कणाकणात सौरऊर्जा

कणाकणात सौरऊर्जा

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
नंदिनी देशमुख

धातूंच्या सौर पॅनेलमधून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी त्यांना थेट सूर्यप्रकाशात न्हाऊन निघावे लागते, असे आत्तापर्यंत वाटत होते. परंतु आता अशी गरज नाही, हा अलिकडेच फिलिपाइन्समधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी लावलेला शोध आहे. त्यांच्या संशोधनानुसार, आपण स्वच्छ ऊर्जानिर्मितीच्या दिशेने भरारी मारली आहे. यासाठी जो क्रांतिकारी पदार्थ वापरला जातो तो भाज्या आणि फळांच्या टाकाऊ भागांपासून निघणारे चकचकीत कण होय. या २९ वर्षांच्या तरुणाने या शोधाकरता 'जेम्स डायसन फाऊंडेशन'चा शाश्वततेचा, सन २०२०चा पुरस्कार पटकावला आहे. त्याने अशा प्रकारची पॅनेल्स फिलिपाइन्समधील 'मापुआ विद्यापीठा'त तयार केली आहेत.

जिवंत वनस्पतींच्या आतील काही कणरूप भाग सूर्यकिरणातील अतिनील लहरींचे शोषण करतात आणि त्यांचे दृश्य प्रकाश लहरीत परावर्तन करतात. अशा वनस्पतींचे भाग पॅनेलमध्ये वापरल्यामुळे काही प्रमाणात सूर्यप्रकाश अडकवला जातो आणि त्याचे रूपांतर विद्युतशक्तीत करण्यात येते. ढगाळ वातावरणातदेखील अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे नागरी वस्तीत जेथे पारंपरिक सौर पॅनेल बसवण्यासाठी जागा नसते, अशा ठिकाणीदेखील हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकेल.

अरोरा म्हणजेच अरुणप्रकाश. या शब्दापासून 'ऑरियस' असे या कणांचे बारसे करण्यात आले. रेझीनयुक्त पृष्ठभागावर हे कण पसरल्यास त्यांचे विविध आकारांत साचे बनवून वापरता येतात. मैग्यूच्या घराच्या खिडकीमध्ये त्यांनी असे दोन बाय तीन फुटाचे पॅनेल बसवले आहे आणि त्यापासून त्याचे स्वतःचे दोन फोन दररोज चार्ज होण्याइतकी विद्युतशक्ती निर्माण होत आहे. 'ऑरियस'ने आच्छादित केलेल्या इमारती लवकरच तयार व्हाव्यात, म्हणजे उंच उभे असे निर्माण करणारे स्रोतच निर्माण होतील, अशी मैग्यूची महत्त्वाकांक्षा आहे. जरी गगनचुंबी इमारती थेट सूर्यप्रकाशाच्या दिशेला नसतील, तरी त्याच्या बाह्य भिंती, तसेच पदपथ आणि आजूबाजूच्या इमारती अतिनील किरणांचे शोषण करू शकतात. याच पदार्थांपासून वक्राकार प्लेटस तयार करून त्यांचा उपयोग विद्युत मोटारी, विमाने आणि बोटींमध्ये करण्याचा प्रयत्न या संशोधनाद्वारे होत आहे. या उत्पादनाचा वापर सर्वसामान्य माणसांनी करावा आणि सौरऊर्जा आपल्या घराजवळ आणावी, यासाठी मैग्यू प्रयत्नशील आहे.

हे तंत्रज्ञान अत्यंत शाश्वत आहे, कारण सुरुवातीपासून ते अंतिम टप्प्यापर्यंत कुठेही यात पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. हवामान बदल आणि सतत येणारी चक्रीवादळे अशा नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झालेली पिकेदेखील या प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरता येतील, असे मैग्यूचे म्हणणे आहे. यासाठी त्याने स्थानिक पिकांच्या ७८ प्रकारच्या जाती तपासल्या आणि त्यातील नऊ जाती उच्च प्रतीच्या क्षमता असलेल्या आहेत, असे त्याला आढळले. यांचे चूर्ण करून, रस काढून तो गाळून हे चकाकणारे कण वेगळे केले जातात आणि नंतर ते रेझीनमध्ये अडकवले जातात. तयार होणारा पदार्थ भिंतींवर पसरता येतो किंवा खिडकीच्या काचांच्या दुहेरी आवरणात सिमेंटप्रमाणे घालता येतो. अशा काचा बसवलेल्या इमारती स्वतःच नवकरणीय ऊर्जानिर्मिती करत राहतात.

मैग्यू याने २०२०मध्ये त्याच्या संशोधनाबद्दल सांगताना असे म्हटले आहे की, हे उत्पादन लवकरात लवकर बाजारात आणण्याचा प्रयत्न तो करीत आहे. त्याचे अजून असे म्हणणे आहे की, या पदार्थांपासून दोरे आणि कापड बनवून त्यापासून आपले कपडे बनवले पाहिजेत. त्यामुळे आपण चालता, बोलतानादेखील अतिनील किरणांचा वापर करून वीजनिर्मिती करू शकतो. कोण जाणे, काही वर्षांनी आपणच सौरऊर्जा वापरून देदिप्यमान ऊर्जास्रोत बनू!



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page