#current

#current


Google Doodle: पहिल्या महिला इंजिनीअरला गुगलची आदरांजली




कधी काळी केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या जगातील पहिल्या महिला इंजिनीअर एलिसा लिओनिडा जमिफरेस्कोयांची आज १३१वी जयंती. गुगलनं या निमित्तानं खास डुडल साकारून एलिसा यांना आदरांजली वाहिली आहे. 


एलिसा यांचा जन्म रुमानियाच्या गलाटी शहरात १० नोव्हेंबर १८८७ साली झाला. अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. शालेय शिक्षण घेताना अनेकदा त्यांना लिंगभेदाचा सामना करावा लागला. मात्र, एलिसा यांनी हार मानली नाही. त्यांनी इंजिनीअरिंग हे क्षेत्र निवडून १९१२ साली त्यात पदवी मिळवली. पदवी घेतल्यानंतर त्यांना बुचारेस्ट येथील जिऑलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. तिथं त्यांनी संस्थेच्या प्रयोगशाळेची धुरा वाहिली. प्रयोगशाळेच्या प्रमुख म्हणून त्यांनी खनिज पदार्थ व अन्य घटकांच्या अभ्यासासाठी नव्या पद्धती व तंत्र शोधून काढली. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय शिकवले. 

जनरल असोसिएशन ऑफ रोमानियन इंजिनीअर्स या संस्थेच्या त्या पहिल्या महिला सदस्य होत्या. अत्यंत समर्पित आणि अपार कष्ट करणाऱ्या महिला इंजिनीअर म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल गुगलनं घेतली आहे.

Report Page