'आप'ची विजयगाथा

'आप'ची विजयगाथा

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
अमनदीपसिंगAmandeep.Singh2@timesgroup.com

पंजाबमध्ये झालेले सत्तांतर ऐतिहासिक ठरले आहे. आम आदमी पक्षाने येथे जोरदार मुसंडी मारली. त्यांनी उभे केलेले बरेच उमेदवार सर्वसामान्य माणसांतील होते. या यशामागील कारण काय, इतर पक्षांचे काय चुकले याचा विचार आता होतो आहे.

पंजाबमध्ये झालेले सत्तांतर ऐतिहासिक ठरले आहे. या सत्तांतरातून राजकारणाची नवी परिभाषा निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाच्या या त्सुनामीमध्ये अनेक दिग्गज नेते पराभूत झाले असून, 'आप'साठी मैदान मोकळे झाले आहे. पंजाबमधील राजकीय समीकरणे अशा प्रकारे बदलली आहेत, की काँग्रेससह शिरोमणी अकाली दल, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष आदी सर्वच पक्षांना येत्या पाच वर्षांत आपापली रणनीती, राजकीय धोरणे बदलावी लागणार आहेत. 'आप'च्या यशामुळे हे सगळे करणे या पक्षांसाठी क्रमप्राप्त व अनिवार्य ठरले आहे. अनेक कंगोरे असणाऱ्या या निवडणुकीत अशी काय किमया घडली, की 'आप'ला एवढे घवघवीत यश मिळाले, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या निवडणुकीत 'आप'ने दिलेल्या घोषवाक्यासह इतर अनेक कारणे या पक्षासाठी लाभदायक ठरली.

मालवा, माझा व दोआबा असे पंजाबचे तीन प्रमुख विभाग आहेत. मालवामधील ६९पैकी ६५ जागांवर 'आप'ने विजय मिळवला आहे. दोआबामध्येही त्यांना मोठे यश मिळाले. या दोन्ही ठिकाणी दलित मतदारांसह जाट व शिखांची मतपेढी आहे. या मतदारांनी जातीपलीकडे विचार करीत, 'आप'च्या पारड्यात मते टाकली, हे यातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने जातीचे राजकारण करीत, चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. त्यांचे हे डावपेच निष्फळ ठरल्याचे दिसले. दुसरीकडे पारंपरिक पंथीय पक्ष अशी ओळख असलेल्या अकाली दलावरही माझा हा बालेकिल्ला गमावण्याची नामुष्की ओढवली. आत्तापर्यंत शहरी भागांतून 'आप'ला फारसा पाठिंबा मिळताना दिसत नव्हता. यावेळी त्यातही बदल झाल्याचे दिसले व शहरी भागानेही 'आप'ला भरभरून मते दिली. हिंदूंची मतपेढी हे 'आप'समोरचे मोठे आव्हान होते. व्यापाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिलेल्या केजरीवाल यांनी हिंदू मतदारांनादेखील आपल्या बाजूने वळवले. केजरीवाल व 'आप' खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप केला जात होता. हिंदूबहुल भागांत 'आप'ने तिरंगा यात्रा काढल्या व या आरोपाचे निराकरण केले. यामुळे 'आप'वर होणारे खलिस्तानविषयक आरोप मतदारांनी गांभीर्याने घेतले नाहीत.

चित्र कसे पालटले?

स्थानिक नसून उपरा आहे, असा प्रचार विरोधी पक्षांनी सुरू केला होता. केजरीवाल यांनी भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून, यातील हवाच काढून घेतली. केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराचे घोषवाक्यही बदलले. 'एक मौका भगवंत मान' हे त्यांचे नवे घोषवाक्य मतदारांना कमालीचे भावले. या शिवाय दिल्लीचे मॉडेल मतदारांना आकर्षित करीत होते. शिक्षण, ऊर्जा, आरोग्यसुविधा या क्षेत्रांसबंधी अनेक आकर्षक आश्वासने 'आप'ने दिली. मोफत वीजपुरवठा करणे, १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेस दरमहा एक हजार रुपये अर्थसाह्य या त्यांच्या घोषणा निर्णायक ठरल्या. पक्षांतर्गत गटबाजीमुळे चाचपडत राहिली. अकाली दलाच्या प्रचाराचा भर नकारात्मक बाबींवर होता. 'आप'ला याचाही लाभ झाला. 'आप'ने प्रचारादरम्यान प्रसारित केलेले दिल्ली मॉडेलचे व्हिडिओ असंख्य नागरिक कौतुकाने पाहत असल्याचे, एकमेकांना शेअर करत असल्याचे थेट वार्तांकन 'नवभारत टाइम्स'ने केले होतेच. त्याचे प्रतिबिंब निकालातही उमटले.

अकाली दल व काँग्रेस हेच दोन पर्याय समोर असणारे पंजाबचे मतदार किती त्रस्त, नाराज होते, हे या निकालावरून सिद्ध झाले आहे. ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकणाऱ्या 'आप'च्या रूपाने त्यांना नवा पर्याय मिळाला. 'आप'चा पर्याय, मान यांची स्वच्छ प्रतिमा यांमुळे मतदारांनी प्रस्थापितांना नाकारले व दिग्गज नेत्यांचा अहंकार धुळीस मिळवला. 'आप'चा झंझावात एवढा होता, की या दिग्गज नेत्यांमधील अनेकांनी गेल्या ३० वर्षांत प्रथमच पराभवाची चव चाखली. 'आप'ने गेल्या वेळी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून, विरोधकांना डोके वर काढू दिले नाही.

परिणाम काय?

'आप'च्या या विजयामुळे केवळ केजरीवाल यांची प्रतिमा उजळलेली नाही, तर या विजयानंतर राष्ट्रीय राजकारणातही मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेससाठीही हा धोक्याचा इशारा आहे. दोन वेळा दिल्ली विधानसभा आणि आता पंजाब विधानसभा जिंकणाऱ्या 'आप'च्या रूपाने सशक्त विरोधी पक्ष निर्माण झाला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत अपेक्षित आहे, तेथे यापुढे 'आप' हा काँग्रेससाठी पर्याय असेल, यात शंका नाही. दिल्ली व पंजाब ही दोन्ही राज्ये त्यांनी काँग्रेसला पराभूत करून जिंकली, हे लक्षात घ्यावे लागेल. 'आप'चे पुढील लक्ष्य आता गुजरात असेल. गेल्या वर्षी सूरत येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत 'आप'ने चुणूक दाखवली होती. काँग्रेस-भाजप अशी थेट लढत असणारी उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गोवा ही राज्येही आता 'आप'च्या अजेंड्यावर असतील. उत्तराखंड व गोवा येथे झालेल्या निवडणुकीतही 'आप'ने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले होते. या निवडणुकींत त्यांना लक्षणीय यश मिळाले नाही, तरी त्यांनी तेथे चंचुप्रवेश केला, हे नाकारता येणार नाही. यासाठी पंजाबचे उदाहरण घेता येईल. पंजाबमध्ये गेल्या निवडणुकीत त्यांना फारसे यश मिळाले नव्हते; मात्र या वेळी त्यांनी इतिहास घडवला. कोणत्याही जातीधर्माच्या आधारे राजकारण न करणारा पक्ष, ही 'आप'ची जमेची बाजू आहे. 'आप'ने आपले स्वतंत्र असे दिल्ली मॉडेल निर्माण केले आहे व अन्य राज्यांत या मॉडेलची पुनरावृत्ती करण्यासाठी हा पक्ष सिद्ध झाला आहे.

(अनुवाद : अनिरुद्ध भातखंडे)



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page