रक्त

रक्त

eMPSCkatta Telegram Channel

मानवासहित सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी व काही अपृष्ठवंशी प्राणी यांच्या शरीरात प्रामुख्याने वाहकाचे कार्य करणाऱ्या लाल रंगाच्या हृदयापासून निघून वाहिन्यांद्वारे शरीरात फिरून परत हृदयापर्यंत अभिसृत होणाऱ्या द्रव पदार्थाला ‘रक्त’ म्हणतात. रक्ताचा उल्लेख ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा-पेशींचा-समूह) प्रकारातील ‘अभिसारित ऊतक’ असाही करतात. संयोजी ऊतकाच्या अवकाशोतक तंतुमय इ. प्रकारांप्रमाणेच रक्तही एक प्रकार आहे. शरीराचा कोणताही भाग रक्तपुरवठ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणून त्यास ‘जीवनधारा’ असेही म्हणतात.


अनादिकाळापासून रक्ताला ‘पवित्र द्रव’ मानण्यात आले आहे. प्राचीन चिनी लोक व दक्षिण अमेरिकेतील इंका लोक स्वतःच्या शरीराला रक्त फाशीत कारण त्यामुळे रोग होत नाहीत, असा त्यांचा समज होता. प्राचीन ग्रीक व रोमन लोक जीवनरक्षक व पोषक पदार्थ रोहिण्या शरीरात वाहून नेतात असे मानीत. त्यांच्या मताप्रमाणे रोहिण्या व नीला स्वतंत्र तंत्रे (संस्था) असून सागराच्या भरती-ओहोटीवर रक्तप्रवाह अवलंबून असतो. मध्ययुगीन काळात नीला कापून रक्तस्राव होऊ देणे हा रोगावरील नेहमी वापरात असलेला उपचार होता. जळवा लावून रक्तस्राव करविणे हा मेंदू, मूत्राशय व जठर यांच्या रोगावरचा उपचार समजत.

विल्यम हार्वी यांनी १६२८ मध्ये रक्ताभिसरणाचे पहिले शास्त्रीय वर्णन लिहिले. १६७० मध्ये सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर रक्ताची जटिल रचना ज्ञात झाली. १७३० मध्ये स्टीव्हेन हेल्स या इंग्रज धर्मोपदेशाकांनी घोड्यावरील प्रयोगांनी रक्तदाबाचा अभ्यास केला. सतराव्या शतकात मानवा-मानवातील, तसेच मानव व इतर प्राणी यांच्यावरील रक्ताधानाचे प्रयोग केले गेले; परंतु रक्तक्लथनाचे ज्ञान नसल्यामुळे ते थोपविता येत नसे. विसाव्या शतकात रक्ताच्या अभ्यासात झपाट्याने प्रगती झाली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस रक्तगटांचा शोध लागल्यानंतर रक्ताधानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. रक्त साठवण्याच्या पद्धतीत सुधरणा होत गेल्यानंतर १९१४ च्या पुढे रक्तपेढ्या अस्तित्वात येऊ लागल्या. रुग्णास रक्ताच्या ज्या घटकाची आवश्यकता असेल तेवढाच दात्याच्या रक्तातून घेऊन बाकीचा भाग दात्याला परत करण्याचे तंत्र १९७० नंतर अस्तित्वात आले. वैद्यकशास्त्रातील आधुनिक संशोधनाबरोबरच रक्ताचा चिकित्सात्मक उपयोग वाढत गेला आहे. ‘रक्तचिकित्सा’ या नव्या उपचारांची भर पडली आहे. नैसर्गिक रक्ताशिवाय प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या ‘कृत्रिम रक्ता’चाही मानवी रोगांकरिता उपयोग करण्यात येत आहे. रक्ताचा महत्त्वाचा घटक तांबड्या कोशिका असून त्याही कृत्रिम रीत्या बनविण्यात यश आले आहे. या संबंधीची माहिती ‘रक्ताधान’ या नोंदीत दिली आहे.

प्रस्तुत नोंदीत प्रथम मानवी रक्तासंबंधी व नंतर इतर प्राण्यांच्या रक्ताविषयी माहिती दिली आहे.

गुणधर्म

मानवी रक्त लाल रंगाचे, अपारदर्शी, पाण्यापेक्षा घट्ट व अधिक श्यान (दाट) द्रव असूनही ते सहज अभिसृत होते. त्याची श्यानता त्याच्या प्रवाह वेगानुसार बदलते. त्याचा लाल रंग रक्तारुण (हीमोग्लोबिन) या विशिष्टप्रथिनामुळे प्राप्त झाला आहे. विशिष्ट गुरुत्व सर्वसाधारणपणे १·०६० असते. pH मूल्य रोहिणी रक्ताचे ७·४ व नीलारक्ताचे ७·३५ असते म्हणजे रक्त क्षारधर्मी (अल्कधर्मी) असते. pH मूल्य ७·४ पेक्षा कमी होण्याला ‘अम्लरक्तता’ आणि वाढण्याला‘अल्करक्तता’ म्हणतात. pH ७ च्या जवळ किंवा ७·७ च्या जवळ गेल्यास जीवन काही तासांतच संपुष्टात येते. रक्ताचा क्षारधर्मवृक्कांच्या (मूत्रपिंडांच्या) अम्लधर्मी किंवा क्षारधर्मी मूत्रोत्सर्जन कार्याद्वारे टिकविला जातो.


आ. १. मानवी रक्तातील कोशिका : (अ) श्वेत कोशिका प्रकार : (१) उदासीनता, (२) अरुणकर्षी, (३) क्षारककर्षी, (४) एककेंद्रक, (५) लसीका; (आ) तांबडया कोशिका; (इ) बिंबाणू.

मानवी रक्ताचे घनफळ सु. ५,००० मिलि. असते. सर्वसाधारणपणे दरकिग्रॅ. शरीरवजनास पुरुषांत ७० मिलि. आणि स्त्रियांत ६५ मिलि. रक्तअसते. ५,००० मिलि.पैकी रक्तद्रव ३,००० मिलि. व २,००० मिलिकोशिका असतात. शरीरात रक्ताचे वितरण पुढीलप्रमाणे असते. २५०मिलि. हृदय, १,३०० मिलि. फुप्फुसांतील रक्ताभिसरण, ५५० मिलि.रोहिण्या, २,२५० मिलि. नीला आणि उरलेले यकृत, प्लीहा (पानथरी) इ.अवयवांत संचयित असते. शारीरिक वजन व लिंगरक्ताच्या घनफळावर परिणाम करतात, तरी निरोगी व्यक्तीच्याशरीरातील घनफळ जवळजवळ एकसारखे असते. रक्ताचा प्रत्येकघटक सतत बदलत असतो. विशेषेकरून पाणी रक्तप्रवाहातून सततअतिजलद बाहेर-आत जाते. ५०० मिलि. पर्यंत रक्तनाश (उदा.,रक्तादात्याने एका वेळी दिलेले रक्त) कोणताही दुष्परिणामकरीत नाही.

मानवी रक्ताचे घनफळ मोजता येते. त्याकरिता रक्तातील तांबड्या कोशिकांचे संयोगित होणारे लोह किंवा क्रोमियक किंवा फॉस्फरस यांचे समस्थानिक ( अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) वापरतात, उदा., लोह (५५) किंवा क्रोमियम (५१). याशिवाय रक्तद्रवातील प्रथिनाशी संयोगित होणारे काही रंग किंवा किरणोत्सर्गी आयोडीनही वापरून घनफळाचे मापन करता येते.

रक्त हे जटिल रासायनिक संघटनेचा द्रव असून ते रक्तद्रव व तीन प्रकारच्या कोशिका मिळून बनलेले असते. ५५% रक्तद्रव व ४५% कोशिका असतात. या चार प्रमुख घटकांची माहिती पुढे दिली आहे.

रक्ताचे रासायनिक संघटन अतिशय जटिल आहे. संपूर्ण रक्त, रक्तद्रव व तांबड्या कोशिका यांचे रासायनिक संघटन कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. १. संपूर्ण रक्त, रक्तद्रव व तांबडया कोशिका यांचे रासायनिक संघटन.

घटक

रक्त

रक्तद्रव

तांबड्या  कोशिका

(ग्रॅम./१०० घ. सेंमी. मध्ये)

पाणी

७८·०

(७७-८५)

९०·०

६६·०

एकूण घन पदार्थ

२२·०

(१८-२३)

९·३

३४·०

कार्बनी पदार्थ

२१·२

८·५

३३·०

लवणे

०·८

०·९३

०·७

रक्तरस अल्ब्युमीन

२·५

४·२

-

रक्तरस ग्लोब्युलीन

१·३८

२·६

-

फायब्रिनोजोन

०·२५

०·३

-

रक्तरुण

१५·०

(१३-१११७)

-

३४·०

एकूण नायट्रोजन

३·३

१·२

५·३

(मिग्रॅ./ १०० घ. सेंमी. मध्ये)

प्रथिनेतर नायट्रोजन

३३·०

२५·०

४४·०

यूरिया नायट्रोजन

१२·०

१५·०

११·०

ॲमिनो-अम्ल नायट्रोजन

५·६

४·५

७·४

अनिश्र्चित नायट्रोजन

१३·०

३·०

२५·०

यूरिक अम्ल

२·०

३·०

२·०

यूरिया

२०·०  −  ३५·०

२६·०

२·०

अमोनिया

-०·२५

लॅक्टिक अम्ल

६·०

८·०

५·०

पित्तारुण (बिलिरुबीन)

०·६

ग्लुकोज

७०·०

८०·०

६५·०

लेसीथीन

३००·०

२००·०

४००·०

कोलेस्टेरॉल

२००·०

१८०·०

२००·०

एकूण फॉस्फरस

४५·०

१०·०

७५·

या घटकांशिवाय एंझाइमे, हॉर्मोने, प्रतिपिंडे, व काही वायू विद्राव्य (विरघळलेल्या) वा संयोगित स्वरूपात रक्तात असतात.

शरीरातील सर्व रोहिण्यांतील रक्ताचे संघटन नेहमी स्थिर असते. याउलट निरनिराळ्या भागांतील नीला रक्ताचे संघटन ते जेथून जात असेल त्या अवयवाच्या कार्याप्रमाणे बदलते. रोहिणी रक्ताचे संघटन स्थिर ठेवण्यास पुढील गोष्टी कारणीभूत असतात.

(अ) रक्तातील किंवा त्यातील कोशिकांतील रासायनिक घटकांची वृद्धी पुढील गोष्टी नियंत्रित करतात : (१) पदार्थ विसरणक्षमता (सूक्ष्मकण रूपाने वितरित होणारा) असल्यास ऊतकद्रवात पसरणे; (२) विशिष्ट कोशिकांत साठवण किंवा बद्ध करणे ; (४) प्रत्यक्ष नाश किंवा रूपांतरण; (४) उत्सर्जन : फुप्फुसे, वृक्क, आंत्रमार्ग (आतड्यांनी बनलेला अन्नमार्ग) व त्वचा उत्सर्जनाचे ( निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याचे) कार्य करतात.

( आ) पदार्थांची कमतरता पुढील गोष्टींमुळे भरून काढली जाते : ( १) पाणी , लवणे , कार्बन डाय-ऑक्साइड यांसारखे ऊतकात संचयित असलेले पदार्थ ऊतकद्रवाद्वारे पुन्हा रक्तात येऊन तूट भरून निघते ; ( २) ग्लुकोज , प्रथिने इ. पोषक पदार्थांची कमतरता पडल्यास उत्पादक अवयव त्यांचे उत्पादन वाढवून ते रक्तात मिसळतात ; ( ३) कोशिकांची उणीव रक्तोत्पादक ऊतके ( उदा. , अस्थिमज्जा म्हणजे लांब हाडांतील व विशिष्ट चपट्या हाडांतील वाहिनीयुक्त संयोजी ऊतक) भरून काढण्याचा प्रयत्‍न करतात.

भ्रूणातील रक्तोत्पादन

पीतक कोशातील भ्रूणमध्यस्तरातील विशिष्ट कोशिकांचे रक्तकोशिकाजनक कोशिकांत अथवा आद्य स्कंधकोशिकांत (रक्तातील इतर कोशिका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कोशिकांत) विभेदीकरण (विशिष्ट कार्य करण्यासाठी होणारे रूपांतरण) होते. आजूबाजूच्या इतर कोशिकांपासून (वाहिनीजनक ऊतकापासून) रक्तवाहिन्या बनतात. स्कंध कोशिकांपैकी बहुसंख्य रक्तारुणाचा संचय करतात आणि त्या आद्य तांबड्या कोशिका बनतात. काही काळपर्यंत या कोशिकांना केंद्रक (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा गोलसर पुंज) असतो व त्यातील रक्तारुणाला ‘भ्रूणीय रक्तारुण ’ म्हणतात. हे रक्तारुण ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांची देवाण-घेवाण प्रौढातील रक्तारुणापेक्षा अगदी सहज करू शकते. गर्भावस्थेच्या शेवटास तांबड्या कोशिकांमध्ये भ्रूणीय रक्तारुण प्रौढ रक्तारुणापेक्षा चौपट असते. पुढे हे प्रमाण जलद कमी होते. भ्रूणीय वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून यकृत रक्तोत्पादनाचे कार्य करू लागते आणि पाठोपाठ प्लीहा त्यात भाग घेते. तिसऱ्या महिन्यापासून अस्थिमज्जा रक्तोत्पादन करू लागते व त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कोशिका उत्पन्न होऊ लागतात. यकृताचे कार्य जवळजवळ नवव्या महिन्यापर्यंत चालू असते. मात्र प्लीहेतील उत्पादन सहाव्या महिन्यात थांबते. मध्यंतरी लसीकाभ ऊतकातून लसीका कोशिका आणि एककेंद्रक कोशिका हे श्‍वेत कोशिकांचे प्रकार निर्माण होऊ लागतात. जन्मानंतर अस्थिमज्जा व लसीकाभ ऊतक यांतच फक्त रक्तोत्पादन चालू असते.

रक्ताचे प्रमुख घटक

(१) रक्तद्रव , (२) तांबड्या कोशिका, (३) श्‍वेत कोशिका व (४) बिंबाणू. या रक्ताच्या घटकांबद्दल खाली माहिती दिली आहे.

रक्तद्रव

रक्तातील कोशिका काढून टाकल्यास उरलेल्या द्रवाला ‘रक्तद्रव’ म्हणतात. रक्तक्लथनानंतर जो द्रव वेगळा मिळतो त्याला ‘रक्तरस’ म्हणतात. रक्तद्रव एक जटिल विद्राव असून त्यात ९०% पाणी व उरलेल्या १०% विद्रुत ( विरघळलेल्या) पदार्थांमध्ये ७% बहुजातीय प्रथिने असतात. निरनिराळे वसाभ ( स्निग्ध पदार्थांशी सदृश असे) पदार्थ निलंबित ( लोंबकळत्या अवस्थेत) व विद्राव स्वरूपात असतात. यांशिवाय क्षार , ग्लुकोज , ॲ मिलो अम्ले , जीवनसत्त्वे , हॉर्मोने , चयापचयजन्य ( शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये तयार होणारे) त्याज्य पदार्थ त्यात असतात.

आ.२. भ्रूणातील रक्तकोशिकांचे उत्पादन व टप्पे

रक्तद्रवातील प्रथिनांच्या बाहुल्यामुळे त्यास ‘प्रथिनांचा कलिली विद्राव ’ असेही म्हणता येते. अल्ब्युमीन , ग्लोब्युलीन व फायब्रिनोजेन ही प्रमुख प्रथिने असून १०० मिलि. रक्तद्रवात अनुक्रमे ४·५ ग्रॅ. , २·५ ग्रॅ. आणि ०·३ ग्रॅ. असे त्यांचे प्रमाण असते. या प्रत्येक प्रथिन प्रकाराची विशिष्ट कार्ये आहेत. रक्तप्रवाहातील पित्तारुण अल्ब्युमिनाशी बद्ध होऊन वाहून नेले जाते ; लोह व तांबे ट्रान्सफेरीन व सेल्यूलोप्लॅझ्मीन या प्रथिनांशी बद्ध होतात ; ब१२ जीवनसत्त्व विशिष्ट प्रथिनाशीच बद्ध होते ; वसाभ पदार्थ वाहून नेणारी वसा-प्रथिने आहेत वगैरे. अनेक प्रकारची ग्लोब्युलिने असून अवशोषित प्रथिने वाहून नेण्यास मदत करणे आणि गॅमा ग्लोब्युलिनामार्फत प्रतिपिंडे वाहून नेऊन सूक्ष्मजंतुसंसर्गाविरुद्ध संरक्षण देणे ही कार्ये ती करतात. फायब्रिनोजेन रक्तक्लथनात महत्त्वाचा भाग घेते.

रक्तद्रवात यूरिया , यूरिक अम्ल , क्रिऍटिनीन हे कार्बनी आणि सोडियम , पोटॅशियम मॅग्नेशियम , कॅल्शियम यांची क्लोराइडे , फॉस्फेटे व सल्फेटे हे अकार्बनी पदार्थही असतात. ऊतक कोशिकांतून येणारा कार्बन डाय-ऑक्साइड सोडियम बायकार्बोनेटाच्या स्वरूपात वाहून नेला जातो.

तांबडया कोशिका

आ. ३. साध्या सूक्ष्मदर्शकाखालील रक्तातील कोशिकादर्शक : तांबडया कोशिका, श्वेत कोशिका व बिंबाणू यांचे सर्वसाधारण परस्पर प्रमान : (१) तांबडी कोशिका, (२) श्वेत कोशिका, (३) बिंबाणू. तांबड्या कोशिका : या अती विशिष्ट कोशिका असून सर्व ऊतकांपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्यास योग्य अशीच त्यांची रचना आहे. प्रत्येक कोशिका उभयांतर्गोल तबकडीच्या आकाराची व ७·५ ते ८ मायक्रॉन ( सरासरी ७·२ मायक्रॉन) व्यासाची , मध्यभागी पातळ व कडा २·२ मायक्रॉन जाड असते ( १ मायक्रॉन = १०-३ मिमी.) कोशिका आकाराने एकसारख्या असतात. पुरुषात यांचे प्रमाण एकूण रक्तघनफळाच्या ४२ ते ५४% , स्त्रीत ३७ ते ४२% आणि संख्या अनुक्रमे ६० , ०० , ००० व ४० , ०० , ००० असते. प्रत्येक कोशिकेत तिच्या वजनाच्या एकतृतीयांश भाग रक्तारुण असते. साध्या सूक्ष्मदर्शकातील ताज्या रक्तातील तांबड्या कोशिका पिवळसर हिरव्या रंगाच्या , कोणतीही विशिष्ट अंतर्रचना नसलेल्या , केंद्रकहीन आणि नाण्यांच्या चवडीप्रमाणे गोळा होताना दिसतात.

तांबडी कोशिका कलावेष्टित ( पातळ पटलाने वेष्टित) असून या कलेचा पारगम्यता ( पदार्थ आरपार जाऊ देण्याची क्षमता) हा विशेष गुणधर्म आहे. पाणी , ऑक्सिजन , कार्बन डाय-ऑक्साइड , ग्लुकोज , यूरिया व इतर काही पदार्थ सहज पारगम्य असले , तरी रक्तारुणास ही कला अपारगम्य आहे. याशिवाय ती एवढी लवचिक असते की , कोशिकेच्या व्यासापेक्षाही कमी व्यासाच्या अतिसूक्ष्म केशवाहिनीतून ( केसासारख्या बारीक रक्तवाहिनीतून) ती पुष्कळशी विकृत ( वेडीवाकडी)  होऊन सहज जाऊ शकते आणि योग्य जागा मिळताच पुन्हा पूर्ववत आकार धारण करते.

मिठाच्या विरल विद्रावातून तांबड्या कोशिका जादा पाणी आत शिरून फुगतात , तर संहत ( विद्रुत पदार्थाचे प्रमाण जास्त असलेल्या) विद्रावात पाणी बाहेर पडून त्या संकोचतात. ऊर्ध्वपातित ( वाफ करून व मग ती थंड करून मिळालेल्या) पाण्यात त्या फुगत राहून शेवटी फुटतात आणि त्यांतील रक्तारुण व इतर पदार्थ बाहेर पडतात. या क्रियेला ‘रक्तविलयन’ म्हणतात. रक्तविलयनास आघात , पित्तलवण , सर्पविष , जंतुविष , इ. कारणीभूत होऊ शकतात व या पदार्थांना  ‘रक्तविलयक’ म्हणतात.

आ. ४. क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या . तांबड्या कोशिकांची जीवनमर्यादा ठराविक १२० दिवसांची असते व ती ग्लुकोजजन्य चयापचयापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे टिकते. केंद्रक तसेच रिबोन्यूक्लिइक अम्ल [आर एन ए ; → न्यूक्लिइक अम्ले] यांच्या अभावामुळे कोशिका विभाजन व प्रथिनांची नवनिर्मिती अशक्य असते. ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड वाहून नेण्यास ऊर्जा लागत नाही, कारण ती क्रिया रक्तारुणाचा अंगभूत गुणधर्म आहे. कोशिकाबाह्य सोडियम व कोशिकांतर्गत पोटॅशियम यांचे योग्य संतुलन ठेवण्याकरिता ऊर्जा लागते. अनेक एंझाइमे रासायनिक प्रक्रियांद्वारे ऊर्जा नियंत्रण करतात. वाढत्या वयाबरोबर वापरल्या गेलेल्या कोशिका जीर्ण होतात. प्लीहा , यकृत व अस्थिमज्जा या ठिकाणी असलेल्या भक्षीकोशिका ( सूक्ष्मजंतू , इतर कोशिका व बाह्य कण यांचे भक्षण करणाऱ्या कोशिका) या जीर्ण कोशिकांचे भक्षण करतात. रक्तारुण व इतर प्रथिनांचे अपघटनाने ( रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेने) ऍमिनो अम्लात रूपांतर होऊन ती रक्तद्रवामार्फत योग्य जागी प्रथिन नवनिर्मितीकरिता वापरली जातात. निराळे झालेले लोह अस्थिमज्जेत नेले जाऊन नव्या रक्तारुण निर्मितीत वापरले जाते. रक्तारुणाचा काही भाग पित्तारुणात रूपांतरित होतो व यकृतात नेला जातो. पित्तारुणाचे उत्पादन व त्याचे पित्तातील स्रवण रक्तारुणाच्या नाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. [ → पित्तारुण] .

श्‍वेत कोशिका

तांबड्या कोशिकांपेक्षा अनेक बाबतीत निराळ्या असणाऱ्या या कोशिका पूर्ण कोशिका असून त्यांना केंद्रक व स्वतंत्र हालचाल करण्याची क्षमता असते , म्हणजेच प्रवाहपतित निर्जीव पदार्थांसारख्या त्या नाहीत. १० ते २० मायक्रॉन आकारमानाची कोशिका केशवाहिनीच्या भित्तीच्या सलग दोन कोशिकांमधून बाहेर पडू शकते. याला ‘कोशिकापारण’ म्हणतात. त्यांची हालचाल अमीबासदृश व पादाभजन्य असते. यांना केंद्रक असून आर एन ए च्या निर्मितीची क्षमता असल्यामुळे त्या प्रथिन संश्लेषण करू शकतात.

श्‍वेत कोशिकांची संख्या प्रत्येक घ. मिमी. रक्तात ४ , ५०० ते ११ , ००० असते. ५०० तांबड्या कोशिकांमागे एक श्‍वेत कोशिका असे सर्वसाधारण प्रमाण असते. वयोपरत्वे संख्येत बदल होतो. नवजात अर्भकात २५ , ००० ते ३० , ००० ; जन्मानंतर तिसऱ्या व चौथ्या दिवशी कमी होत जाऊन यौवनात ९ , ००० ते १४ , ००० आणि प्रौढावस्थेत ४ , ५०० ते ११ , ००० होते. विश्रांतिकाळात ती संख्या कमी व श्रमामुळे संख्यावाढ होते.

श्‍वेत कोशिकांचे तीन प्रकार असून प्रत्येक प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे : ( १) कण कोशिका : उपप्रकार ( अ) उदासीनरंजी , ( आ) अरुणकर्षी आणि ( इ) क्षारककर्षी ; ( २) एककेंद्रक कोशिका आणि ( ३) लसीका कोशिका ( पहा आ. १).

कण कोशिका

आ. ५. उदासीनरंजी कोशिकेची हालचाल व भक्षण कार्य : (१) उदासीनरंजी कोशिके, (२) सूक्ष्मजंतू, (३) पादाम, (४) सूक्ष्मजंतू भक्षणाचा टप्पा, (५) सूक्ष्मजंतू भक्षण. कण कोशिका : उदासीनरंजी कोशिकांत सतत बदलणारा व क्रोमॅटिनाच्या धाग्यांनी जोडलेले तीन ते पाच खंड असलेला केंद्रक असून कोशिकाद्रव्यात ( केंद्रकाच्या बाहेरील कोशिकेतील जीवद्रव्यात) उदासीन रंजकांनी अभिरंजित होणारे [ → रंजक , जीवविज्ञानीय] कण असतात. केंद्रकाचे खंड झालेले प्रमाणात असल्याने कोशिका बहुकेंद्रकी असल्यासारखे भासते. या कोशिकांची संख्या एकूण श्‍वेत कोशिकांच्या ६०% असते. ताजे रक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास या कोशिकांच्या अमीबासदृश हालचाली दिसतात. त्या पादाभांनी चालतात. कोणीकडे जावयाचे हे रसायनानुचलनाने ( रासायनिक प्रभाव पाडणाऱ्या पदार्थाच्या सापेक्ष दूर वा जवळ जाण्याच्या हालचालीने) ठरते. ऊतकहानीच्या जागी निर्माण होणारे काही रासायनिक पदार्थ या कोशिकांना आकर्षित करतात. आपल्या पादाभांनी त्या सूक्ष्मजंतू गिळंकृत करतात व त्यांच्या कोशिकाद्रव्यातील सूक्ष्म एंझाइमांचे समुच्चय असणारे कण सूक्ष्मजंतूंचा नाश करतात. या कृतीवरून त्यांना ‘भक्षीकोशिका’ म्हणतात. त्या केवळ सूक्ष्मजंतूंचाच नाश करीत नाहीत , तर हानीच्या जागी असलेल्या मृत कोशिकांचेही भक्षण  करून संमार्जनाचे ( सफाई करण्याचे) कार्य करतात. ही कृती करताना उदासीनरंजी कोशिका स्वतःही नाश  पावतात.

अ रुणकर्षी कोशिकांच्या कोशिकाद्रव्यात इओसीन रंजकांनी अभिरंजित होणारे कण असतात व त्यांतील केंद्रक क्रोमॅटिनाच्या धाग्याने जोडलेल्या दोन खंडांचा बनलेला असतो. या कोशिका उदासीनरंजी कोशिकांप्रमाणेच चलनशील असून भक्षीकोशिकाही असतात. त्यांचे प्रमाण अत्यल्प ०·५ ते १% पर्यंत असते. त्या प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियांशी [ → प्रतिजन] संबंधित असव्यात. क्षारककर्षी कोशिकांचे आकारमान साधारण इतर कण कोशिकांइतकेच असते. केंद्रक लांबट किंवा एक वा दोन संकोचित भाग असलेला आढळतो. यातील कण साधारण मोठे असून क्षारकीय रंजकांनी अभिरंजित होतात व पाण्यात विद्राव्य असतात. क्षारककर्षी कोशिकांचे निश्चित कार्य अजून समजलेले नाही.

सर्व कण कोशिका अस्थिमज्जेत स्कंधकोशिकांपासून निर्माण होतात.

एककेंद्रक कोशिका

यांची संख्या एकूण श्‍वेत कोशिकांच्या ७% असते. त्या चलनशील व भक्षीकोशिका आहेत. त्यांची हालचाल अतिमंद असते. त्या आकारमानाने मोठ्या कणांचे किंवा जीर्ण तांबड्या कोशिकांचे भक्षण करतात ; परंतु सूक्ष्मजंतूंच्या भक्षणास असमर्थ असतात. प्रामुख्याने ऊतकहानीच्या जागी संमार्जनाचे कार्य करतात. ऊतकांतील महाभक्षीकोशिका एककेंद्रक कोशिकांपासून निर्माण होत असाव्यात.

लसीका कोशिका

यांची संख्या श्‍वेत कोशिकांच्या जवळजवळ ३०% असते. त्यांची हालचाल अतिमंद असून बहुसंख्य कोशिका लसीका ग्रंथी , प्लीहा , ⇨यौवनलोपी ग्रंथी , ⇨गिलायू ( टॉन्सिल) व इतर लसीका ऊतकांत असतात. रक्ताभिसरणातून त्या सहज ये-जा करू शकतात व त्यांची आयुर्मर्यादा एक वर्षांपर्यंत असते.

ल सीका कोशिका बाह्य कोशिका व प्रतिजन यांविरुद्ध उपार्जित ⇨रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. त्या शरीरात शिरणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या विरुद्ध प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया , तसेच कर्क कोशिका किंवा प्रतिरोपित ( अन्य व त्याच व्यक्तीच्या शरीरातील एका भागातून कृत्रिम रीत्या काढून दुसऱ्या ठिकाणी बसविलेल्या) ऊतक कोशिकांच्या विरोधी प्रतिक्रिया निर्माण करतात. काही लसीका कोशिका विशिष्ट प्रतिजनांच्या उद्दीपनानंतर तदनुरूप प्रतिपिंडे निर्माण करतात.

रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याशिवाय लसीका कोशिका स्वशरीर कोशिका व बाह्य कोशिका यांमधील फरक ओळखतात. उदा. , शरीराची एका जागेची त्वचा काढून तिचे त्याच शरीरात दुसऱ्या जागी प्रतिरोपण केल्यास ते यशस्वी ठरते. याला लसीका कोशिकांचा वरील गुणधर्म कारणीभूत असतो. याउलट ते त्वचारोपण दुसऱ्या व्यक्तीची त्वचा घेऊन केल्यास लसीका कोशिका त्यास बाह्य पदार्थ म्हणून ओळखून टिकू देत नाहीत. अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामध्ये लसीका कोशिकांची ही प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया मोठा अडथळा असतो. लसीका कोशिकांची ही शक्ती काबूत ठेवणारी काही औषधे शोधल्यामुळे वृक्क प्रतिरोपण अधिकाधिक यशस्वी होत गेले.

बिंबाणू

आ. ६. महाकवच कोशिका, तांबडया कोशिका व बिंबाणू यांच्या आकारमानांतील फरक : (अ) तांबडया कोशिका (१) व बिंबाणू (२); (आ) तांबडी कोशिका (१) व महाकवच कोशिका, (२). बिंबाणू : रक्तातील कोशिकांमध्ये सर्वांत लहान आकारमानाच्या ( २ मायक्रॉन व्यास) परंतु संख्येने श्‍वेत कोशिकांपेक्षा पुष्कळच अधिक ( १ , ५० , ००० ते ३ , ०० , ००० प्रत्येक घ. मिमी. रक्तात) या कोशिका असतात. त्या केंद्रकहीन व विभाजनक्षमता  नसलेल्या असतात. त्यांचा चयापचय अधिक गुंतागुंतीचा असतो. सूक्ष्मदर्शकाखाली मध्यभागी कणसमुच्चय  दिसतो. रक्तस्राव होऊ न देणे आणि त्यावर नियंत्रण करणे हे बिंबाणूंचे प्रमुख कार्य आहे. हे कार्य  रक्तक्लथनासंबंधी असल्यामुळे त्याविषयी अधिक माहिती ‘रक्तक्लथन’ या नोंदीत दिली आहे.

बिंबाणूंची निर्मिती अस्थिमज्जेतील मोठ्या आकारमानाच्या ‘महाकवच’ कोशिकांपासून होते. रक्ताभिसरणातील बिंबाणूची जीवन मर्यादा १० दिवसांची असते व ती संपताच त्यांचा ⇨ जालिका अंतःस्तरीय तंत्रामार्फत नाश केला जातो. त्यांचा शरीरात साठा नसतो ; परंतु प्लीहेमध्ये त्यांची संख्या अधिक असते. थ्रॉम्बोपोएटिन नावाच्या अद्यापही निश्चित ज्ञान नसलेल्या व हॉर्मोनसदृश पदार्थामुळे बिंबाणूंची निर्मिती नियंत्रित केली जाते. बिंबाणू तांबड्या कोशिकांना किंवा श्‍वेत कोशिकांना चिकटत नाहीत ; परंतु एकमेकांस चिकटतात.

रक्तोत्पादक अवयव

अस्थिमज्जा, लसीकाथ ऊतक व प्लीहा हे शरीर भाग प्रमुख रक्तोत्पादक अवयव आहेत.

अस्थिमज्जा

रक्तोत्पादनाचा प्रमुख उद्रगम लांब हाडे , फासळ्या , कवटीचे हाडे , उरोस्थी ( छातीच्या मध्यावरील चपटे हाड) व कशेरुक ( मणके) यांच्यातील लाल रंगाच्या अस्थिमज्जा भागात आहे. या भागात सूक्ष्मदर्शकाखाली तपासणीत तांबड्या कोशिका , कणकोशिका व बिंबाणू उत्पादनाच्या पूर्वगामी अवस्थांत दिसतात.

लसीकाभ ऊतक

यौवनलोपी ग्रंथी, गिलायू, लसीका ग्रंथी, आंत्र-श्लेष्मस्तर ( आतड्याच्या आतील बुळबुळीत अस्तर) या ठिकाणी कमीजास्त प्रमाणात हे ऊतक असते. या ठिकाणी लसीका कोशिकांची निर्मिती होते.

प्लीहा व यकृत

भ्रूणवयाच्या पाचव्या महिन्यापर्यंत या दोन्ही अवयवांत रक्तातील कोशिकांची निर्मिती होते.

Source: vikaspedia

Join our telegram channel for more information : https://t.me/MPSCScience


Report Page