गाफीलपणाचे प्रक्षेपण

गाफीलपणाचे प्रक्षेपण

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

भारतातून पाकिस्तानात तांत्रिक चुकीने ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागले गेले. त्यात कोणताही दारूगोळा नव्हता व जीवितहानी झाली नाही; त्यामुळे निभावले. तरीदेखील ही घटना अत्यंत गंभीर असून, कोणत्या पातळीवर गाफीलपणा राहिला, याची सखोल चौकशी त्वरेने व्हायला हवी. भारतीय हवाई दलाच्या तळावरून हे स्वनातीत (ध्वनीच्या तिप्पट) वेगाने प्रक्षेपित होणारे क्षेपणास्त्र डागले गेले होते. ब्रह्मोस हे भारत व रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पातून निर्माण झालेले क्षेपणास्त्र गेली दोन दशके भारताच्या भात्यात आहे. आजवर अधिककरून युद्धनौकांवरून या क्षेपणास्त्राची चाचणी केली गेली. अशा चाचणीच्या वेळी वैमानिकांना; तसेच त्या क्षेत्रातील जहाजांना इशारा जारी केला जातो.

क्षेपणास्त्राच्या चाचणीपूर्वी इतरही अनेक यंत्रणांना सतर्क केले जाते. दैनंदिन देखभालीच्या दरम्यान, तांत्रिक चुकीतून अपघाताने प्रक्षेपित झालेले हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आत जाऊन आदळले. भारताने पाकिस्तानला या प्रकाराची माहिती दिली. याचा अर्थ, तोपर्यंत पाकिस्तानच्या टेहळणी यंत्रणेचा माग चुकवण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले. चाचणीत असा काही उद्देश होता का, हे कळणे कठीण आहे. तसे असले, तरी त्यासाठी कुणी प्रत्यक्ष क्षेपणास्त्र (भले दारूगोळ्याशिवायही) डागणार नाही; त्यामुळे प्रत्यक्ष प्रक्षेपणाची चूक कोणत्या पातळीवर घडली, याचा कसून शोध घ्यावा लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेली अनेक वर्षे तणाव आहे व दोन दशकांपासून दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने, आक्रमकतेचा कोणताही चुकीचा संदेश जाणे, हे मोठेच जोखमीचे ठरेल.

रशियाने युक्रेनवर चालवलेल्या हल्ल्याच्याच पार्श्वभूमीवर भारत-रशिया संयुक्त निर्मितीतून तयार झालेले क्षेपणास्त्र डागले गेले, असाही संदेश त्यातून पोहोचू शकतो. क्षेपणास्त्र एकदा भात्यातून बाहेर पडले, की ते माघारी बोलावण्याचे दोर कापले गेले असावेत. भारतीय हवाई दलाच्या कोर्ट ऑफ एन्क्वायरीमधून मिळणारे दुवे यापुढील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक ठरावेत. पाकिस्तानने या प्रकरणी संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. या निमित्ताने एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे एकूणच भारतीय संरक्षण तळांवरील शस्त्रास्त्र हाताळणीबाबत अधिक सावधगिरी गरजेची आहे. यापूर्वी युद्धनौकांवर झालेल्या अपघातांमध्ये पाणतीर, क्षेपणास्त्रे चढवताना भीषण स्फोट झाले आहेत. एखादी तांत्रिक चूक आपल्या मुत्सद्देगिरीलाही आव्हान देणारी ठरू शकते.



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page