ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे निधन

https://t.me/LoksattaOnline

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे मंगळवारी वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या त्या मातोश्री होत.

तल्लख बुद्धिमत्ता असलेली अभिनेत्री अशी ललिता केंकरे यांची ओळख होती. त्यांचे वडील तात्या आमोणकर हे साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळातील मोठे प्रस्थ होते. त्यामुळे नाटकाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. साहित्य संघ आणि ललित कला दर्शच्या अनेक महत्त्वाच्या नाटकांमधून त्यांनी भूमिका के ल्या होत्या. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘खडाष्टक’, ‘भाऊबंदकी’, ‘सुंदर मी होणार’, ‘शारदा’, ‘गरुडझेप’, ‘पंडित राज जगन्नाथ’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी काम केले होते. संगीत नाटकांच्या मुशीतून घडलेल्या ललिता केंकरे यांनी पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, विद्याधर गोखले, तात्यासाहेब शिरवाडकर अशा दिग्गजांच्या नाटकांमधून भूमिका साकारल्या. ‘पती गेले गं काठेवाडी’ हे त्यांचे नाटक विशेष गाजले. भालचंद्र पेंढारकर, श्रीकांत मोघे, मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी अनेक नाटकांमधून काम केले.

एकपाठी अभिनेत्री म्हणून त्या विशेष प्रसिद्ध होत्या. दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका के ल्या होत्या. सई परांजपे दिग्दर्शित ‘कथा’ चित्रपटातही त्यांची भूमिका होती. जयवंत दळवी यांच्या ‘दुर्गी’ या नाटकावर आधारित ‘सावल्या’ या मालिके तूनही त्यांनी काम केले होते. ललिता केंकरे नाटकात आहेत म्हणजे नाटक चांगले होणार या विश्वासाने लोक नाटकाला येत असत.

Report Page