया यांच्याजवळचे देश असल्याने भारताचेही तेथील घडामोडींकडे बारीक लक्ष असणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण कोरियामध्ये लोकशाही आहे, तर उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही आहे. दक्षिण कोरियाचे भारताबरोबर व्यापारी संबंध आहेत आणि तेथील 'सॅमसंग', 'एलजी', 'किया', 'ह्युंदाई' असे अनेक ब्रँड भारतामध्ये लोकप्रिय आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाकडे जगाचे लक्ष लागले असल्याने इतर देशांमधील घडामोडींकडे बघावयास आंतरराष्ट्रीय माध्यमांना सध्या वेळ नसल्याचे चित्र आहे.

दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये खूप चुरशीची लढत झाली. ७७ टक्के कोरियन मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला होता. ६१ वर्षांच्या यून यांना ४८.६ टक्के मते मिळाली, तर त्यांचे विरोधक ली जे यांना ४७.८ टक्के मते मिळाली. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे यून सुक येउन यांची निवड झाली. तेथील डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार हे चीन आणि उत्तर कोरिया या दोन्ही शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध ठेवण्याच्या मताचे होते.

गेली काही वर्षांमध्ये दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून 'थाड' नावाची जी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी केलेली आहे त्याला अनेक कोरियन जनतेचा विरोध आहे. थोडक्यात अनेक जण अमेरिकेपेक्षा चीनबरोबर जास्त चांगले संबंध ठेवण्याच्या मताचे आहेत; पण आत्ता ज्या 'यून सुक योल' यांची निवड झाली आहे, ते अमेरिकेबरोबर उत्तम संबंध ठेवण्याच्या मताचे आहेत. यून यांच्याबद्दल एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी 'क्वाड' या अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या संघटनेबरोबर सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

दक्षिण कोरियन मतदारांना यून यांच्या आक्रमक प्रचारामध्ये यून यांचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी साधर्म्य आढळून येत होते. यापूर्वी गेली तीन वर्षे यून यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. उत्तर कोरियाच्या आक्रमक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला तोंड कसे देणार, हा तेथील निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा होताच. अर्थात चीन आणि उत्तर कोरियाबरोबरही चांगले संबंध तेथील मतदारांना अपेक्षित होतेच; पण हे संबंध अमेरिकाविरोधी धोरणावर बेतलेले नसावेत, असे त्यांचे मत आहे. उत्तर कोरियावर अमेरिकेकडून कडक निर्बंध लादले गेले आहेत आणि त्याला यून यांचा पूर्ण पाठिंबा आहे. येत्या मे २०२२ पासून त्यांच्या पाच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला सुरुवात होईल.

आशियातील दक्षिण कोरिया ही चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीपासून अंतर राखून ठेवणारे हे नवे नेतृत्व तेथील सत्तेमध्ये येत आहे. चीनच्या दादागिरीमुळे त्रस्त असलेल्या दक्षिण आशियातील इतर देशांचे जे ध्रुवीकरण होत आहे त्यामध्ये या देशांमध्ये येणाऱ्या राजवटींच्या भूमिकेकडे लक्ष असणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण कोरियामध्ये पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाई हाही एक महत्वाचा मुद्दा होताच. तेथील पूर्वीचे डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष मून जे यांची भूमिका चीन आणि उत्तर कोरिया यांच्याबाबतीत अतिशय सौम्य आणि काहीअंशी अनुकूल म्हणता येईल, अशी होती. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदी आलेल्या यून सुक योल यांच्या भूमिकेमागील काही महत्त्वाच्या मतांचा मागोवा पुढे दिला आहे.

यून यांनी स्वातंत्र्य , शांतता आणि उत्कर्ष या मुद्द्यांवर जोर दिलेला आहे. थोडक्यात सांगायचे तर, लोकशाही देशांबरोबर आपले संबंध अनुरूप असतील, असे त्यांना म्हणावयाचे आहे. तैवानप्रमाणेच दक्षिण कोरियाची सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये चांगली गुंतवणूक आहे. अमेरिकेच्या मदतीने दक्षिण कोरियाला यातील जागतिक सहभाग वाढवायचा आहे. यून सुक योल यांची निवड जाहीर होताच कोरियन शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला. म्हणजेच तेथील शेअर बाजाराने या निवडीचे स्वागत केलेले आहे हे निश्चित. कार्पोरेट टॅक्स कमी केला जाणार आहे. खासगी उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.

यून यांच्या दुर्दैवाने दक्षिण कोरियाच्या संसदेमध्ये यून यांच्या विरोधी पक्षाचे बहुमत असल्याने यून यांची पुढील वाटचाल सोपी नसणार आहे. ही परिस्थिती २०२४ पर्यंत अशीच असणार आहे. 'सॅमसंग', 'एलजी' आणि 'ह्युंदाई' अशा आंतरराष्ट्रीय ओळख असणाऱ्या कंपन्यांवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. काही वर्षांपूर्वीच 'सॅमसंग' या कंपनीच्या प्रमुखांना बेकायदा आणि भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब केल्याने निलंबन आणि तुरुंगवास झालेला होता. वर उल्लेखलेल्या आणि इतर अशाच मोठ्या कंपन्या तेथील सरकारच्या 'नाकापेक्षा मोती जड,' होऊ नयेत याची काळजी घेण्यात येणार आहे.

दक्षिण कोरियामध्ये ३० टक्के ऊर्जा अणुऊर्जा प्रकल्पामधून निर्मिली जाते. दक्षिण कोरियानेच 'यूएई'मधील अबू धाबी येथे काही वर्षांपूर्वी अणुऊर्जा प्रकल्प उभा करून कार्यान्वितही करून दिलेला आहे. या अणुऊर्जा प्रकल्पांच्या जागतिक बाजारातील सहभाग दक्षिण कोरियातील कंपन्यांना वाढवायचा आहे. दक्षिण कोरिया अजूनही ओमायक्रॉनच्या साथीला तोंड देतो आहेच. दक्षिण कोरियामध्ये अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या व्यक्तीला एकदाच पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडून जात येते. त्यानंतर परत निवडणुकीसाठी उभे राहता येत नाही. ज्या विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवून यून यांनी विजय प्राप्त केला आहे त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यात ते किती यशस्वी होतात हे पाहावे लागेल.

(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

..........

निवडीनंतर जल्लोष करताना नवनिर्वाचित अध्यक्ष यून सुक योल.



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page