‘एसआयपी’ गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी

‘एसआयपी’ गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी

https://t.me/LoksattaOnline

मुंबई : म्युच्युअल फंड आणि त्यातील गुंतवणुकीची नियोजनबद्ध पद्धती अर्थात ‘एसआयपी’बद्दल सर्वसामान्यांची एकंदर रुची गेली काही वर्षे वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेतील ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा ओघ विक्रमी उच्चांकावर पोहचला असून, महाराष्ट्राचे त्यात सर्वाधिक योगदान आहे. या आघाडीवर देशस्तरावर अग्रस्थानी असलेल्या दहा शहरात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे.

मागील वर्षभरात टाळेबंदीमुळे बहुतांशांचे महिन्याचे गणित कोलमडले आहे. तरी काही पूरक उत्पन्नासाठी भांडवली बाजारात पहिल्यांदा सक्रिय झाल्याचेही आढळून येते. मोठय़ा प्रमाणात उघडली गेलेली डीमॅट खाती या सक्रियतेची ग्वाही देतात. थेट भांडवली बाजारात सहभागाऐवजी अनेकांनी म्युच्युअल फंडाची कास धरली. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि दरमहा ‘एसआयपी’ मार्गाने ९,६०८ कोटी रकमेची (जुलै २०२१ चा आकडा) होणारी गुंतवणूक याचा प्रत्यय देते.

महानगरांपेक्षा लहान शहरांचा म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत वाटा गतिमानतेने वाढत आहे. आघाडीच्या ३० शहरांच्या व्यतिरिक्त (ज्याचा उल्लेख म्युच्युअल फंड उद्योगात ‘बियॉण्ड थर्टी’ अथवा ‘बी-३०’ असा होतो) उर्वरित भौगोलिक क्षेत्रातून येणाऱ्या मालमत्तेत सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. ‘बी-३०’चा एकूण मालमत्तेतील वाटा २०२० मध्ये २२ टक्कय़ांवर होता, तर ऑगस्ट २०२१च्या आकडेवारीनुसार हा वाटा २७ टक्के झाला आहे.

जागतिक आणि देशांतर्गत रोकड सुलभता रिझव्‍‌र्ह बँकेचा सकारात्मक दृष्टिकोन, वाढता लसीकरणाचा वेग भांडवली बाजाराला सार्वकालिक उच्चांकी पातळीवर नेत आहे. किरकोळ गुंतवणूकदारही मुख्यत्वे म्युच्युअल फंड ‘एसआयपी’द्वारे या तेजीचे लाभार्थी होत असल्याचे दिसून येत आहे.

‘एसआयपी’ गुंतवणुकीत ऑगस्ट २०२० मध्ये १०० कोटी रुपयांच्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीसह नागपूर हे देशातील १४ व्या क्रमांकाचे शहर होते. जुलै २०२१ मध्ये नागपूर शहरातून एसआयपी गुंतवणुकीचा ओघ १२५ कोटी रुपयांवर गेला असून, या शहराने ‘एसआयपी’ गुंतवणूक क्रमवारीत ९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. म्युच्युअल फंडांतील एकूण गुंतवणुकीत नागपूरचे योगदान ३४,३४२ कोटी रुपयांचे आहे. पुणे देशाच्या तुलनेत चौथ्या पायरीवर असून, पुण्यातून एकूण गुंतवणूक १.४१ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. तर देशात अव्वलस्थानी असलेल्या मुंबईतून एकूण गुंतवणूक १०.४१ लाख कोटींहून अधिक आहे.

वित्तीय सेवा क्षेत्रात आणि विशेषत: म्युच्युअल फंड उद्योगाला ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना चांगलीच मानवली आहे. आमच्या गुंतवणूकदारांची संख्या मागील वर्षभरात दुप्पट झाली आहे. नीचांकी व्याजदर आणि विपुल रोकड सुलभतेचा लाभ म्युच्युअल फंड उद्योगाला मागील वर्षभरात झाल्याचे दिसून येत आहे. अर्थसाक्षरता वाढत जाण्याचा सर्वाधिक लाभ वित्तीय सेवा क्षेत्राला होईल.

’ राधिका गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका, एडेल्वाइज म्युच्युअल फंड

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page