उद्ध्वस्त धर्मशाळेचे बांधकाम

उद्ध्वस्त धर्मशाळेचे बांधकाम

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा लागोपाठ दुसरा मोठा पराभव झाल्यानंतर २०१९ मध्ये तेव्हाचे अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून, एकीकडे काँग्रेस नेतृत्वविहीन आहे आणि दुसरीकडे, पक्षाच्या सर्वोच्च सत्तारचनेत मात्र काहीच बदल झालेला नाही. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती म्हणावी तितकी बरी नाही आणि त्यांनी आपली दमदार राजकीय खेळी पुरीही केली आहे. अशा वेळी, विविध निवडणुकांमधील पराभव, अनेक नेत्यांच्या राजीनाम्यांनी पक्षाला लागलेली गळती आणि रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येणारे अपयश या साऱ्यांमुळे एक गंभीर राजकीय पर्याय ही काँग्रेसची प्रतिमा झपाट्याने लयाला जात आहे. नुकताच पाच राज्यांमध्ये झालेला दारूण पराभव ही केवळ काँग्रेससाठी दु:खद बाब नाही, तर देशातील निकोप संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनेही ती मुळीच हितावह बाब नाही. प्रश्न असा आहे, की काँग्रेसच्या सर्वोच्च आणि इतर नेत्यांना आपल्यावरच्या या ऐतिहासिक जबाबदारीची काही जाणीव उरली आहे का? नसेल तर त्यांनी सरळ पक्ष सामान्य कार्यकर्ते व निष्ठावान नेत्यांच्या हाती सोपवून घरी जावे आणि आपले जगप्रवासाचे किंवा इतर छंद पुरे करावेत. काँग्रेसचे भवितव्य आणि गांधी घराणे यांची सांगड जोवर तुटत नाही, तोवर पक्षाला पुढची वाट दिसणे कठीण आहे. हा केवळ घराणेशाहीचा मुद्दा नाही. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीची सलग दहा वर्षे आणि नंतरची आठ वर्षे अशा दीड तपाच्या कालावधीत राहुल गांधी यांना आपले नेतृत्व सिद्ध करता आलेले नाही. प्रियांका गांधी हे काँग्रेसचे कसोटीच्या क्षणी वापरण्याचे ब्रह्मास्त्र आहे, अशी उगाचच समजूत करून देण्यात आली होती. तिच्यात कितपत तथ्य होते, हे उत्तर प्रदेशात समजलेच आहे.

पक्षाची इतकी जराजर्जर अवस्था असूनही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधीच राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत होते. दुसरीकडे, पक्षहितासाठी काम करणाऱ्या जी-२३ या लोकनेते नसलेल्या नेत्यांच्या हालचालींनाही वेग आला आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते लढत होते, तेव्हा यातील किती नेत्यांनी घाम गाळला आणि आपल्या खिशात हात घातला, हेही पाहावे लागेल. निकाल लागून अपयश आले, की हे २३ नेते जागे होतात आणि परत पुढच्या पराभवापर्यंत अंतर्धान पावतात. मग त्यांचे तथाकथित बंड पक्ष वाचविण्याचे गंभीर प्रयत्न आहेत, हे तरी कसे मानावयाचे? परवा कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सी. एम. इब्राहिम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांना या नेत्यांनी का थांबवले नाही? त्याआधीही ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून अनेक नेते दर काही दिवसांनी पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्या नाराजीवर पक्षात चर्चा होते की नाही? आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वशर्मा यांनी मध्यंतरी काही आक्षेपार्ह विधाने केली खरी; पण पक्ष सोडण्याचे त्यांनी दिलेले एक कारण किती गंभीर होते! ते दिल्लीत गेले असताना, त्यांचे ऐकून घेण्याऐवजी पाळीव कुत्र्याला भरविण्यात त्यांच्या नेत्याला अधिक रस होता. राष्ट्रीय पक्ष असे चालत नाहीत. आमदार किंवा अगदी नगरसेवकालाही लोकांची कामे निपटताना दिवसाचे २४ तास अनेकदा कमी पडतात. मग राहुल गांधी अनेक आठवडे राष्ट्रीय रंगमंचावरून अचानक गायब कसे होतात? अनुकूल स्थिती असतानाही पंजाब काँग्रेसची गेल्या वर्षभरात नेत्यांनी पुरती वाट लावली. इतकी की, नवज्योत सिद्धू त्याचेच कंत्राट घेऊन पक्षात शिरले आहेत, असे वाटावे.

या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचे 'नेहरू-गांधी पर्व' आता संपले आहे, याची खूणगाठ बांधून कार्यकर्ते व नेते यांनी हा ऐतिहासिक पक्ष नव्याने बांधायला घ्यावा. भारताचा आणि काँग्रेसचाही इतिहास देदीप्यमान आहे. कोणताही देश किंवा पक्ष एका घराण्याच्या पुण्याईवर किंवा कर्तबगारीवर अनंत काळ चालू शकत नाही. 'रामकृष्णही आले गेले, त्याविण का जग ओसचि पडले?' काँग्रेसच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या धर्मशाळेच्या दरवाजावर इतिहासपुरुष पुन्हा पुन्हा दस्तक देतो आहे. पक्षाला जागे करण्याचा प्रयत्न करतो आहे. ही हाक गांधी कुटुंब व इतर नेते ऐकत आहेत का? केंद्र सरकारवर तुटून पडा आणि त्याच्यावर अंकुश ठेवा; पण त्यासाठी आधी आपल्या घराचे कोसळते वासे तोलून धरा. प्रत्येक पराभवानंतर अहवाल तयार करून अथवा सोनिया गांधी यांना पत्रे पाठवून काहीही होणार नाही. आजही देशात काँग्रेस पक्ष सर्वदूर पसरला आहे. हजारो निष्ठावान कार्यकर्ते आहेत. ए. के. अँटनी यांच्यासारखे अनेक प्रामाणिक नेते आहेत. उज्ज्वल इतिहास आहे. मग या पक्षाने कात का टाकू नये? आपल्या व देशाच्या भवितव्याचा विचार का करू नये? काँग्रेसने इतके तरी शहाणपण दाखविण्याची वेळही आता झपाट्याने टळून चालली आहे.

---



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page