उत्फुल्ल आशालता!

उत्फुल्ल आशालता!

https://t.me/LoksattaOnline

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे सुहृद अरिवद पिळगावकर यांनी जागविलेल्या त्यांच्या आठवणी..

आशालता! दोन महान गायिकांची नावं एकत्रितपणे धारण करणारं तसंच उत्फुल्ल व्यक्तिमत्त्व! ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ने सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’ आणि ‘सं. मृच्छकटिक’ या नाटकांची नायिका. प्रारंभीची एक हौशी अभिनेत्री! परंतु १९६४ साली ‘सं. मत्स्यगंधा’ नाटकात ‘दूर दूर व्हा मत्स्यांनो, मी कोणी नव्हे हो तुमची.. जळात तुमचे जिणे.. अप्सरा मी तर अमरावतीची..’ असं म्हणत ती रसिकांच्या हृदयसिंहासनावर जाऊन विराजमान झाली. आणि पुढील पन्नासहून अधिक वर्ष तिने आपल्या अभिनयकौशल्यावर नाटक, मराठी आणि हिंदी सिनेमा आणि दूरदर्शन मालिका अशा चारही क्षेत्रांत लीलया संचार करून रसिकांची मनं जिंकली. मा. दत्ताराम, नटवर्य गोपीनाथ सावकार, पं. गोविंदराव अग्नि यांच्या गद्य आणि संगीत तालमींत तयार झाल्यामुळे आशालताचा पाया पक्का झाला आणि पुढचा प्रवास सुकर झाला.

साल नक्की आठवत नाही, पण गिरगावातील कन्याशाळेच्या संमेलनात ‘शाकुंतल’ या नृत्यनाटिकेचा प्रयोग होणार होता. नृत्य-दिग्दर्शक होते रमेश पुरव आणि संगीत दिग्दर्शक एकनाथ ऊर्फ भाई वाईरकर. या संगीतिकेत भूमिका करणाऱ्या शाळेतील मुलीच होत्या. गायनाची बाजू सांभाळण्यासाठी पुरव मास्तरांनी माझी आणि आशालताची योजना केली होती. ही तिची आणि माझी पहिली भेट. इथंच आमचे सूर जुळले आणि मैत्रीही झाली. त्यामुळे यापुढे तिचा मी ‘आशा’ असाच उल्लेख करीन.

‘शाकुंतल’ या बॅलेचा प्रयोग झाला. ती स्वत: ‘गोवा हिंदू’ची नायिका होतीच. आणि मी साहित्य संघाच्या नाटकांत छोटय़ा छोटय़ा भूमिका करतो हे कळल्यावर ती म्हणाली, ‘‘हे बघ. आता तू माझ्याबरोबर गायला आहेस, तेव्हा लवकरच तू हीरोचं काम करशील.’’ तिचे ते शब्द खरे ठरून १९६७ साली मला ‘सं. वासवदत्ता’ या नाटकात नायकाची भूमिका मिळाली. नंतर केव्हातरी आमची गाठ पडल्यावर तिच्या त्या बोलण्याची मी तिला आठवण करून दिली आणि ‘थँक यू’ म्हटलं. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आता एकदा माझ्याबरोबर हीरोचं काम कर.’’

तिच्याबरोबर काम करण्याचा योग १९७१-७२ ला आला. मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ संस्थेतर्फे नवीन संचात ‘वाऱ्यावरची वरात’चे प्रयोग करण्याचं घाटत होतं. पुलंची पूर्वीची भूमिका करणार होते प्रसिद्ध गायक नट वसंतराव देशपांडे. मूळ संचातला श्रीकांत मोघे हा त्याची भूमिका करणार होता. इतर नटसंच ‘चंद्रलेखा’ संस्थेचा होता. भाईंकडे (पुलं) वशिला लावून मी त्यातलं देसाई मास्तरचं छोटं काम मिळवलं, कारण त्यानिमित्तानं मला प्रत्यक्ष पुलंकडून तालीम मिळणार होती. त्यात आशाने कन्नडभाषिक कडवेकर मामीचं काम करून धमाल उडवून दिली. त्या भूमिकेचा ठसका तिने इतक्या प्रभावीपणे सांभाळला, की पुलंनी दूरदर्शनसाठी पुन्हा मूळ संचात ‘वरात’ बसवलं तेव्हा त्यांनी आशालाच ती भूमिका दिली. लेखक-दिग्दर्शकाची ही दाद तिच्या अभिनयाला मिळालेली पोचपावतीच होती.

१९७२-७३ साली ‘चंद्रलेखा’ आणि ‘आनंद संगीत मंडळी’च्या सहयोगाने ‘सं. सोन्याची द्वारका’ हे नाटक सादर झालं. ट्रिकसीन हा प्राण असणारं हे नाटक कृष्ण-सुदाम्याच्या कथेवर आधारित होतं. त्यात मी सुदामा. आशा सुदाम्याच्या पत्नीची भूमिका करायची. प्रसाद सावकार कृष्ण आणि बबन प्रभू हे मानप्रिय या व्हिलन कम् विनोदी भूमिकेत होते. २५ डिसेंबर १९७२ ते जवळजवळ ३० जानेवारी १९७३ असा या नाटकाचा एक मोठ्ठा दौरा होता. कोकण, गोवा ते कारवापर्यंत. या दौऱ्यात २६ जानेवारीला नाटकाला सुट्टी होती. त्या दिवशी काणकोणला आशाच्या घरी जाऊन आम्ही तिचा घरगुती पाहुणचारही झोडला.

एकदा एका गावातल्या थिएटरमध्ये आमचा प्रयोग होता. आम्ही तयार होऊन अंगणातील खुर्च्यावर बसलो होतो. आशा बोलता बोलता म्हणाली, ‘‘काय रे! तू माझा हीरो झालास खरा, पण आपल्याला एकही लव्ह सीन नाही. तोंडाला काळं फासून फक्त ‘कृष्ण.. कृष्ण’ जपत बसायचं.’’ मी त्यावर गमतीत म्हटलं, ‘‘आपण नानासाहेबांना सांगून आपल्यासाठी एक लव्ह सीन लिहून घेऊ.’’

सुदाम्याचं काम करायचं ठरल्यानंतर मी पथ्यपाणी करून खूप सडसडीत झालो होतो. एक दिवस आशा नानांकडे गेली आणि लाडिक तक्रार करू लागली. ‘‘बघा हो नाना, हा इतका बारीक झालाय.. मुलाचं काम करणारं पोरगंही बारकुटंच आहे. आणि मी ही अश्शी! लोकांना वाटेल- हा भिक्षा मागून आणतो, ती ही एकटीच खाते आणि नवऱ्याला आणि मुलाला उपाशी ठेवते.’’

चंद्रलेखा संस्थेने ‘सं. भावबंधन’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं तेव्हा लतिकेच्या भूमिकेत सडसडीत दिसण्यासाठी आशाने डाएटिंग केलं होतं. या भूमिकेसाठी तिला बुजुर्ग नट चित्तरंजन कोल्हटकर यांचं मार्गदर्शन मिळालं. इतर कलाकार आपापल्या भूमिकांत रुळलेले होते. व्यावसायिकदृष्टय़ा ही दोन्ही नाटकं यशस्वी ठरली नाहीत. पण ‘तुझे आहे तुजपाशी’चा पहिला प्रयोग लक्षात राहिला तो वेगळ्याच कारणाने. या नाटकात आशाने उषाची भूमिका स्वीकारावी असं वाटणाऱ्यांना धक्का बसला तो आशाच्या गीताची भूमिका करण्याच्या निर्णयाने. भारती (मालवणकर) मला म्हणाली, ‘‘आशाताई वेडी आहे. तिने उषाची भूमिका करायला हवी होती.’’ काय असेल ते असो. रवींद्र नाटय़मंदिरातील पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल होता. सगळे कलाकार रुळलेले असल्यामुळे प्रयोगाला रंगत चढत चालली होती. आणि ‘तो’ प्रवेश आला. भजी खाल्ल्यामुळे आश्रमात गीताला शिक्षा होते तो प्रसंग सुरू झाला. सुरुवातीपासूनच गीताच्या भूमिकेत आशाने आपली छाप पाडली होती. हा प्रसंग तर सर्वात महत्त्वाचा. प्रवेशाच्या सुरुवातीपासून आशानं आपली पकड घट्ट केली आणि पाहता पाहता प्रेक्षक नाटकात गुंतत गेले. ‘‘मी भजी खाल्ली, मी चोर आहे..’’ ही वाक्यं आली की प्रेक्षक बऱ्याचदा हसायचे; परंतु त्या दिवशी आशानं अशी काही कमालीची वातावरणनिर्मिती केली, की या वाक्याला अजिबात हशा आला नाही. लोक चित्राप्रमाणे स्तब्ध झाले होते. पिन-ड्रॉप सायलेन्स. परंतु तेवढय़ात अचानक रंगमंचावर माशी शिंकली आणि ते गंभीर वातावरण भंग पावून हशा पिकला. कारण.. जाऊ दे! मात्र, तो प्रसंग मनावर कायमचा कोरला गेला आहे. आणि आशानं गीताची भूमिका का निवडली याचं उत्तरही मिळालं.

अलीकडे वाढत्या वयाबरोबर आशाच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. एकदा कसलं तरी ऑपरेशन करून घेण्यासाठी ती सेंट एलिझाबेथ नर्सिग होममध्ये अ‍ॅडमिट झाली होती. मी तिला तिथं भेटायला गेलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता मी सध्या काय करतोय याची तिनं चौकशी केली. इतर प्रयोगांबद्दल सांगतानाच जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात चंद्रपूरजवळच्या झाडीपट्टीत ‘सौभद्र’ आणि ‘मृच्छकटिक’चे दोन प्रयोग करणार आहे असं मी सांगितलं. उदयराज गोडबोले हे नारद, कृष्ण आणि शार्विलकाची भूमिका करणार होते. सुभद्रा आणि वसंतसेना होती ज्योत्स्ना मोहिले. ते नाव ऐकल्याबरोबर आशा म्हणाली, ‘‘बाप रे! कठीण आहे. पावसाच्या सीनमध्ये मिठी मारताना तुझे हात पुरणार नाहीत. सांभाळून राहा.’’ मी म्हटलं, ‘‘अगं, चारुदत्त वसंतसेनेला मिठी मारत नाही, तर तीच येऊन त्याला बिलगते. तू काही काळजी करू नकोस. स्वत:ची काळजी घे. परत आल्यानंतर काय काय झालं ते सविस्तर सांगेन!’’

अलीकडे तिला तिच्या एकटेपणाचा त्रास व्हायचा. काही कामानिमित्त किंवा चौकशीसाठी फोन झाला की, ‘‘तुझं बरं आहे. तू माणसांत आहेस. मी अगदी एकटी आहे. इकडे येऊन मला गाणं तरी शिकव,’’ असं म्हणायची. पण आता सगळं संपलंय. मोबाइलमधला तिचा एक छानसा फोटो आणि नंबर खुणावत असतो. तो नंबर फिरवावासा वाटतो, पण पलीकडून ‘‘काय अरविंद? कसा आहेस?’’ अशी गोड आवाजात प्रेमळपणे चौकशी करणारं माणूस आता कुठं आहे?

वो तो आई काळूबाई को प्यारी हो गयी!

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline