कोत्तापल्ले, बोराडे यांना ‘मसाप’चा जीवनगौरव

कोत्तापल्ले, बोराडे यांना ‘मसाप’चा जीवनगौरव

https://t.me/LoksattaOnline

मराठवाडा साहित्य परिषदेचा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व परिषदेचे १५ वर्षांपासून कोषाध्यक्षपद सांभाळणाऱ्या प्राचार्य प्रताप बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. मसापच्या उभारणीत दोघांच्या कामांची नोंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची निवड केली असल्याचे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांमध्ये प्राचार्य प्रताप बोराडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १५ वर्षांपासून साहित्य परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून कुंपण घालणे, यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाची पायाभरणी करून खुले नाटय़गृह उभे करणे, अनंत भालेराव इमारत आदी कामांत त्यांनी योगदान दिले. बोराडे हे अभियांत्रिकीचे दुहेरी पदवीधर असून ते २० वर्षांहून अधिक काळ जवाहरलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असल्याने त्यांना विविध व्यावसायिक संस्थांशी संपर्क आणि संबंध होता.

कोत्तापल्ले विद्यार्थिदशेपासून मराठवाडा साहित्य परिषदेशी जोडले गेले आहेत. परिषदेच्या साहित्य व्यवहारात ते २५ वर्षे कार्यरत आहेत. ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते. परिषदेच्या पडत्या काळात डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य कौतिकराव ठाले यांच्या समवेत त्यांनी काम केले. त्यांचे तीन कविता संग्रह, आठ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, दहा समीक्षाग्रंथ व वैचारिक आणि ललित लेखन असे ३५ हून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दोघांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचे गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ठरविण्यात आल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page