घरंदाज अभिनेत्री

घरंदाज अभिनेत्री

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

यांच्या निधनाने विसाव्या शतकातील मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. मंद तेवत असणारी समई विझावी, तितक्या शांतपणे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी हे ऐहिक जग त्यागले. अलीकडील पिढीला वत्सला देशमुख यांच्याविषयी काही माहिती असायचेही कारण नाही. अगदी आज चाळिशी-पन्नाशीत असलेल्यांनाही कदाचित 'प्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांची आई' अशीच त्यांची ओळख असू शकेल. एक मात्र निश्चित. व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' हा चित्रपट ज्यांनी ज्यांनी बघितला आहे त्यांना वत्सला देशमुख यांची वेगळी ओळख सांगायची कधीही गरज पडणार नाही. यातील नायिकेच्या आईची, म्हणजे अक्काची खलनायकी भूमिका वत्सलाबाईंनी अशा काही ठसक्यात साकारली होती, की 'पिंजरा'सोबत त्यांची ही भूमिकाही अजरामर झाली आहे. वत्सलाबाईंची बहीण संध्या यांनी त्या सिनेमात नायिकेची भूमिका केली होती. म्हणजे खऱ्या आयुष्यातल्या बहिणीच्या पडद्यावरील आई त्या झाल्या होत्या. वत्सलाबाईंचे वडील श्रीधरपंत देशमुख बापूराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श संस्थेत कामाला होते. वडिलांच्या कंपनीच्या नाटकांतही त्यांनी लहानमोठ्या भूमिका केल्या. नाशिकहून मुंबईला आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बरीचशी गुजराती नाटकेही केली होती. 'राक्षसी महत्त्वाकांक्षा', 'रणदुंदुभी', 'त्राटिका', 'संगीत संशयकल्लोळ', 'बेबंदशाही', 'रायगडाला जेव्हा जाग येते' यांसारख्या नाटकांतून वत्सलाबाईंनी कामे केली. 'शिर्डीचे साईबाबा' हा मराठी आणि 'शिर्डी के साईबाबा' हिंदी हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट होते. 'तुफान और दिया' या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. विशेषत: व्ही. शांताराम यांच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध चरित्र भूमिका केल्या. 'जलबिन मछली नृत्यबिन बिजली', 'नवरंग', 'सुहाग', 'नागपंचमी' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. मराठीत 'पिंजरा'सोबतच 'वारणेचा वाघ', 'ज्योतिबाचा नवस', 'झुंज' या चित्रपटांतून त्या दिसल्या. अनेक चरित्र भूमिकांतून दिसणारा हा परिचित चेहरा आता कायमचा अंतरला आहे. वत्सला देशमुख यांना श्रद्धांजली!

---



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page